shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

टि२० पाठोपाठ वनडे मालिका जिंकण्यासाठी टिम इंडिया तयारीत


              सध्या टिम इंडिया सफेद चेंडूच्या खेळासाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या मालिकेत प्रत्येकी तीन टि२० व तीन वनडे सामने खेळले जाणार आहे. हा लेख लिहीला जाईपर्यंत सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पहिले दोनही टि२० सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. दरम्यान, वनडे मालिकेची तयारीही सुरू झाली आहे.  वनडे मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. विशेष म्हणजे सन २०२४ च्या टि२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.  या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टि२० मधून निवृत्ती जाहीर केली हे सर्वश्रूत आहेच.


             विराट कोहली जेव्हा कोलंबो विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची चाहत्यांमध्ये मागणी होती. विराट कोहली कुठेही गेला तरी त्याचे चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. विमानतळावरही असेच दृश्य पाहायला मिळाले. विराटला जो कोणी पाहतो तो त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होता. टि२० विश्वचषक २०२४ नंतर विराट कोहली पत्नी अनुष्का, मुलगी वामिका आणि मुलगा अकायसोबत लंडनमध्ये महिनाभर सुट्टीवर होता. 

               भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना २ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीसह संघातील इतर सर्वच खेळाडू कोलंबोला पोहोचले आहेत. या मालिकेची खास गोष्ट म्हणजे सन २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर कोहली आणि रोहित पहिल्यांदाच वनडे सामन्यासाठी मैदानात उतरतील. रोहित आणि कोहली रविवारी रात्री श्रीलंकेतील आयपीसी रत्नदीपा हॉटेलमध्ये पोहोचले. एकदिवसीय संघ सोमवारी म्हणजे मंगळवारी होणाऱ्या सराव सत्रात सहभागी होणार आहे.  वनडे आणि टि२० या दोन्ही मालिकेसाठी निवडलेले खेळाडू शेवटचा सामना खेळल्यानंतर ३० जुलै रोजी पल्लेकेले येथे एकत्र येतील आणि केवळ टि२० मालिकेसाठी निवडलेले खेळाडू मायदेशी रवाना होतील.

               टि२० विश्वचषकात भारताच्या विजयानंतर रोहित, कोहली आणि कुलदीप यादव पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. श्रेयस अय्यरही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून राष्ट्रीय संघात परतणार आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून शेवटचा मर्यादित षटकांचा सामना खेळला होता. एकदिवसीय संघात समाविष्ट असलेले हे सर्व खेळाडू सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली कोलंबोमध्ये सराव करतील. 

              एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सुरू होणार आहे. यानंतर तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. दुसरा वनडे ४ ऑगस्टला आणि मालिकेतील शेवटचा सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. हे तीनही सामने भारतीय प्रमाण वेळ दुपारी अडिज वाजल्यापासून दूरदर्शनच्या क्रिडा वाहिनीवर देखील दर्शक बघू शकतील. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.  या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी आणखी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 

भारताचा एकदिवसीय संघ : -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदिप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

डॉ.दत्ता विघावे,
क्रिकेट समिक्षक .
मो.नं. - ९०९६३७२०८२
close