सतराव्या आयपीएल सत्राची साखळी फेरी संपली आणि विद्यमान स्पर्धा मंगळवारपासून प्लेऑफ फेरीच्या माध्यमातून सन २०२४ चा विजेता शोधण्याच्या तयारीला नव्याने लागेल. दोन क्वालिफायर आणि एक लिमिनेटरनंतर रविवारी अंतिम सामना खेळवला जाईल. चालू स्पर्धेच्या साखळी फेरीत उत्तम दर्जाचा खेळ बघायला मिळाला. नवे नवे पराक्रम, अनेक विक्रम होताना आपण बघितले. या मोसमात सर्वाधिक षटकार, सर्वोच्च धावसंख्या आणि सर्वात मोठा पाठलाग करण्याचे विक्रमही मोडीत निघाले आहेत. या दरम्यान जवळ जवळ सर्वच संघातील फलंदाजांनी मनसोक्तपणे फलंदाजीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेटही जबरदस्त होता. सदर लेखात आपण अशाच काही तडाखेबाज फलंदाजांच्या स्वप्नातीत स्ट्राईक रेटचा आढावा घेणार आहोत.
तसं बघाल तर टि ट्वेंटी क्रिकेट म्हंटलं की त्यात तोडफोड फलंदाजी बघायला मिळणार हे स्पष्टच असते, नव्हे तर तो टिट्वेंटी क्रिकेटचा आत्माच आहे. या आयपीएल सत्रातही बऱ्याच फलंदाजांनी आपल्या घणाघाती फलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले खरे पण त्याबरोबरच चेंडू गणिक आपला धावा बनविण्याचा दरही अफलातून ठेवला. या मोसमात किमान तिनशे धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा जॅक फ्रेझर मॅकगर्कचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम ठरला. त्याने नऊ डावांत २३४.०४ च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या. मात्र त्याचा संघ दिल्लीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्याचवेळी, दुसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा आहे. या भारतीय फलंदाजाने चालू हंगामात तेरा डावांमध्ये २०९.४१ च्या स्ट्राइक रेटने ४६७ धावा केल्या. अभिषेकच्या बॅटने खास करून प्ले ऑफमध्ये अफलातून काम केले जर उर्वरीत सामन्यात त्याची कलाबाजी अशीच सुरू राहिली तर त्याचा विजेतेपदही पटकवू शकतो.
सर्वोत्तम स्ट्राईक रेटच्या बाबत तिसऱ्या क्रमांकावर अभिषेकचा सलामीचा जोडीदार ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हिस हेड आहे. हेडने या मोसमात बारा डावांमध्ये २०१.१३ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने ५३३ धावा केल्या आहेत. जर अभिषेक आणि हेड सनरायझर्सला प्लेऑफमध्ये चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरले तर त्यांच्या संघाला चॅम्पियन होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
होत्याचं नव्हतं करुन सोडणाऱ्या आक्रमक फलंदाजांच्या या यादीत चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अडवतीस वर्षीय फलंदाज दिनेश कार्तिक आहे. आगामी टि ट्वेंटी विश्वचषकासाठी कार्तिकची भारतीय संघात निवड झाली नसली तरी त्याच्या बॅटने चांगली कामगिरी केली आहे. कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये बारा डावांमध्ये १९५.६५ उत्कृष्ट स्ट्राईक रेटने एकूण तिनशे पंधरा धावा केल्या आहेत. त्याचवेळी दिल्लीचा ट्रिस्टन स्टब्स पाचव्या क्रमांकावर आहे. स्टब्सने यंदाच्या आयपीएलमध्ये तेरा डावांमध्ये १९०.९० च्या स्ट्राइक रेटने ३७८ धावा केल्या आहेत. मात्र, ही आकडेवारी त्या फलंदाजांची आहे ज्यांनी या हंगामात तिनशे हून अधिक धावा केल्या आहेत.
हि फुटपट्टी किमान तिनशे धावा करणाऱ्या फलंदाजांचे प्रमाण काढून दाखवली जात आहे. त्यामध्ये जॅक मॅकगर्क हा सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल आहे. तर सारासार सर्वच फलंदाजांचा विचार केला तर सीएसकेचा महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर दाखल होईल. त्याने यावर्षी अकरा डावात २२०.५४ च्या स्ट्राईक रेटने १६१ डावाचा अंतिम टप्प्यात निर्णायक स्थितीत फटाफट धावा केल्या आहेत. याशिवाय अभिषेक तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर केकेआरचा रमणदीप चौथ्या क्रमांकावर असेल, त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये नऊ डावांमध्ये २०१.६१ च्या स्ट्राइक रेटने १२५ धावा केल्या आहेत. यानंतर ट्रॅव्हिस हेड पाचव्या क्रमांकावर आहे.
एरव्ही घणाघाती फलंदाजीसाठी विश्व प्रसिध्द असलेले आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आणि मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यांच्यासाठी हा मोसम विशेष लक्षवेधक राहिला नाही. जिथे मॅक्सवेलने आठ डावात १२३.८० च्या स्ट्राईक रेटने मात्र बावन्न धावा केल्या. तर सुर्यकुमार यादवने अकरा डावात १६७.४७ च्या स्ट्राईक रेटने ३४५ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र या दोघांच्या नावावर एक नको असलेल विक्रमही जमा झाला आहे. मॅक्सवेल आणि सूर्या हे देखील या मोसमात सर्वाधिक वेळा खाते न उघडता म्हणजे शुन्यावरच बाद झालेले फलंदाज आहेत. या मोसमात दोघेही प्रत्येकी तीन वेळा शून्यावर आऊट झाले आहेत.
आगामी टि२० विश्वचषक स्पर्धेत मॅक्सवेल आणि सूर्या हे दोघेही आपापल्या संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या दोघांमध्येही सामन्याला स्वबळावर फिरवण्याची क्षमता आहे. मात्र, टिट्वेंटी विश्वचषकात त्यांची कामगिरी कशी राहील हे पाहाणे मनोरंजक ठरेल. कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यात सुर्यासारखा आयसीसी मानाकंनातील टि ट्वेंटीतील अव्वल खेळाडू एकदा का जम बसला भल्या भल्या गोलंदाजांना पळता भुई थोडी करतो. त्यामुळे भले तो आयपीएलमध्ये मोठी कामगिरी करू शकला नाही तरी विश्वचषकात त्याचा व्हिडीओ गेम खेळण्याचा सपाटा नक्कीच दाखवेल अशी आशा करू या.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो.नं. -९०९६३७२०८२

