भारत हा एक खंडप्राय देश असून भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटला निव्वळ खेळ म्हणून बघितले जात नाही तर एका स्वतंत्र धर्माचा अलिखित दर्जाच क्रिकेटला मिळाला आहे. त्याचबरोबर क्रिकेटमधील सर्वात मोठा घटक असलेला खेळाडू म्हणजे क्रिकेट मधला देवच समजला जातो आणि हा देव जे करेल, जसा वागेल त्याचे अनुसरण शंभर टक्के केले जाते. खास करून या देवांचा उपयोग व्यावसायिक कंपन्या आपले उत्पादने खपविण्यासाठी मोठया प्रमाणात करतात. त्याचा समाजावर विपरीत परिणाम झाला तरी त्या कंपन्यांना व देवाचा दर्जा मिळालेल्या क्रिकेटपटूंना काहीही देणे घेणे नसते.तरीही भोळी जनता (क्रिकेटरसिक) आपल्या अंध प्रेमापायी त्या खेळाडूंवरचं प्रेम काही कमी होऊ देत नाहीत.
क्रिकेटच्या माध्यमातून लाखो - करोडोंची माया जमा करणारे हे क्रिकेटचे देव मात्र स्वतःचे नाव मोठे झाल्यावर आपल्या भक्तांनाच नव्हे तर ज्या क्रिकेटमुळे मोठे झाले त्या क्रिकेटलाच गौण स्थान देतात. आपण बऱ्याचदा खेळाडूंच्या मुलाखतीत ऐकलं / वाचलं असेल की पत्रकाराने एखाद्या खेळाडूला विचारले असते की, तुझं खेळात असं चुकतं, हे करायला हवं, तसं केल्याने तुझे हितचिंतक नाराज आहेत. तर हे महाभाग सरळ सांगतात की, मला बाहेरच्या कोणाचं देणं घेणं नाही मला जे योग्य वाटते तेच मी करील. म्हणजे ज्यांच्या प्रेमावर, पैशावर हे क्रिकेटपटू मोठे होतात, देवाचा दर्जा मिळवितात त्याच क्रिकेट रसिकांना पायाने ठोकरता. ज्या क्रिकेटमुळे तुमची जन माणसात किंमत आहे त्या क्रिकेटला तुमच्या मनाप्रमाणे खेळवता, तुम्हाला हवे त्या सामन्यात खेळतात, देशाच्या संघाची गरज काय आहे याचा विचार न करता केवळ स्वतःच्या खाजगी कामे अथवा कारणांसाठी देशहिताचा विचार न करता सरळ संघाला वाटाण्याच्या अक्षदा लावता. यावर कहर म्हणजे हे महान खेळाडू महत्वाच्या अथवा कोणत्याही कारणास्तव सामने / मालिका खेळायची नसेल तर खरे व स्पष्ट कारण सांगायची तसदीही घेत नाही. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय संघाची कुचंबना तर होतेच पण त्यांच्यावर माया करणाऱ्या फॅन्सच्या प्रेमाचं व फॅन्सच्या भावनांची कशी अवहेलना होत असेल याची किंचितही तमा या क्रिकेटपटूंना नसते. याच्या इतकं दुःख कोणतंच असू शकत नाही.
