श्रीरामपूर प्रतिनिधी:
शिक्षण ही एकमेव अशी जादू आहे की ते आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवू शकते. विद्यार्थ्यांनी खेड्यातून अथवा ग्रामीण भागातून आलो आहे, ही भावना मनातून काढून टाकून शिक्षणाबाबत जिद्द व स्वप्न उराशी बाळगावी असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना केले.
येथील यशोधन संपर्क कार्यालयात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर शहर व ग्रामीण तसेच राहुरी तालुक्यातील ३२ गावातील इयत्ता बारावीच्या परीक्षेत विविध शाखेतून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सरपंच अशोक भोसले, अमोल आदिक, अक्षय नाईक, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक कोंडीराम उंडे, पत्रकार नवनाथ कुताळ, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, प्रकाश कुलथे, अनिल पांडे, शिवाजी पवार, महेश मळावे, राजेंद्र बोरसे, रवी भागवत व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, मुलगा किंवा मुलगी झाल्यावर आई-वडील केवळ त्यांच्यासाठी जगत असतात. त्यामुळे मुलांचीही आई- वडिलांप्रती जबाबदारी वाढते. मित्र-मैत्रिणी ठीक आहे, परंतु आई-वडील हेच आपले पहिले मित्र आहेत, असे समजून मुलांनी आई- वडिलांशी संवाद वाढविला पाहिजे. आमच्या कुटुंबात शिक्षणाचे व आर्थिक दारिद्र्य असतानाही वडिलांनी इतर ठिकाणी कामावर न पाठवता शिक्षणासाठी बोर्डिंग मध्ये ठेवले. मी मराठी माध्यमातून शिकलो. इंग्लिश मध्ये एम. ए. करून इंग्रजी विषयाचा प्राध्यापक होऊन आयुष्याची सुरुवात केली. परंतु तेवढ्यावर समाधान न मानता व शिक्षण संस्थाचालकांची गुलामगिरी नको म्हणून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्या नेवासे तालुक्यातून मी पहिला क्लासवन अधिकारी झाल्याने माझेही गावोगावी सत्कार झाले. गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विविध महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपण काम केले. त्यानंतर या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्ही लोकांनी मला निवडून दिले. आमदारकीच्या कार्यकाळात आपण रस्ते, वीज व पाटपाण्याच्या प्रश्नांसह शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला मान खाली घालावी लागणार नाही असे काम केले.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे या हेतूने आपण यशोधन कार्यालयात सुमारे अडीच हजार पुस्तकांचे ग्रंथालय उभारले आहे. विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके या ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांनी येथे येऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी व शिक्षणासाठी अडचण आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी संपर्क साधावा, विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर राहू, अशी ग्वाही आ. कानडे यांनी यावेळी दिली.
यावेळी सचिन गुजर, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आपल्या भाषणातून आ. कानडे यांचा जीवनपट मांडून मतदार संघात झालेल्या विकास कामांची माहिती दिली. आ. कानडे यांचा बालपणापासून ते आमदारकीपर्यंतचा जीवनपट ऐकून विद्यार्थी व पालक भारून गेले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह आ. कानडे लिखित टाचाटीभा, क्रांतिपर्व, आम्ही हिंदुस्तानी ही पुस्तके तसेच सन्मानपत्र, पेन व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विद्यार्थी त्यांचे पालक व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक (नाना) कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*पत्रकार दिपक कदम -श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

