shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहाव्या क्रमांकावरील आरसीबीचा सांत्वनपर विजय



              आयपीएल २०२४ चा ४१ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला.  या सामन्यात आरसीबीने हैद्राबादचा विजयरथ ३५ धावांनी रोखला. प्रथम फलंदाजी करताना डुप्ले  ड्यू फ्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने २० षटकांत सात गडी गमावून २०६ धावा केल्या.  प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला वीस षटकांत ८ गडी गमावून १७१ धावा करता आल्या. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.

             गुरुवारी हैद्राबादला आरसीबीविरुद्ध  झालेल्या सामन्यात संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. हैद्राबाद दहा गुण आणि ०.५७७ या निव्वळ रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर  आरसीबी चार गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या  स्थानावर आहे.

            प्रत्युत्तरात २०६ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना हैद्राबादची सुरुवात धक्कादायक झाली.  फलंदाजीला सलामीला आलेला ट्रॅव्हिस हेड केवळ एक धाव काढून परतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला विल जॅकने बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्मा ३१ धावा करून बाद झाला.  या सामन्यात शाहबाज अहमदने नाबाद ४० आणि पॅट कमिन्सने ३१ धावा केल्या. या तीन खेळाडूंशिवाय त्यांचा एकही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मार्कराम सात, नितीश १३, क्लासेन सात, अब्दुल समद १०, भुवनेश्वर कुमार १३ आणि उनाडकट आठ (नाबाद) धावा करू शकले.

            आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प व नियंत्रीत गोलंदाजी करून हैद्राबादच्या फलंदाजांना उधळू दिले नाही.  स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले.  तर विल जॅक आणि यश दयाल यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.  सिराज आणि फर्ग्युसन यांची झोळी रिकामीच राहिली.

             नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आल्यावर आरसीबीने दमदार सुरुवात केली.  विराट कोहली आणि फाफ ड्यू फ्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी झाली. बारा चेंडूत २५ धावा करून कर्णधार माघारी परतला. त्याचवेळी किंग कोहलीने या मोसमातील चौथे अर्धशतक झळकावले. याशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रजत पाटीदारही दमदार फॉर्ममध्ये दिसला.  त्याने १९ चेंडूत अर्धशतक झळकावले.  या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्याने २० चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५० धावा काढल्या. या सामन्यात विल जॅकने सहा, कॅमेरून ग्रीन ३७, महिपाल लोमरोर सात, दिनेश कार्तिक ११ आणि स्वप्नील सिंग १२ धावा करू शकला.  हैदराबादकडून जयदेव उनाडकटने तीन बळी घेतले. याशिवाय टी नटराजनने दोन गडी बाद केले. तर पॅट कमिन्स आणि मयंक मार्कंडे यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

             विराट कोहलीने आयपीएलमध्ये दहाव्यांदा चारशेच्यावर धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे सन २०११ पासून सलग दहाव्यांदा विराट कोहलीने ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. सन २०१६ मध्ये, त्याने सर्वाधिक ९७३ धावा केल्या, आयपीएलच्या इतिहासातील एका मोसमात फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

              आयपीएल सुरू झाल्यापासून एकदाही करंडक जिंकू न शकलेल्या आरसीबीच्या पुरुष संघाने या सामन्यात विजय मिळविला असला तरी त्यांची या सत्रात आजवरची सर्वात खराब कामगिरी झाली असून परत एकदा त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना त्यांच्या समर्थकांना बघावे लागत आहे. त्यांच्या या खराब कामगिरीच्या जखमेवर त्यांच्याच महिला संघाने केवळ दुसऱ्याच प्रयत्नात डब्ल्यूपीएल जिंकून मीठ चोळण्याचे काम केले असून यंदाच्या भडक उन्हाळ्यात त्याची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close