shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजना संदर्भात सुयोग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ*


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
 आपल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन व स्वातंत्र्य लढ्यातील विरांची माहिती जनसामान्यांपर्यंत  पोहोचविण्यासाठी पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन तसेच छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या  जीवनावर आधारीत त्यांचे विचार  जनमानसांपर्यंत पोहचविण्यासाठी तीन दिवशीय महानाट्य कार्यक्रमांचे    आयोजन जिल्ह्यात लवकरच  करण्यात येणार आहे या संदर्भात  संबंधित विभागांच्या अधिका-यांनी आयोजनाचे सुयोग्य नियोजन करून दोनही कार्यक्रम यशस्वी होण्यासंदर्भात समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात या संदर्भात प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिष येरेकर,निवासी  उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील,उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात २ जून २०२३ ते ६ जून २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची,नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध कार्यक्रम राज्यभरात आयोजिले जात आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातही लवकरच महासंस्कृती महोत्सव व  महानाट्य कार्यक्रम आयोजनासंदर्भात महसुल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित करुन कार्यक्रमाचे स्थळ व दिनांक निश्चित करण्यात येईल.
 या कार्यक्रमासंदर्भात संबंधित विभागांनी पूर्व तयारी व नियोजन  करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी  उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.
या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती  जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम,  शिवचरित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील पोवाडा,भारुड, गोंधळगीत आदी विविध प्रकार,  स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम,कविता, व्याख्याने, देश भक्ती गीतांचा कार्यक्रमांचा या महोत्सवात समावेश करण्यात यावा. तसेच या महोत्सवात प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती, वन संस्कृती दालन, हस्तकला वस्तु दालन, बचत गटांचे उत्पादन दालन,पर्यटन विषयक दालन आदींचा समावेश असेल. 
महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा, मैदानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळांसंबंधितचा उपक्रमही या महोत्सवात घेण्यात येणार आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close