त्रिपुटी येथील रघुनाथमल दरगाजी ओसवाल विद्यालयात पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन...
सातारा - शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याने सदैव जिज्ञासु असले पाहिजे. प्रश्न विचारत गेलो म्हणूनच माणसाची प्रगती झाली आहे. म्हणूच अगदी श्रद्धा असली तरी चिकित्सा केलीच पाहिजे. सत्यवानाच्या सावित्रीच्या पेक्षा जोतिराव फुले यांची स्वाभिमानी सावित्री ही आपली प्रेरणा आहे. जी जिवंत राहून इतरांचे दुःख दूर करत होती. न्यायासाठी झुजंत होती. पंडित नेहरू यांनी आपल्या भाषणात वैज्ञानिक दृष्टीकोन यावर आधारलेला भारत उभा करण्याचे आवाहन केले होते. आजही देशात जर आपण चिकित्सक झालो नाही. यथार्थ ज्ञान मिळवले नाही तर मागास राहू.म्हणूनच कुणालाही न घाबरता ज्ञान मिळवण्यासाठी सत्यशोधक झाले पाहिजे.कितीही मोठा माणूस असू द्या,आपण प्रश्न विचारा,निर्भय व्हा चिकित्सा करून ज्ञान घ्या’ असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यकत केले. ते त्रिपुटी येथील रघुनाथमल दरगाजी ओसवाल विद्यालय जांब-त्रिपुटी कोरेगांव या विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोरबापू बाचल हे उपस्थित होते. या कार्यक्रमास श्री.रजनीकांत भंडारी, श्री.निलेश दोशी,श्री.सुधाकर कुलकर्णी, सागर भुंजे ,शाळा समितीचे चेअरमन श्री.सुहास भांडारे, श्री.देवीचंद ओसवाल, प्रदीप बाचल, सुरेश कुलकर्णी, श्री.किशोर बर्गे,रतन काटकर, विष्णूकाटकर,मधुकर निकम, गणेश बर्गे,सुरज भंडारी,संदेश गोसावी,विद्यार्थी प्रतिनिधी अभिनव व समृद्धी निकम इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलन असल्याने विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक खूप आनंदाने आणि मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते.
विविध प्रकारचे मार्गदर्शन करत असताना प्रा. डॉ.वाघमारे म्हणाले की’ विद्यार्थी दशेत मुलांच्या मनात अनेक प्रकारच्या नवनवीन कल्पना सुचत असतात ,त्यातून कलावंत तयार होत असतात. शिक्षकांनी व्यक्तिगत लक्ष देऊन विद्यार्थ्याच्या मनाचा आणि त्याच्या भोवतालच्या सामाजिक ,कौटुंबिक पर्यावरणाचा अभ्यास केला पाहिजे मन घडवील तसा माणूस घडत असतो. अगदी माणसानेच देवाला सुद्धा तयार केले आहे.. माणूस हाच ईश्वराचा देखील निर्माता आहे. म्हणूनच माणसांच्या विविध कृतीउक्तीचा अभ्यास आपल्याला करणे अभिप्रेत असते. भोवतालचा वर्तमानकाळ हाच आपला सोबती आहे. वर्तमान काळातील घडामोडीवर विद्यार्थ्यांनी सतत लक्ष ठेवले पाहिजे.वर्तमानपत्रांचे वाचन करायला हवे.इंग्रजीसहित अनेक भाषा शिकल्या पाहिजेत.अगदी दुसऱ्या देशात विमानाने जायचे सुद्धा स्वप्न पूर्ण केले पाहिजे. बेरोजगारी जावी यासाठी शासनाने मार्ग काढले पाहिजेत.नवनवीन कौशल्ये घेऊन त्यांना करियरकडे नेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर निर्व्यसनी रहावे.आळसी राहू नये. शाळा कदापि सोडू नये. आपले आरोग्य ,शिक्षण ,जीवनमान ,राहणीमान सुधारणे हे महत्वाचे प्रश्न असून भांडण वाढवणाऱ्या प्रश्नात आपण मश्गुल होऊ नये. दारूने बरबादी होते म्हणून या प्रकारच्या व्यसनात कधी अडकू नये. आपल्याला येणाऱ्या चांगल्या गोष्टी शिकून त्याचा समाजाला देखील फायदा करून दिला पाहिजे. कुसुमाग्रजांच्या’ कोलंबसाचे गर्वगीत’ कवितेत ..अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा,किनारा तुला पामराला ही ओळ आहे. समुद्राला किनारा आहे पण माणसाच्या आशेला नाही. माणसात अनंत आशा जन्म घेत असल्यातरी बहुजन हित करणाऱ्या आशा घेऊन आपण पुढे वाटचाल केली पाहिजे असे ते म्हणाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुरभी दालन, तृणधान्य ,कडधान्य याचा उपयोग करून तयार काढलेल्या मनमोहक रांगोळी ,कला दालन,भारताची अवकाश भरारी दालन, विविध प्रकारची हस्तलिखिते पाहून त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आस्था आणि कल्पकतेतून सुंदर व विचारी कलाकृती निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे कौतुक केले.तसेच त्यांनी कला जीवनात कशा आनंद देतात यासाठी त्यांनी ‘अश्विनी येना, गंमत जंमत चित्रपटातील काही गीते सादर केली.
अध्यक्षीय भाषणात किशोर बापू बाचल यांनी शाळेची प्रगती करण्यासाठी साथ देणाऱ्या पालक,शिक्षक व विद्यार्थी यांच्या कार्याबद्दल गुणगौरव केला. विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत तयार केलेल्या वस्तूबद्दल संस्थेचे अध्यक्ष ,पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनी यांनी प्रार्थना, स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका सौ.लता खराडे यांनी केले. आभार स्नेहसंमेलन प्रमुख श्री.अशोक शिंदे यांनी मानले.तर सूत्रसंचालन सौ.माधुरी घोरपडे यांनी केले. शेवटी वंदेमातरम हे राष्ट्रीय गीत श्री.माळवदे यांनी गायले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
२० व २१ जानेवारी या दोन दिवसात शाळेत स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला.
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

