shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडियास यंदा डब्ल्यूटीसी फायनलपर्यंत पोहोचणे कठिण दिसतेय

         वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप २०२३-२५ सत्रात टिम इंडियाचा प्रवास हार -जितीच्या खडतर वाटेवरून सुरू आहे. वेस्ट इंडिजविरूध्द विंडीजमध्ये आपल्या नव्या सत्राचा श्रीगणेशा केला तेंव्हा त्या मालिकेतील दोनही सामने टिम इंडिया सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. भारताने एक सामना जिंकला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला. विंडिज सारख्या कमजोर संघाविरूध्दचे विजयाचे हक्काचे बारा गुण हातचे निसटल्याने टिम इंडियाच्या अभियानाची सुरूवात काहीशी निराशजनकच राहीली. त्यानंतर डिसेंबर २०२३ च्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेत द. आफ्रिकेविरुध्द दोन सामन्यांची मालिका झाली. तेथे तर भारताचा मागील ३१ वर्षांचा इतिहास फारच वाईट आहे. भारताला द.आफ्रिकेत अद्यापही कसोटी मालिका जिंकता आली नाही तेंव्हा या वेळेस तरी मालिका विजयाचा दुष्काळ संपेल असे वाटत होते. परंतु तसे होणे नव्हते व झालेही नाही. तेथे पहिला सामना हरल्यानंतर मालिका गमावण्याचे संकट समोर ठाकले होते. परंतु दुसऱ्या सामन्यात इज्जत वाचविणारा खेळ टिम इंडियाकडून झाला आणि दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत राहिली व परत एकदा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे राहूनच गेले.


              तुलनेने सोप्या असलेल्या दोन मालिका बरोबरीत सुटल्यामुळे हक्काचे गुण वाया गेल्याने एकूण गुण व विजयाची सरासरी आपोआप निम्म्यावर आली व ऑस्ट्रेलियासारखा कसोटीतला दादा संघ पहिल्या क्रमांकासाठी उतावळा झाल्याने टिम इंडियाची अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी त्रेधातिरपिट उडाली. आता तर पहिल्या डब्ल्यूटिसी चरणाचे विजेते न्युझिलंडनेही ऑस्ट्रेलियावरही कुरघोडी करून आघाडी मिळविली आहे. याच गदारोळात इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय भूमीवर धडकलाही. इंग्लिश संघ बॅजबॉल नामक जोरदार खेळाच्या नव्या सुत्राने खेळत असल्याने त्यांनी मागील काही महिन्यात विरोधी संघांमध्ये दहशत निर्माण केली आहे.  त्यांच्या तोंडाळ प्रसिध्दी माध्यमे व माजी खेळाडूंनी वेगळीच हवा निर्माण केली. टिम इंडिया मायदेशातील किंग असला तरी या बॅजबॉलच्या घातक वातावरण निर्मितीमुळे काहीशी बावरल्याचे दिसत होते. त्याचाच परिणाम हैद्राबादला झालेल्या पहिल्या कसोटीतील अनपेक्षित पराभवात जाणवला. खरे पहाल तर त्या कसोटीच्या पहिल्या सत्रात भारताचेच वर्चस्व होते. पहिल्या डावात टिम इंडियाकडे आघाडीही होती, फलंदाजी -गोलंदाजी व्यवस्थित होत आहे असे वाटत असताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इयान बेलचा वारसदार समजला जाणाऱ्या ओली पोपने भारतीय गोलंदाजांना अक्षरशः वेठीस धरून केलेली १९६ धावांची खेळी निर्णायक ठरवली. तर २३१ धावांचे किरकोळ लक्ष कसोटी पदार्पण करणारा एकोणावीस वर्षीय टॉम हार्टलीच्या हार्ट ब्रेक माऱ्यापुढे टिम इंडिया अकस्मात कोसळली व २८ धावा कमी पडल्याने हाता तोंडातला विजयाचा घास इंग्लंडच्या ताटात पडला.
             विशाखापट्टणम कसोटीत उतरण्यापूर्वी टिम इंडियाची मानसिकता शंभर टक्के पराभूत व काही खेळाडूंची संघातील जागा दोलायमान झाली होती. तर जडेजा व राहुल सारखे महत्वाचे खेळाडू जायबंदी झाल्याने संघापुढे आणखी पेच निर्माण झाले होते. या सामन्यात संघाने चौथा दिवस संपण्यापूर्वीच विजय मिळविल्याने संघ समर्थक व रसिकांना हायसे वाटले. त्या विजयाने डब्ल्यूटिसी गुणतालिकेतील बिघडलेली घडी पुन्हा दुरूस्त झाली. मात्र मोजक्याच खेळाडूंच्या योगदानामुळे मिळविलेला विजय तज्ञांना फारसा पचणी पडला नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ म्हंटला तर त्यामध्ये एखाद दुसरा अपवाद सोडला तर जास्तीत जास्त खेळाडूंचा खेळ चांगला व्हायला हवा. मात्र सध्या तरी टिम इंडियाच्या बाबत तसं होताना दिसत नाही. शिवाय विरोधी संघ इंग्लंडच्या गोटातही ताळमेळ व सुसूत्रता नसल्याने त्यांचेही नियोजन क्लिक होत नाही याचा नकळत फायदा टिम इंडियाचा होत आहे. भारतीय संघाचं नशिब बलवत्तर समोर इंग्लंडचा संघ आहे. त्या ऐवजी ऑस्ट्रेलियाचा संघ असता तर त्यांनी टिम इंडियाचं भाजून भरीत केलं असतं.
              यशस्वी जयस्वाल, जसप्रित बुमराहा, रविचंद्रन आश्विन व काही प्रमाणात शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांची कामगिरी सरस होत असल्याने भारताची गाडी रुळावर परतली आहे. मात्र कायम कायम त्याच खेळाडूंवर विसंबून राहिलं तर तीच गाडी कधीही खाली उतरू शकते. तेंव्हा संघातील इतर खेळाडूंचंही योगदान यायला पाहिजे. नाहीतर डब्ल्यूटिसीच्या मागील दोन सत्रांचे उपविजेते असलेल्या टिम इंडियाचे यंदा विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न सोडा अंतिम फेरीत पोहोचण्याचे मनसुबेही धुळीस मिळू शकतात.
              हा लेख लिहिला जाईपर्यंतची ताजी गुणतालिका जाहिर झाली होती त्यामध्ये न्युझिलंड
तीन सामने, दोन विजय, चोवीस गुण व  एक पराभव,
विजयाची सरासरी ६६.६६ टक्के मिळवून आघाडीवर होते. तर दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाचे १० सामन्यात सहा विजय, तीन पराभव व एक अनिर्णितसह ६६ गुण व विजयाची सरासरी ५५ टक्के  अशी आहे. तिसऱ्या स्थानावर भारत असून सहा पैकी तीन सामन्यात विजय, दोन पराभव व एक अनिर्णितसह ३८ गुण व ५२.७७ विजयाची सरासरी आहे. एकूण नऊ संघांची हि स्पर्धा असली तरी गुणतालिकेतील वरचे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात. तेंव्हा टिम इंडियाला उर्वरीत सर्व सामने डोळयात तेल घालून खेळावे लागतील. खास करून भारतात होणारे सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. त्यानंतर न्युझिलंड व ऑस्ट्रेलियात विजय मिळविणे सोपे नसेल. त्यामुळे यंदाची डब्ल्यूटिसी चॅंपियनशिप जिंकण्यापेक्षा फायनलमध्ये पोहोचणे टिम इंडियासाठी महाकठिण आहे असं दिसतंय.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व  समिक्षक. Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२
close