कमाल निसर्गाची...साथ वैज्ञानिकांची...संगमनेरी शेळीला झाली तब्बल पाच करडे..!!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने दिला पाच करडांना जन्म- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील..!!
राहुरी विद्यापीठ, : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अ. भा. समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात. या अंतर्गत संगमनेर केंद्रातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी श्री. अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळयांच्या कळपातील शेळ्यांनी विद्यापीठाने दिलेला नर एस.एम.-410 द्वारे प्रजनन केलेल्या दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे व एका शेळीने पाच करड़े देण्याचा विक्रम केला आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या 3000 वरून 50000 पर्यंत नेण्यात यश मिळविले आहे. हा प्रकल्प कार्यक्षमरित्या राबविण्यासाठी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले असे संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले. सदर करडांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना व संगोपन करण्यासंबधीचे मार्गदर्शन संगमनेर केंद्रातील प्रक्षेत्र गणक श्री. प्रवीण फटांगरे करत आहेत.
संगमनेरी शेळीचे काही वैशिष्ट्य......
सध्या अनेक तरुण शेळीपालन व्यवसायाकडे वळले आहेत. अनेक ठिकाणी संगमनेरी शेळीला प्राधान्य दिले जाते. संगमनेरी शेळी मांस आणि दूध उत्पादनासाठी जास्त चांगली असते असे मानले जाते. या शेळीचे संगमनेर हे मूळ स्थान असल्याने या जातीचे नाव संगमनेरी असे पडले.
या शेळीची खास ओळख असते ती म्हणजे शिंगे. या शेळीची शिंगे पातळ, टोकदार, तसेच मागे वळलेली आणि वरच्या दिशेने असतात तर काही शेळ्यांना शिंगेच नसतात. यात दोन कलर असतात. पांढऱ्या आणि तपकीरी अशा दोन रंगात या शेळ्या आढळतात.
ही शेळी साधारण १८० दिवस अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देते. यात शेळीचे वजन साधारणपणे ३२ किलोपर्यंत तर बोकडचे वजन ३९ किलोपर्यंत असते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
कमाल निसर्गाची...साथ वैज्ञानिकांची...संगमनेरी शेळीला झाली तब्बल पाच करडे..!!

