मी किती मुस्लिम बांधवांना नोकऱ्या लावल्या हे हर्षवर्धन पाटलांना सांगण्याची गरज नाही.
इंदापूर: ज्यावेळेस मी 1992 साली छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या माध्यमातून माझ्या राजकीय कारकीर्दीत सुरुवात केली. त्यावेळी जाफर मुलाणी यांच्या रूपाने छत्रपती शिक्षण संस्थेत नोकरीला लावून माझ्या आयुष्यातील पहिली नोकरी मुस्लिम बांधवाला लावलेली आहे, त्याचबरोबर पंचवीस तीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना ,छत्रपती शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था ,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ,अनेक खासगी कंपन्या, पी डी सी सी बँक तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमध्ये असंख्य अल्पसंख्यांक, मागासवर्गीय ,भटक्या विमुक्त जातीच्या तरुणांना नोकरीसाठी आजवर मदत केलेली आहे.तसेच,माझी स्वतःची भरणेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही तालुक्यामध्ये नावाजलेली संस्थाा असून या संस्थेत कर्ज पुरवठा करणारा प्रमुख म्हणून माझा तरुण मुस्लिम बांधव त्या ठिकाणी नोकरी करत आहे.
परंतु आपण जेव्हा एखाद्या अडचणीतल्या माणसाला मदत करतो तेव्हा ती मदत माणुसकीच्या भावनेतून असली पाहिजे,त्यामध्ये कुठेही उपकार केल्याचा अभिर्वाव नसावा हे संस्कार माझ्यावर असल्यामुळे आपण केलेल्या मदतीची कधीच मी जाहीर वाच्यता करत नाही. त्यामुळे मी किती मुस्लिम बांधवांना नोकऱ्या लावल्या हे हर्षवर्धन पाटील यांना सांगण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
आमदार भरणे म्हणाले की, हर्षवर्धन पाटील हे सलग २० वर्ष मंत्री म्हणून काम करत होते परंतु या कालखंडामध्ये त्यांनी इंदापूर तालुक्यातील मुस्लिम मोहल्ला,मागासवर्गीय वस्त्यांना जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले होते .परंतु आपण आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुस्लिम समाज बांधवांसाठी अल्पसंख्याक विभागाचा स्वतंत्र निधी आणून प्रत्येक गावातील मुस्लिम मोहल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत.तसेच इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आला असून संकुचित प्रवृत्तीच्या मंडळींना आपण केलेला विकास बघवत नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.त्यामुळे यंदाही त्यांची राजकीय डाळ शिजणार नाही हे हर्षवर्धन पाटलांनी ओळखले असल्यामुळे नेहमीप्रमाणे कूटनीतीचा अवलंब करत जाती-धर्माचा उल्लेख करून जाणीवपूर्वक तालुक्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आरोपही यावेळी आमदार भरणे केला.
तसेच विकासाच्या बाबतीत बोलण्याचा हर्षवर्धन पाटलांना नैतिक अधिकार उरला नसून त्यांच्या बावडा गावालगत असणाऱ्या लुमेवाडी या मुस्लिम बांधवांच्या मोठ्या गावामध्ये विरोधकांना कधी निधी टाकावसा वाटला नाही.परंतु आपण या गावाला कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे.तसेच इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी बरोबरच हजरत चांदशवली बाबांच्या दर्ग्यालाही विकास आराखड्यामध्ये कोट्यावधींची तरतूद केली आहे.
त्यामुळे राम रहीम आपल्यासाठी एकच असून सर्वधर्म समभावाची शिकवण आपल्याला आहे.परंतु हर्षवर्धन पाटील यांचा चष्मा तपासून घेण्याची वेळ आलेली आहे.हे केवळ राजकिय स्वार्थासाठी अशी वक्तव्य करत आहेत.त्यामुळे मी ठामपणे सांगतो विकास हा माझ्या रक्तात आहे आणि इंदापूर तालुक्याचा आणि मुस्लिम समाजाचा विकास मी आणि मीच केला आहे .होय मीच विकास केलाय असे निक्षून सांगत जे कोणी माझ्यावर टीका करत आहेत त्यांच्याकडे जनतेने दुर्लक्ष करण्याचे आवाहन ही यावेळी आमदार भरणे यांनी केले आहे.

