डब्ल्यूटीसी स्पर्धेचा हिस्सा असलेल्या इंग्लंड व भारत यांच्यातील पाच कसोटींच्या मालिकेतला पहिला कसोटी सामना हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू होईल तेंव्हा त्यामध्ये टिम इंडियामध्ये वरिष्ठ खेळाडू विराट कोहली खेळताना दिसणार नाही. गेली सोळा वर्ष टिम इंडियाचा नियमित सदस्य असलेला कोहली एवढया प्रदिर्घ काळात भारताने खेळलेल्या एकूण कसोट्यातील केवळ आठ कसोटी सामन्यांना मुकला आहे. विशेष म्हणजे त्या सर्व आठ कसोटींच्या काळात तो टिम इंडियाचा नियमित कर्णधार होता आणि त्याच्या गैरहजेरीत नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य राहाणेने सात पैकी सहा सामने जिंकले व एक अनिर्णित राहिला तर एका सामन्यात केएल राहुलने नेतृत्व केले, मात्र दुर्देवाने भारताला तो सामना गमवावा लागला. म्हणजे कोहलीच्या गैरहजेरीत भारत जादा तर जिंकलाच आहे. याचा सरळ अर्थ आहे की कोहलीच्या गैरहजेरीचा संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होत नाही व त्याच्या ऐवजी खेळणाऱ्या खेळाडूंनी संधीचा अचूक लाभ घेतला आहे. आता कोहली भारतीय संघाचा कर्णधार नाही. त्यामुळे त्याच्या रेकॉर्डवर विशेष परिणाम होणार नाही.
कोहली हा जगातला सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून गणला जातो. त्याच्या गैरहजेरीत झालेल्या आठपैकी केवळ एका कसोटीत शारिरीक तंदुरुस्तीमुळे तो खेळू शकला नाही. तो सामना सन २०२१-२२ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसरा कसोटी होता. त्या सामन्यात के. एल राहुलने कोहलीच्या ऐवजी नेतृत्व केले व सामना गमावला. तेवढया एकाच कोहलीने न खेळलेल्या सामन्यात त्याची उणीव जाणवली होती. बाकीच्या सात सामन्यात अजिंक्य राहाणेने संघाची धुरा चांगल्या पैकी सांभाळली होती.
सन २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताचा संघ दुसऱ्या डावात खेळताना केवळ ३६ धावात गारद झाला. तेंव्हा संपूर्ण संघ निराशेच्या गर्तेत कोसळला असताना विराट संघाला बेवारस सोडून मायदेशी पत्नीच्या बाळंतपणासाठी आला. त्या कोरोना संक्रमणाच्या दौऱ्यात खेळाडूंच्या शारिरीक दुखापतीनेही संघाला हैराण केले होते. त्या विपरीत परिस्थितीत अजिंक्य राहाणेने जवळ जवळ सर्वच नवोदितांना साथीला घेऊन मेलबोर्नला स्वतः शतकी खेळी करून विजयीपथावर आणले. सिडनीला आश्विन -विहारीच्या धीरोदात्त खेळाने सामना अनिर्णित राखला आणि ब्रिस्बेनला गाबावर कांगारूंच्या कळपालाच आग लावून ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. क्रिकेटच्या इतिहासातील हि सर्वोत्तम कसोटी मालिका असल्याची घोषणा दस्तुरखुद्द आयसीसीनेच करून कोहलीला तो त्या मालिकेत नसल्याची हुरहुर लावून दिली.
त्यानंतर कोहलीच्या आयुष्यात बरेच स्थित्यंतरे आली, फॉर्म गेला, संघाचे कर्णधारपद गेले. छोटया छोटया गोष्टींसाठी लाचार व्हावे लागत होते. मात्र त्याने जिद्द व मेहनतीच्या बळावर पुन्हा जुने वैभव मिळविले. सन २०२३ वनडे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांसह मालिकावीर बनला. त्यामुळे त्याच्याकडून संघाच्या अपेक्षा वाढल्या. मात्र त्या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मायदेशातील टि२० मालिकेतून अंग काढून घेतले. त्यानंतर टिम इंडिया द.आफ्रिका दौऱ्यावर गेली त्या मालिकेतील वनडे व टि२० संघातूनही त्याने अंग काढून घेतले. द. आफ्रिका दौऱ्याहून आल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टि२० मालिका झाली त्यातील पहिल्या सामन्यातूनही त्याने माघार घेतली.
