shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नामुष्कीच्या जंजाळात पाकिस्तान क्रिकेट गुरफटले



           पाकिस्तानचं नाव घेतलं तर डोळयासमोर वादविवाद, भांडण तंटे, एकमेकांवर कुरघोडी करणं, सत्ता केंद्र स्वतःकडेच राखणं, प्रसिध्दी माध्यमांचा, न्यायवस्थेचा गैर उपयोग करणे व भारतद्वेष फैलावणं हे चित्र आपल्या चटकन डोळ्यासमोर येते. पाकिस्तानात कोणत्या गोष्टीवरून अराजकता माजेल याचा कुठलाही भरवसा नसतो. खास करून पाकिस्तानमध्ये अंतर्गत गटबाजी, प्रांतवाद, शहरा शहरांमध्ये वर्चस्व दाखविण्याची व आपलंच खरं असल्याचं दाखवून द्यायची चढाओढ लागलेली असते. मग ते राजकारण असो वा क्रिकेट ! पाकिस्तानात स्वातंत्र्यानंतरही राजकारणात स्थिरता नाही. आश्चर्याची बाब म्हणजे तेथे अद्यापही निवडून आलेलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. तेथे लष्कराचाच राजकारण व राजकारण्यांवर मोठा प्रभाव असतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

