shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वाराती रुग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग होणार सुपर स्पेशालिटी दर्जाचा..!!

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता...

नांदेडच्या घटनेनंतर आ. नमिता मुंदडांनी केलेल्या मागणीला यश...

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बालकांच्या मृत्युच्या दुर्दैवी घटनेनंतर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुसज्ज असावे जेणेकरून रुग्णांच्या जीवितास धोका होणार नाही यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाची व्हावीत अशी मागणी लावून धरली होती. 


त्यानुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटी प्रमाणे करण्यासाठी (मोड्युलर ओटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया गृहातून होणारा जंतुसंसर्ग कमी होऊन रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहे. या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध केल्याबद्दल केज मतदार संघातील जनता आ. मुंदडा यांचे आभार मानत आहे.

नांदेडच्या स्व. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया गृहातील जंतू संसर्गामुळे तीस बालकांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूस रुग्णालय प्रशासन जबाबदार धरले असले तरी चौकशीअंती त्यासाठी शस्त्रक्रिया गृहातील अस्वच्छतेमुळे झालेला जंतूसंसर्ग कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या घटनेनंतर केजच्या आ. नमिता मुंदडा यांनी आरोग्य विभागाकडे मागणी करत राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाचे व अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सुसज्ज असावेत अशी मागणी लावून धरली होती. या महत्वपूर्ण मागणीची दखल घेत शासनाने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी दर्जाच्या शस्त्रक्रिया गृहांना मान्यता दिली आहे. 

त्यानुसार अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहाच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटी २० लाख रुपयांच्या खर्चाला शासनाचे कार्यासन अधिकारी सुधीर शेट्टी यांनी मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयाचे शस्त्रक्रिया गृह उच्च दर्जाचे होणार असल्याने परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
close