पुस्तक परीक्षण: डॉ. बाबुराव उपाध्ये
माणूस म्हणजे काळानुसार जीवनशोध घेणारा बुद्धिमान प्राणी होय.माणसाने प्रकृतीतून संस्कृतीला गतिशील केले आणि प्रकृतीतील विकृतीला दूर सारले.हा जीवनसंघर्ष इतिहास प्रत्येकाचा एक अमृतकुंभ आहे.असाच अनुभव देणारे नऱ्हेगाव पुणे येथील नारायण नामदेव कुंभार (एखतपूरकर) ह्यांनी लिहिलेले 'गोष्टी गावांशहरांकडील 'हे आत्मजीवनाचे लेखन वास्तवदर्शी आणि प्रेरणादायी आहे.
कुंभार समाजातील नवोदित साहित्यिकांना नेहमीच प्रकाशपर्व ठरणाऱे पुणे येथील उषा -अनिल प्रकाशनने 02 जुलै 2023 रोजी प्रकाशित केलेल्या ह्या आत्माविश्वकारी पुस्तकाला प्रसिद्ध लेखिका डॉ.संगीता बर्वे ह्यांची अनुरूप प्रस्तावना लाभली आहे. त्या लिहितात,
"'गोष्टी गावांशहरांकडील'या लेखसंग्रहामध्ये नारायणरावांनी खेड्यातील आणि शहरांकडील जीवनानुभव शब्दचित्रित केले आहेत. हे सर्व लेख वाचतांना एकूणच जगण्याविषयी, समाजजीवनाविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा किती आत्मीय आहे, याची प्रचिती येत राहते.या लेखसंग्रहामध्ये ग्रामीण आणि शहरी जीवनाचे चित्रण नारायणरावांनी त्यांच्या पद्धतीने सुरेख रेखाटले आहे."
आपल्या जीवनातील अनेक हृदयस्पर्शी अनुभव नारायणराव कुंभार ह्यांनी प्रामाणिकपणे चित्रित केले आहेत.त्यांचा जन्म 01 जून 1957 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एखतपूरकर गावी झाला.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एम.कॉम. जी. डी. सी. अँड ए., सी. ए. आय. आय. बी. -01, असे उच्च शिक्षण प्राप्त केले. अलाहाबाद बँकेत 37 वर्षे नोकरी करून ते 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले.नोकरी करतानाच त्यांनी अनेक सामाजिक,साहित्यिक उपक्रमात भाग घेतला.त्यांनी लिहिले आहे,
"खरंतर मी एक पुस्तकप्रेमी. वाचन हा एक आवडीचा छन्द म्हणून मी जोपासला आहे. हे करीत असताना काही वर्षांपूर्वी मी थोडेफार लिहीत होतो. काही कविताही केल्या. मात्र या लेखनामध्ये सातत्य नव्हते. तथापि 'दिसामाजी थोडे लिहीत जावे 'या उक्तीप्रमाणे मी काही वर्षे नियमितपणे 'दैनंदिनी 'लिहीत होतो.हे करताना आपण काहीतरी लिहितोय याचं समाधान मिळत असे "
नारायणराव कुंभार ह्यांचा परिवार सुशिक्षित आहे.त्यांची पत्नी सौ. प्रतिमा कुंभार ह्या एक लेखिका आहेत.मराठी विषयाच्या शिक्षिका आहेत.त्यांनी 'प्रकाशाचे बेट'पुस्तक संपादित केले आहे.त्यामध्ये त्यांनी छ. संभाषजीनगर येथील त्यांचे वडील कै. प्रा.डॉ. मारुतीराव बारीकराव हिरे ह्यांच्या आठवणी संपादित केल्या आहेत. त्या कवयित्री आहेत. आकाशवाणीवरून त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.त्यांच्यामुळे नारायणराव कुंभार ह्यांना अशा लेखनाकडे कसे वळविले हे लेखकाने नमूद केले आहे.आपले आत्मानुभव हे वाचकांना उपयुक्त ठरावे ही लेखकाची इच्छा असते. आत्मपर, आत्मचरित्राचे काही हेतू असतात, त्यापैकी वाचकांना जीवनप्रेरणा हा महत्वाचा हेतू सांगताना नारायणराव कुंभार लिहितात,
"दैनंदिनी लेखनापासून सुरु झालेला हा लेखन प्रवास आता लिखित स्वरूपात पुस्तक स्वरूप धारण करीत आहे. माझ्या लहापणातील गावचे अनुभव मी यात मांडले आहेत. तसेच नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना, निवडक शहरांतील मला भावलेले अनुभवही मी यात कथन केले आहेत. या प्रत्येक अनुभवाने मला काहीतरी शिकवलं आहे. वाचकांना हे अनुभव वाचायला आवडतील अशी मी अशा करतो "
नारायणराव कुंभार यांचा स्वभाव सेवाभावी, निरपेक्ष आणि देतो तो देव स्वरूपाचा आहे.जीवनातील निर्मळपणा त्यांनी जपला आहे. अशा निर्मळ मनातच एक तीर्थस्थळ असते.तेच मला त्यांच्या लेखनात दिसते. निर्मळ मनातून पाझरलेले हे शब्दरूपी अमृतधन समाधान देणारे आहे.
