कुंभार समाजातील सुशिक्षित माणूस लिहू लागला आहे,ही अभिनंदनीय वाटचाल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव येथील डॉ.डी.डी.तथा दादासाहेब दत्तात्रय कुंभार ह्यांनी लिहिलेले 'कुंभकार :बलुतेदारी -शिक्षण -आत्मपरीक्षण 'हे आत्मचरित्र समाजप्रबोधक आणि सांस्कृतिकदृष्टया मौलिक स्वरूपाचे आहे. प्रकाशक सौ. मालन दा. कुंभार, कोल्हापूर ह्यांनी हे आत्मचरित्र 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित केले. यशवर्धने खटावणे ह्यांनी अनुरूप मुखपृष्ठ काढले आहे. शाहूनगरी, कोल्हापूर येथील भारती मुद्रणालयमध्ये हे पुस्तक छापले आहे.150 रुपये किंमत असलेल्या ह्या पुस्तकाला 112 पृष्ठे आहेत.अनेक संत, महात्मे कार्य करतात, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.आपल्या पुस्तकावर मनोगत व्यक्त करताना ह्या पुस्तकाच्या संदर्भात लेखक लिहितात,
"अशा पुस्तकांच्या वाचण्याच्या व्यसनामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व प्रकारचे अनुभव कथन करण्याचा मनोदय झाला "त्यामुळे हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. ते पुढे लिहितात,
"--कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्यतत्पर राहणे,म्हणजे यश आणि अपयश यांची जाणीव होणार नाही तसेच ज्ञान व श्रम घेण्याची प्रबळ इच्छा निःस्वार्थी असेल तर जात -धर्म,गरीब-श्रीमंत, आधार (टेकू )इत्यादी आपल्या कार्याच्या आड येत नाहीत.अपयश आल्यानंतर खचून जायचे नाही,कारण तेच अपयश आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखविते.मी हे आपणासमोर माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.देव अनेक रूपकात्मक पद्धतीने प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतो', परंतु ती ओळखण्याची पात्रता आपण निर्माण केली पाहिजे "
डॉ. दादासाहेब कुंभार ह्यांची हीच तत्वस्पर्शी जीवनरेखा त्यांच्या आत्मचरित्रात दिसून येते. ह्या पुस्तकात 17 प्रकरणे अनुक्रमणिकेत दिलेले आहेत, त्यातून आत्मचरित्राचे आशयविश्व त्यात सामावले आहे.
'जन्मभूमी -योनीभूमी -कर्मभूमी 'ह्या पहिल्या लेखात त्यांनी आपले गाव कौलवचे वेगळेपण सांगितले आहे.अशा सुजलाम सुफलाम गावात, पवित्र भूमीत लेखकाचा जन्म 24 फेब्रुवारी 1945 रोजी झाला. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्याला लेखकाने योनीभूमी म्हटले आहे. त्याचबरोबर कुंभार समाजाची प्रजापती, राजे ह्या नावाची चर्चा त्यांनी केली आहे. कुंभार समाज प्रजेच्या हितावह कामे करीत असल्यामुळे कुंभार समाजासाठी प्रजापती नाव पडले आणि कार्यकुशल कुंभार प्रजेच्या महत्वाच्या गरजा स्वतः भागवितो, म्हणून त्याला खेडेगावात 'राजे'या टोपण नावाने संबोधतात (पृष्ठ 08) नवीन पिढीने शिक्षण घेऊन उद्योग,नोकरी, व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये उतरून वेगळ्या कर्मभूमीची आस धरली पाहिजे, ही काळाची गरज आहे. (पृष्ठ 09) असे लेखकाने नमूद केले आहे.कुंभार समाज हा बारा 'बलुतेदारी'मधला घटक असल्याचे सांगून सविस्तर लिहिले आहे.'आनंदी गोपाळ -परिवार वृंद 'लेखात कुटुंब परिचय आहे.आजी, आजोबा, आई, वडील, लेखक व त्यांचे पाच भाऊ,दोन बहिणी अशा मोठ्या परिवारात लेखकाचे शिक्षण झाले.