अहमदनगर :- (दि.१७ जानेवारी):-
मकर संक्रांतीच्या दिवशी एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीत तरूणावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच,आता अजून एक निर्घृण खून करून मृतदेह विहीरीत टाकल्याची घटना एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील देहरे परिसरात घडली आहे.
नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातील माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या पाठीमागून वार करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून करण्यात आला आहे.नगर तालुक्यातील देहरे परिसरातील अल्पवयीन मुलगी १३ जानेवारीपासून घरातून बेपत्ता होती. तिचा मृतदेह भंगे वस्तीवर एका विहिरीत आढळून आला. गोटया उर्फ ऋत्विक संजय जाधव रा.देहरे याने या मुलीची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याने व प्रीती बाबा जाधव यांनी पीडित मुलीला हत्याराच्या साहाय्याने मारून विहिरीत ढकलून दिले.
पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या जबाबावरून पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ करून या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरागस अल्पवयीन मुलीच्या संदर्भात दुर्दैवी घटना घडल्यामुळे देहरे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशा घटना एम आय डी सी. पोलिस स्टेशन हद्दीत नेहमी घडत असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिक खाजगीत चर्चा करताना दिसत आहेत..