'गोष्टी गावांशहरांकडील' ह्या आत्मपर लेखनाचे अनुक्रमणिकेत दोन भाग केलेले आहेत. 'ग्रामीण'ह्या पहिल्या भागात त्यांना आवडणारी 'मटकीची भाजी ', त्यांची प्रेमळ 'आई ' यामध्ये त्यांनी लिहिले, "माझ्या आईचे नाव गंगुबाई नामदेव कुंभार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एखतपूर हे आमचं गाव. माझं आजोळ जवळच मल्हार गडाच्या पायथ्याशी असलेलं सोनोरी गाव. आमच्या आजोबांची अंजिराची बाग होती. ते सावकार होते. त्यांच्याकडे घोडा होता. आईबरोबर घोड्यावर बसून आम्ही भावंडे आजोळहून एखतपूरला यायचो "(पृष्ठ 18)
आपली आई कशी कष्ट करणारी, निरक्षर पण मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवणारी होती, असे अनेक अनुभव वाचनीय आहेत. 'पहिली कमाई 'मध्ये भाऊ श्रीकांत व लेखकाने गावाच्या यात्रेत नारळ विक्रीचा व्यवसाय केला.जत्रेत उरलेले नारळ घरी नेले. लेखक लिहितात, "आईने ते फोडून, खोबरं वाळवून त्यात लाल तिखट घालून चटणी केली. शेजारी पाजारी देऊन सांगितले,'ही आमच्या पोरांची पहिल्या कमाईची आहे बरं "(पृष्ठ 23) अशी आईची परिस्थितीतही सकारात्मक दृष्टी असल्याचे लेखकाने लिहिले आहे.हाच संस्कार ते जपतात.या आत्मपर पुस्तकात गावातील गणपती उत्सव, यात्रा, शिक्षक, श्रावण महिना, वडिलांचे घड्याळ, शाळा, निवडणुकीतील गमती जमती, आंबा असे अनुभव वाचनीय आहेत.
'शहरी'ह्या दुसऱ्या भागात साहित्यिकांच्या भेटी, मधमाश्यांशी झुंज, नऊ जूनच्या आठवणी, वाचन छन्द, कंगवा, तेलगू चित्रपट, शिस्त, साहित्य संमेलन, हसणे, कविता असे अनुभवचिंतन आहे.मार्च 1974 ला अकरावी परीक्षा झाल्यावर पाहिलेला हिंदी चित्रपट 'आपकी कसम 'अलाहाबाद येथे बँकेत नोकरी करताना 10आगस्टचा फेस्टिव्हल, चहा पुराण, 'काय ते डोंगर, काय ती झाडी काय ते हॉटेल 'वाचताना आमदार शहाजी बापू पाटील ह्यांची आठवण होते. छायाचित्रण, बँकेचे बोधचिन्ह, 'एका अपूर्व भेटीचा पुनर्योग 'असे अनेक आत्मकथा प्रसंग येथे वाचण्यास मिळतात, ते अगदीच सहजसोप्या भाषेत मांडलेले आहेत. एक निर्मळ मनाचं आणि वास्तवदर्शी अनुभवांचं ही आत्मपर लेखनशैलीचं पुस्तक मनात घर करणारं आहे. सहजसोपी आणि ग्रामीण अनुभवांची भाषा असली तरी ती मौलिक जीवनपोषक आणि प्रबोधक आहे.126 पृष्ठांचे हे पुस्तक आई ह.भ.प.गंगुबाई नामदेव कुंभार आणि वडील ह.भ. प. नामदेव गोविंद कुंभार ह्यांना हे त्यांचे पहिलेच पुस्तक लेखकाने अर्पण केले आहे. रमेश नावडकर ह्यांनी छानच मुखपृष्ठ काढले असून अक्षरजुळणी व मुद्रक वेदिका एन्टरप्रायजेस, धनकवडी, पुणे ह्यांनी सौन्दर्यशील बनविले आहे. 220 रुपये किंमतीचे हे पुस्तक कुंभार समाजातील एक प्रभावी लेखन आहे.सहज, सरळ जगण्याची ही अमृतकुपी आहे, एवढे सामर्थ्य असलेले लेखन वाचक नक्कीच वाचतील आणि जाणकार व्यक्ती, संस्था लेखकाचा सन्मान करतील अशी सदिच्छा आहे.
श्रीरामपूर जि. अहमदनगर
भ्रमणसंवाद : 9270087640
संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर 9561174111