                 राजकारण हा पाकिस्तानचा सर्वात मोठा विकपाँईट राहिले आहे. मग ते देशाच्या सर्वोच्च पातळीचं असो किंवा क्रिकेटमधील. केवळ याच एकमेव गोष्टीमुळे पाकिस्तान एक नैसर्गिक गुणवत्ता असलेला देश असूनही जागतिक स्तरावर स्वतःचा सकारात्मक ठसा उमटू शकले नाही. याचा सर्वात मोठा फटका एक स्वायत्त देश असल्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर सिध्द करण्यात ते कायम कमी पडले आहेत. हि बाब फक्त राजकारणा पुरतीच मर्यादित राहिली नाही तर त्यांचे सर्वात जास्त प्रेम असलेल्या क्रिकेटनेही अनुभवली आहे.
                 भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही क्रिकेट मोठया प्रमाणात लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या लोकप्रियतेचा व त्यातून मिळणाऱ्या अमाप पैशांचा मोह कुणाला आवडणार नाही ? मग सत्तेचं केंद्र असलेले राजकारणी क्रिकेटकडे वळले नाही तर ते नवलच ठरेल. अगदी राजकारणातही राजकारण नसेल इतकं मोठं राजकारण पाकिस्तान क्रिकेटमध्ये घुसले आहे. मुळातच पाकच्या घटनेनुसार तेथील पंतप्रधान क्रिकेटचे मुख्य आश्रयदाते आहेत. मग त्यांच्या मर्जीनुसार त्यांचे प्यादे क्रिकेटचा सारीपाठ खेळण्यास पुढे सरसावतात. केवळ या राजकारण्यांमुळेच पाकिस्तान क्रिकेटचा खेळखंडोबा झाला असून कुठलेही नियोजन नाही, खेळाच्या वयोगट निहाय स्पर्धा नाही, क्रिकेटच्या तिनही प्रारूपांच्या टिम्स बनविण्यासाठी सक्षम स्पर्धा व यंत्रणा नाही. केवळ टि२० वर लक्ष दिले जाते. कसोटी व वनडेचा तर तेथे बट्टयाबोळ झाला आहे. झटपट पैसे मिळवून देणाऱ्या लिग क्रिकेटला तेथील खेळाडू मोठे प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे वनडे व कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिपाक आपण नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बघितलाच आहे. उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणेही पाकच्या आवाक्या बाहेरचे होऊन बसले. 
             त्यानंतर तर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली. निवड समिती बदलली, कर्णधार बदलले. प्रशिक्षण चमूही नवीन आला. वनडेचा कर्णधार तर  अजून निश्चित नाही. चार वर्षांपासून पाकचे नेतृत्व करणारा बाबर आझम बाजूला हटला की हटवला हे समजण्या पलिकडचे आहे. टि२० चा कर्णधार शाहिन आफ्रिदी केला तर कुणाच्या ध्यानीमनी नसताना मुळ संघात स्थानही नसलेला शॉन मसूद थेट कसोटी संघाचा कर्णधार बनवला. इंटरेस्ट ऑफ कनक्लिफ्टच्या आरोपात निवड समिती प्रमुख इंझमाम उल हकची उचलबांगडी झाली. त्याच्या ऐवजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझ निवड समितीचा नवा अध्यक्ष नियुक्त करण्यात आला. या वहाब रियाझ बाबत काही आश्चर्यकारक बाबी अश्या की तो अजूनही सक्रिय क्रिकेटमधून निवृत्त झालेला नाही. पाकिस्तान सुपर लिग ( पीएसएल ) मध्ये अजूनही तो खेळत होता. विशेष म्हणजे पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारमध्ये तो क्रिडामंत्री पदावर आहे. वास्तविक कोणताही खेळाडू निवृत्त झाल्यानंतर तो सार्वजनिक क्षेत्रातील पदं तीन वर्ष घेऊ शकत नाही. येथे मात्र सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत.
               याच वहाब रियाझने येथे आणखी मोठा घोळ घालून ठेवला आहे. निवड समिती प्रमुख म्हणून त्याच्या अधिकारात त्याने कामरान अकमल, राव इफ्तेखार व सलमान बटला निवड समितीत सदस्य म्हणून नियुक्त केले. यापैकी सलमान बट हा माजी कर्णधार असून त्याच्याच नेतृत्वात खेळलेल्या सन २०१० मध्ये इंग्लंडविरूध्द लॉर्डस कसोटीत स्पॉट फिक्सिंग प्रकरण झाले. त्यामध्ये त्याच्यासह मोहम्मद आमिर व मोहम्मद आसिफ हे दोषी सापडले व तुरूंगाची हवाही खाऊन आले. या दरम्यान आमिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, चमकला व निवृत्तही झाला.  सलमान बटलाही पाक संघात घेण्याचा घाट घातला असता शाहिद आफ्रिदीने खोडा घातला व सलमान बटचे संघात परतण्याचे स्वप्न हवेतच विरले. त्यानंतर बटने प्रशिक्षण व कॉमेंटरीकडे लक्ष दिले. अधिकृतरित्या पीसीबीने त्याला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कॉमेंटेटर म्हणूनही नियुक्त केले. सलमान बट उच्च शिक्षित व हुशार आहे. क्रिकेटमधील अनेक गोष्टींचा तो बारकाईने अभ्यास करतो. याचा प्रत्यय त्याच्या युट्यूब चॅनेलवर अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे वहाब रियाझने बटला निवड समितीवर घेतले. मात्र तेथील विशिष्ट गटाच्या काही लोकांनी प्रखर विरोध केल्यानंतर वहाबने बटला पदावरून हटविले. या मागे मोहम्मद हाफीज असल्याची चर्चा आहे.
               मोहम्मद हाफीज हा देखील माजी कर्णधार असून सन २०२३ च्या विश्वचषकानंतर त्याची पाकिस्तान क्रिकेटचा डायरेक्टर म्हणून निवड झाली. हे नियुक्ती प्रकरण येथेच थांबलं नाही तर प्रशिक्षण देण्याची कुठलीही डिग्री व अनुभव नसलेल्या हाफिजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या पाक संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटपटू म्हणून तो ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. याच हाफिजचे सलमान बटशी जुने वाद असल्यामुळे बटला नामुष्की स्विकारावी लागली.
               पाकिस्तान क्रिकेट वादाच्या जंजाळात कसे गुरफटत चालले याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सध्या त्यांची टि२० ची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा लाहोरमध्ये सुरू असून आझम खान हा माजी यष्टीरक्षक व पाकिस्तानी कर्णधार मोईन खानचा मुलगा वेगळ्यात वादात अडकला आहे. त्याने सदर स्पर्धेत खेळताना आपल्या बॅटवर पॅलेस्टीनी लोकांना पाठिंबा दर्शवणारे स्टिकर आपल्या बॅटवर लावून फलंदाजी केली. दोन सामने टिव्हीवर थेट प्रक्षेपण नसल्याने हि बाब कोणाच्या खास लक्षात आली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात टिव्ही प्रक्षेपणात हि गोष्ट सर्वांनाच दिसली. यावर पीसीबीने आझमला स्टिकर हटविण्यास सांगितले मात्र त्याने ठाम नकार दिला. त्यानंतर पीसीबीने त्याची पन्नास टक्के मॅच फी कापण्याची घोषणा केली व त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला निर्णय फिरवून आझमला निर्दोष ठरवलं. वास्तविक आयसीसीचे स्पष्ट संकेत असून कुठल्याही वादग्रस्त बाबीत क्रिकेटपटूंनी पडायचं नाही. राजकारण, जातीयवाद, वर्णद्वेष या बाबत आयसीसीचे धोरण सक्त व स्पष्ट आहे. यावर आयसीसी कडक कारवाई करू शकते.
                 पुढचा किस्सा तर आणखी खतरनाक आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटचीच नव्हे तर देश म्हणून पाकिस्तानची जागतिक पटलावर मोठी नाचक्की झाली. पाकिस्तानचा क्रिकेट संघ  ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी राजधानी कॅनबेराला पोहोचला. तेथील विमानतळावरून पाक खेळाडूंचे सामान घेऊन ट्रकमधून जायचे होते. ते सामान ट्रक मध्ये भरण्यास यजमान ऑस्ट्रेलियाने कोणत्याही हमालांची व्यवस्था केली नसल्याने पाकिस्तानी खेळाडूंनाच हमाली काम करून आपले साहित्य ट्रकमध्ये चढवावे लागले. मोहम्मद रिझवान ट्रकमध्ये शिस्तबद्ध सामान मांडत होता तर प्रत्येक खेळाडू आपापले सामान वर चढवत होते. या गोष्टीचे व्हिडीओ जगभर व्हायरल झाल्याने पाकिस्तानी संघाचे मोठे हसू झाले. वास्तविक कोणताही खेळाडू परदेश दौऱ्यावर असताना तो निव्वळ खेळाडू नसून आपल्या देशाचा राजदूत असतो. अशा राजदूतांना चक्क हमाली करायला लावून मुळात असंस्कृत असलेल्या ऑस्ट्रेलियानेही निर्लज्जतेचा कळसच गाठला. भारतात जर असा प्रकार घडला असता तर पाक क्रिकेट, सरकार व मिडीयाने मोठा आकाडतांडव केला असता. मात्र येथे तेरी भी चुप मेरी भी चुप ची भूमिका त्यांना घ्यावी लागली.
               कोणतेही परदेशी संघ भारत अथवा पाकिस्तानात गेले तर तेथे अतिथी देव भव या रितीने त्यांना वागणूक दिली जाते. परंतु पाकिस्तान बाबत ऑस्ट्रेलियात घडलेला प्रकार निंदनीय असून या व मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेल्या व शिक्षा भोगून आलेल्या खेळाडूंबाबत आयसीसीनेच योग्य ती नियमावली बनवावी म्हणजे प्रत्येकाची इज्जत केली जाईल व मान सन्मान राखला जाईल. अन्यथा जंटलमन्सचा गेम असलेल्या क्रिकेटचीच प्रतिमा मलिन होईल व आयसीसीची नाचक्की !

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.
close