सातारा प्रतिनिधी:
भाषेत दोन गोष्टी आहेत ,तर्क आणि सौंदर्य .साहित्य वाचल्याने आपल्या जीवनात सौंदर्य येते. पण साहित्य शिकावे लागते. संवाद साधत असताना आपण तर्क बुद्धी यांचा वापर कसा करीत आहोत हे समजून घ्यावे लागते .भाषा केवळ संवाद करण्यासाठीच नाही तर त्यामुळे आनंदी संवाद होणे आवश्यक असते. भाषा ऐकत रहायला हवी अशी सुंदर बोलली पाहिजे. कायदा आणि व्यवसायाची भाषा ही बंदिस्त करार पद्धतीची भाषा असते. पण माणूस काय फक्त व्यर्थ देवाण घेवाण करण्यासाठी भाषेचा उपयोग करीत नाही.
भावनिक,बौद्धिक ,वैचारिक असे अनेक आयाम भाषेला असतात म्हणूनच आपण वैश्विक साहित्य वाचून साहित्याची भाषा आत्मसात करायला हवी. व्यवहारिक भाषेत रटाळ बोलणे चांगले नाही. साहित्यात तोच तोच पणा उपयुक्त नसतो. साहित्य हे प्रोडक्ट नाही .साहित्य म्हणजे जीवनाचा जिवंतपणा टिकविणारे साधन आहे. म्हणूनच जीवनात तर्कबुद्धीबरोबर सौंदर्यदृष्टी असण्याची आवश्यकता आहे असे मत प्रसिद्ध लेखक,भुरा या आत्मकथनाचे लेखक , जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच भाषेचे प्राध्यापक डॉ.शरद बाविस्कर यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ज्ये मराठी विभाग व इंग्लिश विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ‘साहित्याची भाषा ‘या विषयावर बोलत होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत त्यांचे व्याख्यान व भुरा या आत्मकथनावर लेखक म्हणून त्यांची मुलाखत ,अशा दोन कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.एन. डी पाटील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.रोशन आरा शेख, मराठी विभाग प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ , सातारच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष वाघमारे, डॉ.कांचन नलवडे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील साहित्याची सद्यस्थिती संदर्भात बोलताना डॉ.बाविस्कर पुढे म्हणाले की ‘ आज जे साहित्य शिकवणारे प्राध्यापक आहेत त्यातील अनेकांच्या घरात साहित्याची पुस्तके दिसत नाहीत. असली तरी वाचत्त नाहीत. साहित्यभाषा केवळ काल्पनिक नसते. भाषा शब्दाचे विविध अर्थ असून , तर्क .अभ्यास ,विवेक या गोष्टी लोगस मध्ये आहेत. स्वातंत्र्य हा माणसांचा मुलधर्म आहे. साहित्यात सूचितार्थ ,संकेतीतार्थ , सौंदर्य असते. भूल देऊन माणसे बेशुद्ध केली जातात. जे साहित्य लोकांना झोपवते ,बेशुद्ध करते ते साहित्य नसते. जे ऐकून आपल्याला जिवंत झाल्यासारखे वाटते ,ज्याने आपल्याला सावध केले जाते, जे होशमध्ये आणते ते साहित्य असते. साहित्य हे वाच्यार्थ असतेच पण संदिग्ध असते. वस्तू आणि शब्द यांच्यातील अंतर कमी असते तेंव्हा वाच्यार्थ असतो. तर वस्तू आणि शब्द यांच्यातील अंतर वाढते तेंव्हा वस्तूचे सौंदर्य वाढत जाते.
भाषेसौंदर्य शास्त्र आपल्याला यायला हवे. १० पैकी ८ मास्तरांना शिकवणे माहिती नाही ,त्यांच्याकडे पुस्तके नाहीत ,मग त्यांचे भाषेवरचे प्रेम कसे वाढणार ?
आज डॉक्टर ,इंजिनियर या पेशातील माणसे साहित्य वाचून भाषा अवगत करतात पण साहित्य शिकवणारे लोक वाचतच नसतील तर कसे भाषा सौंदर्य कळणार ?
साहित्य वाचल्याने आपल्या जीवनात सौंदर्य येते. म्हणून वाचले पाहिजे .फ्रांसमध्ये एका घरात तीन तीन ग्रंथालये असतात. त्यांच्या टोयलेट मध्ये देखील ग्रंथालय असते. फ्रांसचे लोकांना मनापासून वाटते की आपल्या जीवनात सौंदर्यशास्त्र असावे. तिकडील वैज्ञानिक देखील साहित्य वाचतात. आपली विचार क्षमता ,कल्पना क्षमता , स्मरण क्षमता चांगली व्हावयाची असेल तर विज्ञान तसेच साहित्य वाचले पाहिजे.आपल्या त्याच त्या सवयी मोडून टाका. साहित्याची भाषा केवळ पुस्तकात नसते. ती जगण्यात देखील असावी. जीवन एकारलेले नसावे .स्वतःची ,आई, पत्नी , वडील यांच्याशी कसे बोलावे हे अजून काहीना कळत नाही. शिक्षणाला आपण रटाळ बनवू नये. शिकविण्याला आनंदी बनवायला हवे.नुसती विद्यार्थ्यांना नेट वरून माहिती देणे घेणे म्हणजे शिकविणे नसते. शिकविलेल्या आशयाचा रीलेव्हन्स सांगणे आवश्यक असते. त्यासाठी वाचले पाहिजे. जेथे शिक्षणाचा ऱ्हास होतो ,तेथे भोंदुगिरी वाढते. म्हणूनच साहित्यातील मांडणीची पद्धती खूप महत्वाची असते’ असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या सुरवातीस कर्मवीर प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. डॉ.शरद बाविस्कर यांचा परिचय प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी करून दिला. दुसऱ्या सत्रात भुरा या आत्मकथन संबंधी वाचनातून जे महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले त्या विषयी डॉ.बाविस्कर यांची मुलाखत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी घेतली. भुरा मधील तत्वचिंतन संदर्भात बाविस्कर यांनी आपली भूमिका मांडली. शेवटी आभार डॉ.बाबासाहेब कांगुणे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र तांबिले यांनी केले. या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या अग्रणी व घटक महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी ,सावित्रीबाई फुले महाविद्यालयातील विद्यार्थी, सातारा येथील ॲड.काटकर , साहित्यप्रेमी नागरिक ,नवोदित लेखक ,पुस्तक विक्रेता सिद्धार्थ साठे ,इत्यादी अनेकजण उपस्थित होते.
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

