कोरेगांव (जि.सातारा) प्रतिनिधी:
जगातील सर्व ज्ञान, भाषेत असून भाषा या ज्ञानवाहिन्या आहेत. नोकरी व व्यवसाय करताना विविध भाषांचे ज्ञान आत्मसात करणे ही काळाची मागणी आहे. संगणकीय ज्ञानकौशल्ये, देशी परदेशी भाषांचे चांगले ज्ञान, सतत उन्नती करण्यासाठी आशावादी असणारा स्वभाव, आनंदाने परिश्रम करण्याची तयारी,कालानुरूप बदलते व्यवसाय करण्याची तयारी,मैत्री भावना, नैतिकता,विश्वासूपणा, जोखीम घेण्याची तयारी, कल्पकता,या गोष्टीची आज सर्वाना गरज आहे. प्राप्त निराशाजनक परिस्थितीशी झगडून आजच्या विद्यार्थ्याने स्वत:ला विवेकाने घडवावे. मनापासून अभ्यास करून मिळविलेले ज्ञान योग्य वेळी उपयोगात आणून आपले हेतू साध्य केले पाहिजेत. त्यामुळे ज्याची भाषा चांगली त्याचे जीवन चांगले बनेल, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक,डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
ते रयत शिक्षण संस्थेच्या डी.पी. भोसले कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत मराठी-हिंदी विभागद्वारा आयोजित ‘मराठी- हिंदी भाषेतील रोजगार संधी’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण हे होते.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण महर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ सुतार, उपप्राचार्य प्रा. एस. एन. कोळेकर, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. भगवान लोकडे, भूगोल विभाग प्रमुख डॉ.संजय यादव, क्रीडा विभागप्रमुख बाळासाहेब भोसले, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. के. मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की’ आज विद्यार्थी शिकत आहेत पण कौशल्य आत्मसात करून त्याचा प्रभावी वापर करत आहेत असे व्हायला हवे. आपले जीवन आपल्याला स्वतःला घडवायचे आहे, ही जाणीव तीव्रतेने निर्माण व्हायला पाहिजे. समस्या सोडवण्यासाठी विश्लेषण करता आले पाहिजेत, उपाय शोधता आले पाहिजेत. मुद्रितशोधन,संपादन,ललित व वैचारिक लेखन, सूत्रसंचालन, निवेदन,भाषण,समीक्षालेखन,
जाहिरातलेखन,संवादलेखन,
संशोधन,टंकलेखन,लघुलेखन,
अभिवांचन,सादरीकरण,आशयानुसारीलेखन,चांगलेवाचन, गीतलेखन,साहित्यलेखन, प्रासंगिकलेखन,प्रसार माध्यमासाठीलेखन, इत्यादी कौशल्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी सातत्यपूर्ण सराव अभ्यास आवश्यक आहेत. रोजगाराच्या अनेक वाटा दिसत असतात,पण आपल्यातील कला कौशल्य क्षमता आवर्जून संपादित करून करिअरसाठीची तयारी आपण केली पाहिजे.आयुष्य रडत काढण्यापेक्षा आनंदी करण्यासाठी उत्साहाची गरज असल्याचे ,कष्टाने ध्येय साध्य करण्याचे प्रयत्न सदोदित करावेत असे ते म्हणाले. त्यांनी काही गीते सादर करून स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कला कशा उपयुक्त ठरतात हे सांगितले.
दुसऱ्या सत्रात शिक्षण महर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख वक्ते, डॉ. विश्वनाथ सुतार यांनी, हिंदी भाषेत विश्वभाषा बनण्याची क्षमता आहे, विद्यार्थ्यांनी हिंदीची भाषिक कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता, संपादन, अनुवाद, भ्शाविज्ञान, निवेदन, सिनेमा या क्षेत्रात करिअर करावे असे सांगितले. या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते वाङ्मय मंडळ भित्तिपत्रकाच्या ‘भाषा व रोजगार संधी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्रणी महाविद्यालय योजना प्रमुख डॉ. एन. डी. निकम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सिराज शेख यांनी, सूत्रसंचालन डॉ. देवानंद सोनटक्के, प्रा. हरी पोरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. आर. के. मुल्ला यांनी केले.
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 9561174111

