shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ह.भ.प.सोपानराव वेताळमहाराज लिखित प्रबोधक 'आत्मचिंतन'


भारतीय संस्कृती ही जीवनमूल्यावर आधारित आहे. सर्व मानव सुखी व्हावेत हीच ह्या संस्कृतीची मागणी आहे. मानव जीवन दुर्मिळ आहे, ते निर्मिकाने काही कारणासाठी दिले आहे,

 ते सत्कर्म करीत राहणे हाच खरा मोक्ष आहे.जगातील धर्म संस्थापक,महामानव,साधुसंत,
समाजसेवक हाच आदर्श सांगत असत.आजही संत,भागवतभक्त, समाजसेवक जगाला तारक विचार सांगत आहेत. 'ज्ञानदीप लावू जगी 'ह्याच निर्मळ    भावमनातून श्रीरामपूर जवळील इंदिरानगर येथील हस्तरेषातज्ज्ञ ह.भ.प सोपानराव नारायणराव  वेताळ महाराज यांनी 'आत्मचिंतन ' लोकप्रबोधक लिहिलेले पुस्तक असेच समाजपोषक आहे. 
ह.भ.प.सोपानराव वेताळ महाराज ह्यांनी लिहिलेल्या 'आत्मचिंतन 'पुस्तकात माणसाचा जन्म -जीवन -मृत्यू यांचे चिरंतन सत्य सांगितले आहे.ते लिहितात, 
  "जीवन अतिशय कमी वेळेकरिता मिळालेले आहे. मानवदेह हा खरा भक्ती करण्यासाठीच मिळालेला आहे. तरीपण तो नाशवान आहे. त्याचा नाश होण्यापूर्वीच भगवंताची भक्ती केली पाहिजे. कारण तो परत परत मिळत नाही "
  श्रीकृष्ण हे युगप्रवर्तक होते. त्यांनी हतबल झालेल्या अर्जुनाला जगत आणि जीवन समजून सांगितले. कर्मं करावे पण फळाची अपेक्षा करू नये. तसे माणसाने हाती असलेले काम प्रामाणिपणे केले तर आपोआपच समाधान मिळते. यश -अपयश ही मनाची स्थिती आहे.जे एकाला यश वाटते त्यात दुसऱ्याला अपयश दिसते. हे सर्व एका मन:स्थितीचे वास्तव आहे. ते पुढे लिहितात, 
  "माणसाने अनासक्त राहून कर्मं करीत राहणे चांगले आहे. अपेक्षा, इच्छा हे दुःखाचं कारण आहे. मन हे नेहमी चिंतनात गुंतवले पाहिजे, कारण मन हे जर मोकळे सोडले तर हे कुठेही भरकटत जाते व नको ते विचार करते "
   'आत्मचिंतन 'ही ४८ पानांची पुस्तिका आहे. श्रीरामपूर येथील प्रकाशक पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.पत्रकार करण नवले यांनी अनुरूप अशी प्रस्तावना लिहिली आहे, त्यांनी लिहिले आहे, 
  "आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व प्रकारची माहिती आपल्यापुढे येऊन पडते. त्यातील बऱ्या वाईटाची पारख करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सतसंग व आत्मचिंतन याशिवाय पर्याय नाही असे मला व्यक्तीश:वाटते. त्याचे व्यवहार्य व वस्तुनिष्ठ ज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातून श्री वेताळ यांनी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे ते नक्की सर्वांसाठी लाभदायक ठरेल असा मला विश्वास आहे. "
  'आत्मचिंतन 'ही मनाची निर्मळ शब्दप्रार्थना आहे. त्यात जगाचे कल्याण अपेक्षित आहे. ह.भ. प. सोपानराव वेताळमहाराज हे संतवृत्तीने जगतात.प्रतिकूल परिस्थिती आणि मनातले विचार यांचे सांगण्याची अतीव तळमळ त्यांच्याजवळ आहे.त्यांनी याच तळमळीतून 'मुक्तीचा मार्ग ', 'श्रीसाईबाबांचा भक्तीमार्ग 'अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. पिकते तेथे विकत नाही म्हणतात तशी त्यांची स्थिती आहे. त्यांच्याजवळ सांगण्यासारखे खूप आहे पण ऐकणारे कान आणि वाचणारे डोळे उपलब्ध नाहीत. संत हे नेहमीच दुर्लक्षित राहतात. 'आता उरलो उपकापुरता'अशी त्यांची स्थिती असते.खरा तत्वज्ञानी अबोल राहून निरपेक्ष जीवन जगतो.ज्यांच्याकडे पैसा, सत्ता, मनुष्यबळ,माध्यमे आणि वेळ खूप आहे, ती माणसे फारसे काही लिहीत नाहीत, लिहिले तरी पुस्तके छापत नाहीत.नाचता येईना त्यांचे अंगण सतत वाकडेच असते. पण वेताळ महाराज यांच्याजवळ भक्ती आणि काही सांगण्याची तळमळ आहे, त्यांच्याकडे पैसाच नाही. तरीही घासातला घास कमी करून अशी पुस्तके छापून समाजाला तळमळीने उपदेश करणे ही मोठी भक्ती आहे.ह्या पुस्तकावर त्यांनी श्रीशिवशन्कराचा फोटो छापला आहे. संत शिरोमणी रोहिदास महाराज हे फोटो छापले आहे. त्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. तसेच आई कै. पार्वतीबाई नारायण वेताळ, वडील कै. नारायण कोंडाजी वेताळ, स्वतः ते आणि पत्नी सौ.कमल सोपान वेताळ ह्यांचे फोटो आहेत. तसेच श्रीसाईबाबा आहेत. ह.भ. प. ऋषिकेश महाराज, पत्रकार करण नवले, शरद नवले,पत्रकार अनिल पांडे, ज्ञानेश्वर काळे,  नितीन सोंडकर, पुणे,नातू अरुण जयंत चौधरी, विवेक अविनाश वेताळ, विनायक अनंत वेताळ यांचे फोटो आहेत. प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य किसनराव वमने, मुख्याध्यापक भागवतराव मुठे, राधाकिसन देवरे, धनराज जगताप, पोलीस पाटील वसंतराव मुठे, वायरमन पवार, भगीरथ जाधव ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे उल्लेख केले आहेत.एक माणुसकीसंपन्न असलेले ह.भ. प. सोपानराव वेताळमहाराज ह्यांचे 'आत्मचिंतन 'सारखे जीवनपोषक लेखन अनेकांना दिशादर्शक ठरणारे आहे. नाहीरे च्या जगात असलेल्या एका भक्ताचे हे आहेऱे साठी लिहिलेले लेखन आत्मचिंतन करण्यासारखे आहे.
 

- *डॉ. बाबुराव उपाध्ये
 इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहमदनगर 
भ्रमणसंवाद : 9270087640
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close