shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिंकण्याची इच्छाशक्ती गमावलेल्या मुंबईची केकेआर समोर शरणागती

         फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अठरा धावांनी पराभव केला. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वा खालील केकेआर आयपीएलच्या चालू हंगामात प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी १६ षटकांत १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र मुंबई संघाला निर्धारित १६ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १३९ धावाच करता आल्या. मुंबईकडून ईशान किशनने सर्वाधिक ४० धावा केल्या. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल व हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.


              पावसामुळे सामना तब्बल सव्वादोन तास उशिरा सुरू झाला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना १६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. केकेआरला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही आणि १६ षटकांत सात गडी गमावून १५७ धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईकडून वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा व अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
             केकेआरचा बारा सामन्यामधील हा नववा विजय असून ते १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. कोलकातानंतर राजस्थानचे अकरा सामन्यांत सोळा गुण आहेत. रविवारी राजस्थानचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. जर राजस्थान हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा केकेआर नंतरचा दुसरा संघ ठरेल. दुसरीकडे, मुंबईचा तेरा सामन्यातला हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

               मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभावी खेळाडू म्हणून आलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली.  या दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेपर्यंत कोणतेही नुकसान होऊन देता ६२ धावा केल्या. या दरम्यान रोहित पेक्षा ईशान किशनने झटपट धावा केल्या. मात्र अनुभवी फिरकीपटू सुनिल नारायणने सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर ईशानला बाद करून केकेआरला पहिले यश मिळवून दिले. ईशान २२ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४० धावा करून बाद झाला.

             ईशान बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव फसला आणि पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्तीने रोहितला बाद करून मुंबईला दुसरा धक्का दिला. रोहितने  चेंडूत एक चौकार आणि एकाच षटकाराच्या मदतीने १९ धावा केल्या. रोहितच्या या खेळीत नेहमीची आक्रमता दिसली नाही. उलट तो बाद होण्याचे विविध प्रकार शोधतोय असेच चित्र तो मैदानात असेपर्यंत दिसत होते. रोहितनंतर सूर्यकुमार यादवही आपल्या लौकिकाच्या विपरीत खेळताना दिसला व आंद्रे रसेलच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना त्याने आपला संयम व विकेट गमावली. त्याला १४ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने केवळ ११ धावाच करता आल्या. या धक्क्यातून मुंबईचा संघ सावरण्यापूर्वीच वरुण चक्रवर्तीने कर्णधार हार्दिक पांड्याला (२) आणि आंद्रे रसेलने टीम डेव्हिडला शुन्यावरच परतीचा रस्ता दाखवून बाद करून मुंबईची नाकेबंदी केली. 

             गडी बाद होण्याचा सपाटा सुरू असताना तिलक वर्माने आक्रमक खेळाचा उत्कृष्ठ नजराना पेश करत १७ चेंडूत ३२ धावा ठोकत विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. या दरम्यान त्याच्या बॅटमधून एक षटकार व दोन चौकार निघाले. मात्र दुसऱ्या टोकाला धाव घेण्याच्या प्रयत्नात नेहल वढेरा तीन चेंडूत तीन धावा करून धावबाद झाला. यानंतर नमन धीर सहा चेंडूत १७ धावा काढून अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. नमन धीर सारख्या आक्रमक व नियमीत फलंदाजाला आठव्या क्रमांकावर पाठवून कर्णधार पांड्याने आपल्या महान कल्पकतेचे अजब उदाहरण या प्रकारे क्रिकेट जगता समोर ठेवले. नमनला आणखी ३-४ चेंडू खेळायला मिळाले असते तर कदाचित वेगळेच चित्र बघायला मिळाले असते.

            तत्पूर्वी, पावसामुळे सामना तब्बल सव्वा दोन तास उशिरा सुरू झाला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना प्रत्येकी सोळा षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला  आणि गोलंदाजांनी आपले कर्तव्य ईमाने इतबारे पार पाडले.  केकेआरने पहिल्याच षटकात फिल सॉल्टची विकेट गमावली, जो पाच चेंडूत सहा धावा करून बाद झाला. सॉल्टने षटकार खेचून डावाची सुरुवात केली खरी पण शेवटच्या चेंडूवर नुवान तुषाराने त्याची खेळी संपुष्टात आणली.

            केकेआरच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रित बुमराहाने पहिल्याच चेंडूवर सुनिल नारायणचा त्रिफळा उडविला. या मोसमात अफलातून खेळ करणाऱ्या नारायणला  बुमराहचा चेंडू समजू शकला नाही आणि त्याने ऑफ स्टंपवर जाणारा चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो फसला. नारायणला वाटले की चेंडू स्विंग होईल, पण बुमराहने अचूक यॉर्कर टाकून नारायणचा ऑफ स्टंप उडवला. बुमराहच्या चेंडूवर बाद झालेला नारायण खाते न उघडताच बाद झाला. टि२० क्रिकेट मध्ये नारायण शून्यावर बाद होण्याची ही ४४ वी वेळ होती. टि२० च्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याचा हा विक्रम आहे. अशा प्रकारे सुनिलच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदला गेला. नारायणने ॲलेक्स हेल्सला मागे सोडले. हेल्स टि२० क्रिकेटमध्ये ४३ वेळा खाते न उघडता बाद झाला होता. नारायण आयपीएलमध्ये सोळाव्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

           केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. व्यंकटेशने २१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने बेचाळीस धावा केल्या.  व्यंकटेशची बॅट मुंबई विरुद्ध जोरदार बोलते आणि पुन्हा एकदा व्यंकटेशने मुंबईच्या गोलंदाजांवर निशाणा साधला. व्यंकटेशने मुंबईविरुद्ध गेल्या सहा डावांत ३६२ धावा केल्या असून या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट १६५.२९ राहिला आहे. मात्र, या सामन्यात व्यंकटेशचे अर्धशतक हुकले आणि त्याला पियुष चावलाने त्याचा डाव उधळवला.

           मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरला सुरुवातीचे धक्के दिले, मात्र या धक्क्यातून त्यांना शेवटपर्यंत सावरताच आले नाही. व्यंकटेश अय्यर आणि नितिश राणा यांच्या उत्कृष्ठ फलंदाजीच्या जोरावर केकेआरला दिडशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले असले तरी या सामन्यात त्यांचे फलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. व्यंकटेशशिवाय नितिशने ३३, आंद्रे रसेलने २४, रिंकू सिंगने वीस, तर रमणदीप सिंगने आठ चेंडूंत एक चौकार आणि एक षटकार खेचून नाबाद १७ धावा केल्या.

             एकंदर विचार केला तर केकेआरच्या गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांच्या अपयशानंतर नियंत्रित मारा करून यश खिशात घातले. तर गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीवर मुंबईच्या फलंदाजांनी पोचारा फिरविला. पॉवर प्लेमध्ये बिनबाद धावा झाल्या नंतरही ७७ धावात सगळा संघ कोसळला. नेमके याचे कारण काय हे प्रत्येकाच्या चर्चेत वेगवेगळे असले तरी मुंबईची स्पर्धेतून पुर्ण गच्छंती झाली आहे. रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार करण्याचा मुंबई मॅनेजमेंटचा निर्णय साफ चुकला व तोच त्यांच्या पिछेहाटीचे मुख्य कारण ठरले यावर कुणाचेच दुमत नसेल.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close