कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे आणि तो अबाधीत ठेवण्यासाठी क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीकडून नानाविध प्रयत्न केले जात असताना त्यातील एक उपाय म्हणून पुढे आलेले गुलाबी चेंडूवर खेळले जाणारे दिवसरात्र कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेत व आर्थिक कमाईत वाढ होईल असे आयसीसीला वाटत होते. मात्र त्यांची हि आशा फारसी फळास आली नाही. पारंपारीक कसोटी क्रिकेट खेळताना काही ठोकताळे तयार झाले होते. सामन्याच्या सकाळच्या सत्रात वातावरण थंड व गोलंदाजास पोषक ठरत असल्याने सांभाळून फलंदाजी केल्यास फलंदाजांना मोठे यश मिळत असे. परंतु डे नाईट कसोटीत तिनही सत्रात गोलंदाजांनाच खेळपट्टी व वातावरण साथ देत असल्याने फलंदाज सतत दबावात राहात असत. त्यामुळे धावा मिळविणे मुश्किल बनत चालले होते. अशा परिस्थिती पाच दिवसांचा सामना फार फार तिसऱ्या दिवसअखेर संपून जायचा. त्यामुळे फलंदाजांचे रेकॉर्ड खराब व्हायचे. प्रेक्षकांचा हिरमोड व्हायचा. शिवाय सर्वात जास्त नुकसान व्हायचे ते ब्रॉडकास्टर व जाहिरातदारांचे. त्यांनी केलेली गुंतवणूक बघता संबंधितांचे भांडवलही वसूल होत नव्हते. अशा परिस्थितीत जाहिरातदार नाईट टेस्ट क्रिकेटकडे धजावण्यास तयार नव्हते. त्यामुळे मोठया नवलाईने सुरू केलेले दिवसरात्र कसोटी क्रिकेट कोणाला काही समजण्याच्या आतच बंद होण्याच्या स्थितीत आले.
नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये गुलाबी चेंडूची पहिली दिवस-रात्र कसोटी खेळली गेली. त्यानंतर मागील आठ वर्षात एकूण फक्त सोळा दिवसरात्र कसोटी सामने जगभरातून खेळले गेले. तिनही प्रारूपांतील क्रिकेटच्या सर्वात मोठया संस्करणास म्हणजे कसोटी क्रिकेटला त्याच्या दिर्घ काळ खेळण्याच्या व इतका वेळ दवडूनही जादा तर सामन्यात निकाल न लागण्याच्या प्रकारामुळे या ओरिजन क्रिकेटकडे लोक पाठ फिरवायला लागले होते. त्यामुळे कसोटी क्रिकेट लुप्त होते की काय अशी चर्चा सर्वत्र झडत असताना डे नाईट क्रिकेटचा प्रस्ताव समोर आला आणि तो योग्य त्या नियमांसह अंमलातही आणला. मात्र आठ वर्षात फक्त सोळा डे नाईट कसोटी सामने खेळले गेल्याने हा प्रयोगही फसला असल्याचे सकृतदर्शनी दिसू लागल्याने भारतीय क्रिकेट कट्रोल बोर्डाने ( बीसीसीआयने ) तूर्तास तरी भारतात डे नाईट कसोटी सामने स्थगित करायचे ठरविले आहे. जागतिक स्तरावरही दिवसरात्र कसोटी सामन्यांचे प्रमाण रोडावले असल्याचे हृदयद्रावक चित्र सध्या तरी दिसत असून डे नाईट क्रिकेट बंद होण्याच्या मार्गावर आहे. तूर्त तरी भारतानेच काही काळ ते थांबविण्याचा निर्णय घेतला असून इतर देशांचे क्रिकेट बोर्डही भारताची री ओढतील असे काही दिवसात आपल्याही निदर्शनास येईलच.
मागील तीन वर्षात आयसीसीने कसोटीची अजिंक्यपद स्पर्धा सुरू केल्याने पूर्वीचे पारंपारीक क्रिकेट पुन्हा एकदा खेळाडूंकडून जोमाने खेळले जाऊ लागले आहेत तर प्रेक्षकांकडूनही चवीने बघितले जात आहेत. कारण त्यामध्ये टि२० व वनडे क्रिकेटचा आक्रमकतेचा सणसणीत तडका बॅजबॉलच्या रूपाने दिला जात असल्याने सामन्याचा निकाल लागण्याची अलिखित हमीच मिळाल्याने प्रेक्षकांमध्ये प्रत्यक्ष मैदानात जाऊन कसोटी सामना बघण्याचा उत्साह संचारला आहे. जागतिक क्रिकेटचे मुख्य केंद्र असलेल्या भारतात कसोटी क्रिकेटलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आयसीसी व बीसीसीआयच्या गंगाजळीत मोठी वाढ होत आहे.
