एक संकट आलं की, त्यामागून संकटांची मालिकाच सुरू होते, आणि अशीच गत टिम इंडियाची झाली आहे. सन २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या गाबा कसोटीपूर्वी झाली अगदी तशीच अवस्था सध्या भारत - इंग्लंड मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी पूर्वी टिम इंडियाची झाली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे संघापासून दूर आहे. तर पहिल्या कसोटीपूर्वी वरिष्ठ खेळाडू विराट कोहली खाजगी कारणांमुळे संघाबाहेर गेला. दोन कसोट्यांना तो मुकणार होता. त्यानंतर हैद्राबाद कसोटीत विजय निश्चित असताना विजयाचा घास तोंडातून ओरबाडून काढून इंग्लंडने भारताच्या जखमेवर अक्षरशः दोन्ही हातांनी मीठ चोळले. भारताच्या पराभवाच्या जखमा ताज्या असतानाच हैद्राबाद कसोटीच्या पहिल्या डावात ऐंशीपेक्षा जास्त धावा करणारे के एल राहुल व रविंद्र जडेजा वैयक्तीक दुखापतींमुळे संघाबाहेर गेले. जडेजाने अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगलीच छाप सोडताना गोलंदाजीतही दोन्ही डावात मिळून पाच बळी घेताना इंग्लंडचे वीस बळी घेण्यात आपल्या सहकाऱ्यांना मदत केली. मात्र तो व केएल राहुल पायाला दुखापत झाल्यामुळे संघात नाहीत.
खेळाडूंच्या दुखापती दिवसेंदिवस वाढत असतानाच संघात उपलब्ध असलेल्या खेळाडूंचा धावांचा ओघही कमी झाला असल्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाला आहे. पूर्वी सलामीला खेळणाऱ्या शुभमन गिलने चेतेश्वर पुजाराच्या गच्छंतीनंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा धावांचा ओघ बिलकुल आटला असून त्याच्या मागील दहा डावांमधील धावा बघितल्यास त्याला तातडीने संघातून हाकलून द्यावे असे वाटेल. १८, ०६, १०, नाबाद २९, ०२, २६, ३६, १०, २३, ००. एकूण १६० धावा. यामध्ये शतक सोडा साधे अर्धशतकही नाही. त्यानंतर श्रेयस अय्यरची कामगिरी डोळ्यासमोर येते. त्याचीही कामगिरी गिलपेक्षा वेगळी नाही. ०४, १२, ००, २६, ३१, ०६, ००, नाबाद ४, ३५, १३, एकूण १३१ धावा. शतक, अर्धशतकांपेक्षा याच्यात शुन्याचाच भरणा जास्त दिसतो. श्रेयस माजी उपकर्णधार अजिंक्य राहणेच्या फेल्यूअरमुळे संघात आला आहे. संघातल्या दोन प्रमुख फलंदाजांची कामगिरी सातत्याने खराब होत असेल तर कोणता संघ जिंकेल. कोहली, जडेजा, राहुल सारखे संघातले प्रमुख खेळाडू जर आता संघात असते तर कदाचित गल व श्रेयसची iसंघातून उचलबांगडी नक्कीच झाली असती. विशाखापट्टण दुसऱ्या कसोटीत त्यांना नाईलाजाने संधी मिळेल असे वाटते. दुर्दैदैवाने ते अपयशी ठरले तर त्यांची टिम इंडियातून एक्झिट पक्की समजावी.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतणारे मध्य प्रदेशचा रजत पाटीदार व मुंबईचा सर्फराज खान यांना टाळायचे सर्व पर्याय संपल्यानंतर नाईलाजास्तव सोळा जणांच्या चमूत स्थान दिले मात्र पहिल्या अकरा जणांमध्ये या दोघांपैकी कोणाला संधी मिळेल ? यासाठी ३ फेब्रूवारीच्या सकाळपर्यंत वाट बघावी लागेल. सर्फराज व पाटीदार बरोबरीने वॉशिंग्टन सुंदर व सौरभ कुमारची वर्णी लागली आहे. दोघेही स्पिन ऑलराऊंडर आहेत. सन २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या गाबा कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती, तिचे त्याने सोने केल्याने ३३ वर्षानंतर कांगारूंचा मायदेशात पराभव झाला होता. सुंदरला अनेकदा संधी मिळाल्या मात्र बऱ्याचदा दुखापतीमुळे त्याच्या संधी हुकल्या. पण पूर्ण फिट असताना तो जेंव्हा जेव्हां खेळला त्या प्रत्येक वेळी तो यशस्वी झाल्याने जडेजाच्या जागेवर तोच खेळताना दिसू शकतो. श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, जसप्रित बुमराहा यांचे स्थान निश्चित दिसते. मोहम्मद सिराज व कुलदिप यादव या दोघांपैकी एकाची निवड खेळपट्टीचे स्वरूप बघून केली जाईल. खेळपट्टी फिरकीस पोषक असेल तर कुलदिप व वेगवान गोलंदाजांना साथ देत असेल तर सिराज खेळताना दिसेल.
खेळाडूंचा फॉर्म व फिटनेस भारतीय संघासमोरील गहन विषय असला तरी इंग्लंडने हैद्राबादमध्ये कागदावरच्या सरसतेपेक्षा चांगला खेळ केला व अनपेक्षित विजय मिळविला. त्यामुळे इंग्लंडला हलक्यात घेण्याची चुक टिम इंडियाला महागात पडेल. टिम इंडियाकडून अंतिम अकरा जणांना कोणत्याही भूमिकेत संधी मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाला आपले योगदान द्यावे लागेल. तरच भारताला इंग्लंडचे आव्हान परतून लावता येईल. इंग्लंडला स्वतःच्या फिरकी गोलंदाजांची भेडसावणारी चिंता पहिल्या सामन्यातील विजयामुळे संपली असे जर त्यांना वाटत असले तर ती त्यांची मोठी चूक ठरेल. कारण टिम इंडिया पहिल्या सामन्यातला पराभव सहजासहजी घेणार नाही. पलटवार करून इंग्लंडला धडा शिकवू शकते. भारताचे गिल, अय्यर सारखे गळ्यावर सुरी आलेले फलंदाज आपलं सर्वस्व ओतून धावा करतील असं वाटतंय. त्यामुळे इंग्लंड स्वप्नाच्या दुनियेत वावरत असतील तर ती त्यांची चुक ठरेल. हे एक मन सांगत असले तरी इंग्लिश खेळाडू पुरते व्यावसायीक आहेत. ते हाती आलेली संधी व मिळविलेली पकड सहजासहजी सोडणार नाहीत.
भारताला जर हि कोंडी फोडायची असेल तर आपल्यातला अहंकार बाजूला ठेवावे लागेल आणि इंग्रजांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपल्यातल्या कलागुणांना वाट मोकळी करून द्यावी लागेल. मग बघा यश कसे आपल्याच पावलांनी चालत येते. मात्र त्यासाठी कर्णधार रोहितला आपले सर्वस्व पणाला लावावे लागेल आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला सेफ्टी फर्स्ट या सुत्रातून बाजूला यावे लागेल व इंग्लिश प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलमला बिनधास्तपणा अंगिकारावा लागेल तसेच खेळाडूंमध्ये आलेली नकारात्मक मानसिकता झटकून देण्यास मदत लागेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक. Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२

