भारताचा तत्कालिन नियमीत यष्टीरक्षक रिषभ पंत एका अपघातात गंभीर जखमी झाला. त्या घटनेला आता दोन वर्ष होत आलीत. त्यानंतर टिम इंडियाकडून खेळण्यासाठी जणू यष्टीरक्षकांची स्पर्धाच सुरू झाली. कधी संजू सॅमसन, तर कधी के एस भरत, मध्ये मध्ये इशान किशन व जितेश शर्मा आणि आता वनडे व कसोटीत के एल उर्फ लोकेश राहुल भारतीय संघात यष्टीमागे कर्तव्य बजावत आहेत. मात्र के एल राहुल त्याच्या फलंदाजी कौशल्याच्या बळावर संघात आहे व त्याला जोड म्हणून यष्टीरक्षणाचा तडका देत असल्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे झुकते माप त्याच्या पारड्यात सातत्याने पडत आहे. के एल राहुल व राहुल द्रविड दोघेही कर्नाटकचे असल्याने इतरांपेक्षा द्रविडचे झुकते माप के.एलला अनेकदा मिळताना आपण बघितले आहेच. त्यामुळे स्पेशल यष्टीरक्षक म्हणून कारकिर्द घडवू पाहणाऱ्या खेळाडूंना हताश, निराश होऊन मानसिक धक्के सहन करावे लागत आहे.
याचे उदाहरण म्हणजे ईशान किशन. महेंद्रसिंग धोनी ज्या झारखंड मधील आहे तेथील रांचीचाच हा किशन आहे. धोनीलाच आदर्श मानून त्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच ईशान मार्गक्रमण करत आहे. सन २०१८ च्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत याच ईशानने भारताचं नेतृत्व केलं होतं आणि त्या संघात रिषभ पंत होता. परंतु पुढे जात ईशानच्या तुलनेत पंतला क्रिकेटच्या तिनही प्रारूपात मोठ्या प्रमाणात संधी दिल्या जात होत्या. कधी कधी तर पंत सतत अपयशी ठरूनही त्यालाच झुकते माप दिले जात होते. परंतु नियतीच्या कालचक्रात पंत अडकला आणि किशनला संधी मिळू लागल्या. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करूनही कधी जितेश तर कधी सॅमसन तर कधी भरतला, त्याला डावलून संधी दिली जात आहे. वनडे व कसोटीत चांगली कामगिरी बजावत असल्याने तेथे तो स्थिरस्थावर होतोय असे वाटत असतानाच मोठया दुखापतीतून सावरून परतलेल्या फलंदाज के एल राहुलला प्रशिक्षक द्रविडने कानमंत्र देऊन यष्टीरक्षक बनवले. के एलने आशिया चषक, विश्वचषक व द. आफ्रिकेत वनडे व कसोटीत बऱ्यापैकी यष्टीरक्षण केल्याने ईशान किशनची सातत्यमय कामगिरी द्रविडच्या विस्मरणात गेली. त्याचा विपरीत परिणाम किशनच्या मानसिकतेवर झाला. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौरा मध्येच सोडून मायदेशी परतण्याची पाळी आली.
दक्षिण आफ्रिकेत खेळताना दोन कसोटयात प्रथमच के एलने यष्टीरक्षकाची भूमिका बजावली. तेथे जलदगती गोलंदाजांचे चेंडू सरळ तर कधी उसळी घेऊन राहुलकडे जात होते. त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून त्याचा फारसा कस लागला नाही. तरीही दुसऱ्या कसोटीत निर्णायक क्षणी एडन मार्करमचा हातातला झेल सोडून भारताला संकटात टाकले होते. पुढे जात मार्करमने शतक ठोकून भारताच्या आशांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताचे गोलंदाज व नंतर फलंदाजांनी आपले काम चोख बजावल्याने राहुलची गंभीर चुक झाकली व तिचा फारसा गवगवा झाला नाही.
भारतात अफगाणिस्तान विरूध्द होणाऱ्या तीन सामनांच्या टि२० मालिकेसाठी चौदा महिन्यांच्या गॅप नंतर रोहित शर्मा व विराट कोहली संघात परतले. तसे पहाल तर त्या दोघांची वनडे विश्वचषकात सरस कामगिरी झाल्यामुळे त्यांना झुकते माप मिळाले. मात्र राहुल टि२० फॉरमॅटमध्ये फारसा यशस्वी नसल्याने त्याची निवड झाली नाही. मात्र मार्च - एप्रिल मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो जूनमध्ये होणाऱ्या टि२० विश्वचषकाच्या संघात परतला तर आश्चर्य मानू नये. यामध्ये त्याच्या पेक्षा द्रविड व पडद्यामागच्या सुत्राधारांचीच मोठी भूमिका असेल.
के एल एक फलंदाज म्हणून दर्जेदार आहे. यष्टीरक्षकाची कामचलाऊ भूमिकाही तो बजावू शकतो. परंतु कर्णधार म्हणून त्याच्यात विशेष अशी चमक नाही. तरी त्याला पूर्वी साध्या रणजी सामन्यांचा अनुभव नसतानाही थेट भारताच्या कसोटी, वनडे संघाचे नेतृत्व करण्याची संधीही दिली गेली. साधे आयपीएल मध्येही पंजाब व आता लखनौचे नेतृत्व करताना त्याला छाप पाडता येत नसलेल्या राहुलला चक्क भारताच्या कॅप्टनसी कोरमध्ये गणले जात आहे. या मागेही राहुल द्रविडचा वरदहस्त स्पष्ट दिसतो.
येत्या २५ जानेवारीपासून इंग्लंडचा संघ पाच कसोटींची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. सदर मालिका वर्ल्ड टेस्ट चॅंपियन शिपचा हिस्सा असल्याने बीसीसीआय फिरकीला धार्जिण्या खेळपट्टया बनवणार हे उघड आहे आणि त्या आखाडा खेळपट्टयांवर रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, कुलदिप यादव, अक्षर पटेल यांचे अफलातून वळणारे चेंडू अडविताना, झेल पकडताना व यष्टीचित करताना के एल राहुलची मोठी परवड होऊ शकते, आणि त्याचा परिणाम टिम इंडियाच्या कामगिरीवर व पर्यायाने यशापयशावर होण्याची शक्यता असल्याने राहुलला श्रेयस अय्यर ऐवजी निव्वळ फलंदाज म्हणून खेळवण्याची शक्यता असून ईशान किशन या तंत्रशुद्ध यष्टीरक्षकाला पुन्हा यष्टयांमागे उभे राहण्याची संधी मिळू शकते.
राहुलच्या फलंदाजीचा पूर्व इतिहास तपासला तर एका सामन्यात चांगला खेळल्यानंतर पुढचे ५-६ डाव फेल जातो. सातत्य हा प्रकार त्याच्या फलंदाजीत नसल्याने गुणवत्ता असूनही सिने अभिनेता सुनिल शेट्टीचा जावई असलेला केएल राहुल आपल्या प्रतिभेला न्याय देऊ शकला नाही. आता इंग्लंडविरूध्द विकेटकिपर म्हणून तो शंभर टक्के अपयशी ठरण्याची शक्यता असल्याने एक सेफ गेम म्हणून त्याला यष्टीरक्षणापासून दूर ठेवले जाईल व पुन्हा परदेशात तोच यष्टीरक्षक म्हणून दिसल्यास आपण चकीत होऊ नये.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२.