आजी साथीत वारल्यावर लेखकाच्या आई सावित्रीवर संसाराची सर्व जबाबदारी आली. लग्नाची वेळीं त्यांचे वडील दत्तात्रय पंधरा -सोळा वर्षाचे होते तर त्यांची आई तेरा -चौदा वर्षाची होती. घरी कुंभारकाम, शेतीकाम भरपूर होते.शिक्षण आणि घरातील कामे करीत लेखक शिकले. 1968 मध्ये त्यांनी बी.एस्सी.कृषी पदवी घेतली. 1977 मध्ये ते एम.एस्सी. झाले. 1986 मध्ये पीएच. डी. झाले. एम. एस्सी. मृद्शास्त्र पदवीसाठी त्यांना फेलोशिपही मिळाली.तेरा वर्षे या क्षेत्रात त्यांनी संशोधन केले.राहुरी, पुणे, कोल्हापूर या क्षेत्रात कार्य केले.कृषी क्षेत्रात प्राध्यपक म्हणून दर्जेदार संशोधन केले. राष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे पंचवीस शोधनिबंध प्रसिद्ध झाले. राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी सोळा शोधनिबंध सादर केले. शेतकऱ्यांसाठी त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित झाले. 2003 मध्ये त्यांनी हनुमान भक्त चॅरिटेबल ट्र्स्टची स्थापना करून मंदिराची उभारणी केली.1989 मध्ये त्यांनी श्री रत्नप्पा कुंभार नगर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आजही ते संस्थापक, संचालक म्हणून कार्यरत आहेत. आर. के. नगर सो. नं. 1च्या संचालक मंडळात 10 वर्षे ते कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यालय इमारत, सांस्कृतिक हॉल, बाग इत्यादी कामात त्यांनी योगदान दिले.आपल्या कुटुंब स्थितीविषयी लिहितात,
"सन 1982 मध्ये सर्व भाऊ स्वतंत्र झाले. आई संभाजीकडे राहत होती. वडील आनंदरावाकडे. वडील दत्तात्रय कुंभार 2001 मध्ये वारले. आई सावित्रीमाई 2013 मध्ये वारली. आईचे औषधपाणी व खर्च मी महिन्यास करीत होतो. आता भावाच्या मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे व्यवसाय चालू केले आहेत. परंतु चांगले शिक्षण कोणीच घेतले नाही, याची खंत वाटते "(पृष्ठ 23)
डॉ. दादासाहेब कुंभार आणि त्यांची पत्नी सौ. मालन कुंभार ह्यांनी आपल्या संसाराला आदर्श बनविले. "माझ्या जीवन परिक्रमातील गृहिणी, सहचारिणी व अर्धांगिनी "मध्ये त्यांनी लिहिले आहे,
"माझी सहचारिणी अनेक सद्गुणांचा सागर आहे. महत्वाचे म्हणजे ती सुशिक्षित असून सासरच्या खेडवळ वातावरणाशी जुळवून घेते. सासरच्या संबधित लोकांशी माझ्यापेक्षा तिचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.तिच्या हातचा स्वयंपाक उत्तम असतो, असे अनेक पै -पाहुणे म्हणतात. घरी येणाऱ्या सर्वांचे सारख्या पद्धतीने आदरतिथ्य करते. कपडे व दागदागिन्यांविषयी इच्छा कधी केली नाही."(पृष्ठ 103)
डॉ. दादासाहेब कुंभार ह्यांची पत्नी बालवाडीत काम करून संसाराला हातभार लावी. मुलगी संगीता एम. एमस्सी.झाली, मुलगा सचिन इंजिनिअर झाला. 2003 मध्ये डॉ. दादासाहेब कुंभार सेवानिवृत्त झाले.सात्रळ येथील तात्यासाहेब जोर्वेकर ह्यांच्या आठवणी त्यांनी चर्चेत सांगितल्या.राहुरी, नगर, सात्रळ परिसरात त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. समाजकार्य, लेखन, वाचन ह्यांची त्यांना आवड आहे. एक सुंदर आणि प्रबोधक असे हे आत्मचरित्र कुंभार समाजातील उच्च शिक्षित आणि सद्गुणी व्यक्तिमत्वाचा आदर्श सांगणारे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावे असे उद्बोधक आहे.
*परीक्षण :डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर जि. अहमदनगर
भ्रमणसंवाद :9270087640
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