वरील उल्लेखलेल्या वर्णनाशी पूर्णपणे जुळणारा सध्याचा टिम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू, अनेक विक्रमांचा धनी, जवळ जवळ तीन मिलियन अर्थात तीस लाख सोशल मिडिया फॉलोअर्स असलेला जगातील एकमेव क्रिकेट खेळाडू, हजारावर कोटी रूपयांची मालमत्ता कमावलेला आणि भारतीय क्रिकेट संघाला ज्याची नितांत गरज आहे असा महान खेळाडू विराट कोहली. आजमितीला इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप अंतर्गत पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिले दोन कसोटी सामने संपन्न झाले. पहिला सामना फलंदाजांच्या नाकर्तेपणामुळे हरला तर दुसऱ्या सामन्यात केवळ यशस्वी जयस्वाल व शुभमन गिलचा खेळ चांगला झाला, आणि हो ते दोघेही एक एका डावातच चमकले. बाकीच्या इतर फलंदाजांची उपस्थिती केवळ हजेरी लावण्या पूरतीच होती असे म्हंटल्यास गैर ठरू नये. केवळ जसप्रित बुमराह, रविचंद्रन आश्विन, कुलदिप यादव व अक्षर पटेल या गोलंदाजांच्या बळावर टिम इंडियाला सामना जिंकता आला. त्यामुळे मालिका बरोबरीवर आली एवढीच ती काय समाधानाची बाब म्हणावी लागेल. या दरम्यान खेळाडूंच्या दुखापती वाढतच चालल्या असून संघात अनुभवी व फॉर्मात असलेल्या खेळाडूंची संख्या सामन्यागणिक कमी होत चालली आहे.
अशा परिस्थितीत सध्या फुल फॉर्मात असलेला व संघाच्या फलंदाजीचा मुख्य कणा असलेला विराट कोहली संघाबाहेर आहे. त्याची संघाला अतोनात गरज असताना नेमका तो कुठे आहे ? त्याचे न खेळण्याचे खरे कारण कारण काय ? तो संघात कधी सामील होईल ? तो नेमक्या कुठल्या संकटात आहे ? हे समजायलाच तयार नाही त्यामुळे जगभरातील क्रिकेटरसिक, कोहलीचे करोडो फॅन्स द्विधा मनःस्थितीत आहेत. अशा वेळी विराट कोहलीने स्वतः होऊन सद्य परिस्थिती बयान करणं गरजेचं आहे. त्याच्या अशा अबोल्यामुळे त्याच्या विषयीच्या फॅन्सच्या भावना भडक होत आहे, आणि याचे नुकसान कोहलीलाच सोसावे लागेल. मध्यंतरी कोहलीच्या मातोश्री सरोजजी यांच्या आजारपणाच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्या बातम्यांचे खंडन विराटचा भाऊ विकास कोहलीने केले. नंतर विराटचा घनिष्ट मित्र व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा / कोहली प्रसुत होणार असल्याची माहिती दिली. वास्तविक या संदर्भात स्वतः विराट कोहलीने समोर येऊन सर्व संभ्रम दूर करणे गरजेचे आहे.
विराट कोहली विद्यमान परिस्थितीत जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. तो त्याच्या पत्नीच्या डिलीव्हरीसाठी जगातली सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उभी करू शकतो. त्यामुळे त्याचे तेथे असणे एवढे गरजेचे वाटत नाही. शिवाय सध्या टिम इंडिया परदेशात नसून भारतातच खेळत असल्याने बिकट अवस्थेत तो केंव्हाही कुटुंबियांच्या मदतीला जाऊ शकतो. इंग्लंडविरूध्द अजूनही तीन कसोटी सामने बाकी आहेत, सध्या डब्ल्यूटिसी मध्ये भारताची हालात चांगली नाही. मायदेशातली मालिका जिंकण्याचा कोणत्याही संघाला अॅडव्हान्टेज असतो. तोच फायदा प्रमुख खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे टिम इंडियाला घेता येत नाही. तेंव्हा कोहलीने देशहित पहिले या धोरणाने टिम इंडियाच्या मदतीसाठी मैदानात उतरणे गरजेचे आहे.
कोहलीच्या पत्नीची हि काही पहिली डिलीव्हरी नाही. सन २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याच्याच नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी भारतीय संघ निच्चांकी ३६ धावांवर बाद झाला तेंव्हा त्या बिकट परिस्थितीतही तो संघाला वाऱ्यावर पत्नीच्या सुश्रतेसाठी मायदेशी परतला होता. त्यानंतर अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात भारताने ती ऐतिहासिक मालिका जिंकून त्याची संघाला गरज होती का नव्हती हे दाखवून दिले. कोहली शालेय क्रिकेट स्पर्धा खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले तेंव्हा सामना सोडून तो वडिलांच्या अंत्यविधीला गेला नव्हता. त्यावेळी त्याच्या क्रिकेटप्रेमाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यामुळे तो प्रकाश झोतात आला. तेंव्हा क्रिकेट हे त्याचे पहिले प्रेम होते आणि आता त्याच क्रिकेटच्या माध्यमातून करोडो रुपयांची संपत्ती जमा केल्यावर कुटुंब हे त्याची पहिली प्रायोरिटी ठरतेय हे बघून त्याची किव करावीशी वाटते.