आता तर इंग्लंडसारख्या मोठ्या संघाविरूध्द महत्वाची कसोटी मालिका होत असल्याने त्याची संघाला मोठी गरज होती. सध्या गिल, जयस्वाल, अय्यर हे नवे खेळाडू संघात असल्याने या मालिकेत त्याच्या अनुभवाची कमतरता संघाला भारी पडू शकते. तेंव्हा कोहलीची अनुपस्थिती संघासाठी त्रासदायक ठरू शकते. एक अपवाद वगळता सर्वच वेळा वैयक्तीक - कौटुंबिक कारणामुळे खेळू शकणार नसल्याची सबब सांगितली जाते. मात्र नेमकं कारण सांगितलं जात नसल्याने त्याच्या विषयी गैरसमज निर्माण होतात. भारतीय क्रिकेटला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे अशी मोठी वल्गना करायची आणि त्याच संघाला महत्वाच्या क्षणी वाऱ्यावर सोडून द्यायचे. हि आता त्याची नित्याचीच बाब बनत चालली आहे. ज्या मायबाप प्रेक्षकांमुळे आपल्याला मानसन्मान, इज्जत, पैसा मिळतो त्यांनाच विश्वासात न घेता खरे कारण न सांगता संघाबाहेर राहाणे कितपत योग्य आहे ? हे कोहली समजायला पाहिजे. अन्यथा त्याच्यावर मनापासून प्रेम करणारे रसिक दूर हटायला वेळ लागणार नाही. तेंव्हा कोहलीने स्वतःहून वस्तुस्थिती विषद केली तर त्याचीच इज्जत फॅन्ससमोर वाढेल व त्यालाही मोठा सपोर्ट मिळेल.
कोहलीच्या गैरहजेरीत एक अपवाद वगळता संघाच्या कामगिरीवर परिणाम झालेला नाही हे आपण लेखाच्या सुरुवातीलाच वाचले आहे. त्याच्या ऐवजी खेळणारे खेळाडू जीवाची बाजी लावून खेळ करत आले आहेत. त्यामुळे कोहलीच्याच इज्जतीला तडा पोहचत व त्याची किंमत रसिकांसमोर शुन्य होऊन जाते. त्यामुळे किमान आपली स्वतःची इमेज जपण्यासाठी असली हकीकत जाहिर करण्यात कुठलेही गैर नाही.
इंग्लंडचा संघ कोहलीच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन नवोदित फलंदाजांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे टिम इंडिया संकटात येऊ शकते. अशा वेळी संघाला तोफेच्या तोंडी टाकून बाहेर राहाणे चुकीचे ठरते. सिमेवर दुश्मनांशी लढणारा देशाचा खरा योध्दा - सैनिक मातृभूमीला बेवारस सोडून कौटुंबीक कारणासाठी घरी गेल्याचं व त्याला त्यासाठी सुट्टी दिल्याचंही कुणाच्याही ऐकिवात नसेल. केवळ आपल्या सोयीने इच्छा होईल तेंव्हा खेळायचे मन नसेल तर संघाबाहेर राहायचे हे महान खेळाडूला शोभत नाही. तेंव्हा बीसीसीआयनेही जनतेला खरी हकीकत सांगायला काय हरकत आहे ? कारण याच पब्लिकच्या जीवावर ते आपला गल्ला भरत आहे. नाहीतर खेळाडू व बीसीसीआय यांच्यात काहीतरी साटंलोटं आहे असा जनतेत समज पसरायला वेळ लागणार नाही. तेंव्हा बीसीसीआयने निव्वळ कोहली प्रकरणातच नाही तर ईशान किशन, यजुवेंद्र चहल, शिखर धवन संघाबाहेर का आहेत याचे कारणंही जनतेसमोर मांडावे. तरच जगातल्या सगळ्यात मोठ्या व धनाढ्य क्रिकेट मंडळाचा कारभार पारदर्शक आहे असे समजले जाईल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक. Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२