डे नाईट क्रिकेटचा विचार केला तर भारताचा रेकॉर्ड चांगला दिसतो. टिम इंडिया एकूण चार डे नाईट टेस्ट क्रिकेट खेळले असून त्यातील तीन सामन्यात जय तर एका सामन्यात पराजय झाला आहे. भारताने जिंकलेले तीनही सामने मायदेशात खेळले असून पराभव झालेला सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट सामना म्हणून गणला जातो. १९ डिसेंबर २०२० याच ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे भारताने कसोटी क्रिकेटमधील आपली निच्चांकी धावसंख्या नोंदविली होती. भारताचा तो पहिलाच डे नाईट कसोटी सामना होता. त्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांत भारताचा संपूर्ण संघ गुंडाळला गेला होता व एका नामुष्कीजन्य पराभवाचे तोंड टिम इंडियाला बघावे लागले होते.
डे नाईट कसोटी सामन्यात भारताची कामगिरी अशी राहिली. कोलकाता येथील प्रसिद्ध ईडन गार्डन मैदानावर भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिली गुलाबी चेंडू कसोटी खेळली. भारताने बांगलादेशचा डावाने पराभव करत सहज विजय मिळवला. विराट कोहलीने १३६ धावा करून आपले २७ वे कसोटी शतक झळकविले. यादरम्यान तो पिंक कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारताचा दुसरा गुलाबी चेंडूचा सामना डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. या फॉर्मेटमध्ये खेळलेला भारतासाठी हा सर्वात निराशाजनक सामना होता. कारण भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाकडून आठ गडी राखून पराभव स्विकारावा लागला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताने तिसरी गुलाबी चेंडू कसोटी इंग्लंडविरुद्ध खेळली. अहमदाबादमध्ये भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. ३८ धावात सहा व बत्तीस धावांत पाच असे सामन्यात अकरा बळी घेऊन अक्षर पटेलने घेतल्याने इंग्लंडवर भारताने १० विकेट्सने विजय मिळविला. त्यानंतर १२ मार्च २०२२ ला बंगलोरला सुरू झालेल्या श्रीलंकेविरूध्द भारताने दोन दिवसात बाजी मारून डे नाईट कसोटी जिंकली.
डे नाईट क्रिकेटचे प्रमुख आकर्षण म्हणजे गुलाबी चेंडू ! वनडे व टि२० पांढऱ्या रंगाच्या बॉलने खेळले जाते. पारंपारीक दिवसा खेळल जाणारे कसोटी क्रिकेट लाल चेंडूने खेळले जाते. मग डे नाईट क्रिकेटच गुलाबी चेंडूने का खेळले जात असावे ? असा प्रश्न पडणे साहाजिकच आहे. मुळात क्रिकेटची सुरुवातच लाल चेंडूने झाली. पण डे नाईट क्रिकेट आल्याने ते पांढऱ्या चेंडूने खेळले जाऊ लागले. त्याचे कारण असे की पांढरा चेंडू खेळाडूंना रात्री सहज दिसतो. लाल चेंडूने खेळताना दिवसाच्या कसोटीत तो खेळाडूंना दिसणे सुलभ जाते. पण डे नाईट कसोटींचा विचार सुरू झाला तेंव्हा नेमका कोणत्या रंगाचा चेंडू वापरायचा यावर मोठे प्रयोग व प्रात्यक्षिके झाले. सारासार अभ्यास केल्यानंतर डे नाईट कसोटीसाठी गुलाबी चेंडूची निवड करण्यात आली. सफेद चेंडू ३०-४० षटकेच चांगला दिसतो. मात्र नंतर तो खराब होत जातो व दिसण्यास त्रास होतो. कसोटी सामन्यात एक चेंडू ८० षटके वापरावा लागतो. त्यामुळे सफेद चेंडू वापरण्याचा विचार मागे पडला. रात्रीच्या खेळात लाल चेंडू दिसणे मुश्किल असल्याने त्याचा विचार मागे पडला. मग त्यानंतर गुलाबी चेंडूवर प्रक्रिया सुरू झाली. गुलाबी चेंडू बनवताना त्यातील रंगाची खूप काळजी घेतली जाते. त्यात रंगाचे अनेक थर लावले जातात. अशा स्थितीत त्याचा रंग फार काळ उडत नाही. त्याची दृश्यमानता खूप चांगली आहे. त्यामुळेच कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जातो.
आता मात्र येथून पुढे गुलाबी रंगाच्या चेंडूने खेळले जाणारे कसोटी क्रिकेट खेळले जाण्याची शक्यता नाही. त्याचे प्रमुख कारण खेळाडूंना होणाऱ्या अडचणी असल्या तरी ब्रॉडकास्टर व प्रायोजक यांचे होणारे नुकसान यांचाच प्रामुख्याने विचार केलेला दिसतो.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