नेहमी देशप्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि खरी वेळ आल्यावर त्याच देशाच्या राष्ट्रीय संघाकडे पाठ फिरवायची हे कुठले आले देशप्रेम ? देशाच्या सिमेवर लढणारे देशाचे सैनिक कधी वैयक्तिक / कौटुंबीक कारणास्तव देशाला संकटात सोडून घरी गेल्याचे आपण ऐकले का ? सैनिकांच्या घरातलं कोणी मरत नाहीत का ? त्यांच्या बायकांची प्रसूती होत नाही का ? उलट देशाच्या सिमा धोक्यात असताना स्वतःच्या सुट्टया, आनंद सगळं सोडून ते आपल्या कर्तव्यासाठी पुढे सरसावतात. विशेष म्हणजे क्रिकेटपटूंना मिळतो तेढा पगार / मानधन किंवा ग्लॅमर सैनिकांना मिळतही नाही. तसेच त्यांचे फॅन फॉलोअर्स असत नाही. तेंव्हा कोहली स्वतःला नेमका कोणात्या देशप्रेमींमध्ये गणतो ? हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न ठरतो.
सन १९९९ ला इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असताना सचिन तेंडुलकरचे वडिल रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. सचिन इंग्लंडहून अंत्यविधीला आला, अंत्यविधी उरकला व रातोरात पुन्हा इंग्लंडला गेला व दुसऱ्या दिवशी केनिया विरूद्ध नुसता सामनाच खेळला नाही तर झंझावाती १४० धावाही ठोकल्या. सन २०१५ मध्ये टिम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा व विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी दौऱ्यावर होती. त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी भारतात प्रसुत झाली, तिला मुलगी झाली. तेंव्हा धोनी दौरा सोडून मायदेशी परतला नाही. संपूर्ण दौरा संपल्यानंतर दोन महिन्यांनी त्याने आपल्या जीवा (मुलीचे) मुखदर्शन घेतले. जो २०२०- २१ चा ऑस्ट्रेलिया दौरा सोडून कोहली पत्नीच्या बाळंतपणासाठी भारतात परतला होता. त्याच दौऱ्यावर असलेल्या संघातील मोहम्मद सिराजच्या वडिलांचे भारतात निधन झाले तरीही सिराज मायदेशी परतला नव्हता. याला म्हणतात खरे देशप्रेम. विराट सारखे बेगडी देशप्रेम त्याची स्वतःची इमेज खराब करत आहे.
क्रिकेटमधील कोहलीचे पराक्रम अगणित आहे. त्यामुळे त्याला अनेक शासकिय मानसन्मान / पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात त्याला भारतरत्नसारखा पुरस्कारही मिळू शकतो. मात्र संघाला गरज असताना संघाची साथ सोडून देणारा खेळाडू हा त्याच्यावर बसलेला काळा शिक्का त्याला भारतरत्नसारखा सर्वोच्च सन्मान मिळण्यास आडकाठी ठरेल. तेव्हा कोहलीला कौंटुबिक बाबी अग्रणी ठरवायच्या असतील तर क्रिकेटला मानाने व प्रेमाने रामराम ठोकावा यातच त्याचा व देशाचा मानसन्मान असेल. तेंव्हा आपला आदर्श घेणाऱ्या नव्या पिढीसाठी कोहलीने तातडीने पुढे येऊन आपली भूमिका मांडणे अगत्याचे आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२

