तथागत बुद्धांचा धम्म हा कोणत्याही ईश्वर व देवदेवता यांच्या अनुकंपेवर आधारलेला नसून माणसाने स्वतः सदाचरणी राहून आपण दुःखमुक्त व्हावे आणि सर्वांचे मंगल करावे यावर आधारलेला आहे. आयुष्यात दुष्कर्म करू नका कुशल कर्म करा तरच तुमचे मंगल होईल हा सरळ साधा विचार त्यांनी मांडलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या दांभिकता आणि अंधश्रद्धा यांना बुद्धाने स्थान दिलेले नाही.
आपले मन अनेक इच्छा करत असते ,या इच्छा जेवढ्या जास्त असतात तसतसे माणसांचे मन लालसा करू लागते. इच्छेमागून इच्छा जन्म घेतात. पण या सर्व इच्छा पूर्ण करणे तरी शक्य आहे का ? नाही. मग होते दुःख . इच्छा पूर्ण नाही झाल्या की दुःख वाढत जाते. धनाची ,तनाची ,हे सगळे जग मला हवे याची इच्छा होणे हे मनाचे तरंग आहेत. इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला हे जीवन पुरणार नाही. आहे हे जीवन सतत बदलत जाणारे आहे. आपणही एकसारखे राहत नाही. अनित्य असणे ,प्रवाही असणे ,परिवर्तन होत राहणे हे संसार चक्र आहे. मनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या सुष्ट व दुष्ट इच्छा ,संवेदना पूर्ण होतील असे नाही. इच्छेच्या पाठीमागे सतत धावनाऱ्या माणसाची दमछाक होईल, त्याचे दुःख वाढतच राहील कदाचित यात त्याला मृत्यू देखील येईल. म्हणूनच इच्छा मर्यादित असाव्यात .इच्छा सर्व कल्याणकारी असाव्यात.सर्वच इच्छा पूर्ण होणार नाहीत याचे मनाला ज्ञान असेल तर मन व्याकुळ दुःखी होणार नाही. सर्व इच्छा जन्म घेतात त्या मनातून. म्हणून मनाला वळण लावणे ,मनाला समज देणे ,मन निर्मल ठेवणे ,मन शांत ठेवणे ,मन सर्व कल्याणकारी बनवणे, मनात वाईट इच्छां निर्माण झाल्यातरी त्या पासून अलिप्त राहण्याचे ज्ञान मिळविणे.सत्कर्मे करणे ,सर्व पापापासून मुक्त होण्याचा विचार करणे ,सर्वांचे मंगल होण्याचा ध्यास घेणे हाच बुद्ध विचार आहे. माणसाला देहमन मिळाले असले तरी यात निसर्गतः सतत बदल होतो. जन्माला येणारी प्रत्येक गोष्ट ही नष्ट होत असते. त्यामुळे या जगात नाव,कीर्ती, संपत्ती ,संस्कार शास्वत राहणार नाहीत .कोणीच अमर नाही सारे मृत्यू पावतात. पण तरीही या इच्छा सैराट होऊन भटकत असतात.मन भटकत असते. कोणाच्याही इच्छेपेक्षा माझ्या इच्छा महत्वाच्या आहेत,असे होऊन मीपणा वाढत जातो. हा मीपणा देखील फारकाळ टिकत नाही. आपल्या कर्माची बरी वाईट फळे माणसाला मिळत असतात. म्हणून कुशल कर्मे केली तर फळे चांगली मिळतात ,तरी देखील त्यातही आसक्ती नको. कारण ती देखील अनित्य असतात. म्हणूनच कर्म विज्ञान समजून घ्यायला हवे .मन विज्ञान समजून घ्यायला हवे . माणूस चांगली कर्मे करत राहील यासाठीच बुद्धांनी पंचशील पालन फार महत्वाचे मानले . त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका ,चोरी करू नका , व्याभिचार करू नका ,असत्य बोलू नका , आणि मती गुंग करणारी मादक पेये पिऊ नका या प्रकारची पाच महत्वाची तत्वे त्यांनी सांगितली. जगात माणसे आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी पदोपदी हिंसा करतात ,खोटे बोलतात ,अप्रामाणिक राहून व्यभिचार करतात ,इतरांचे बळकावून घेतात.दारू, गांजा अफू असल्या गुंगी आणणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे अनेक लोकांना ते दुःख देतात व स्वतःच्या वाईट कृतीचे परिणाम देखील भोगत राहतात. शीलाच्या निकषावर माणूस सदगुणी किंवा दुर्गुणी हे ठरवले पाहिजे. चांगल्या नीतीमत्तेचे मानदंड हे पंचशील पालन आहे. जो पंचशील व अन्य शिले पाळतो तो दुर्व्यवहार करणार नाही. पाप न करण्याचे हे नियम महत्वाचे आहेत त्यामुळे माणूस आयुष्यात कुशल कर्मच करीत राहील.शरीर ,वाणी आणि मन हे शुद्ध ठेवण्यासाठी शील पालन करावे. शील पालन करणाऱ्या माणसाच्या वाट्याला पश्चाताप करायची वेळ येत नाही.उलट तो काम धंद्यात व कुशल कर्मात मग्न असल्याने त्याची बरकत होत असते .त्याला माणसे मिळतात . तो कामधंदा व्यवस्थित करत असल्याने संपत्ती देखील वाढते. त्याची कीर्ती वाढत जाते. नैतिकता चांगली असल्याने लोक त्याचे शब्दावर विश्वास ठेवतात. बुद्धांनी पंचशील सांगितले तसे दुःख मुक्तीचा मार्ग अष्टांग मार्ग असल्याचे सांगितले. गौतम बुद्धांनी विविध ठिकाणी जे उपदेश केले ते सारे उपदेश शीलपालनाचे आहेत. ‘ सावधान चित्त राहा ,अनासक्त रहा ,हिंसा करू नका ,सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा,चोरी करू नका ,करवून घेऊ नका ,कोणत्याही परस्त्रीशी ,परपुरुष यांचेशी व्यभिचार करू नका ,सत्य कथन करा, मद्यपान करू नका त्याने माणूस उन्मत्त होतो, सुरापान करण्याने संपत्ती विनाश ,कलहाला आमंत्रण ,रोगाला बळी पडणे ,चारित्र्यहीन होणे ,बुद्धी भ्रष्ट होणे या गोष्टी घडतात. धूत खेळू नका ,जुगार खेळू नका , रोज सकाळी अष्टशील पालन करावे , व्यवहार सुज्ञपणे करावा .मात्यापित्यांची योग्य सेवा करावी. योग्य व्यवसाय निवडावा .दारिद्र्याचे उद्दात्तीकरण करू नका ,न्याय मार्गाने निढळाच्या घामाने धन मिळवा ,उदार मनाचे व्हा ,दान करा ,आळशी राहू नका त्यामुळे चांगले करायचे ते माणूस करत नाही. ,झोपाळू राहू नका वेळेत करावयाची कामे होणार नाहीत. दुराचरण कदापि करू नका. धनाचा उपयोग सुद्धा चांगल्यासाठी करा. केवळ बोलघेवडे असणे ,स्वार्थी असणे,स्तुतिपाठक असणे, निंदा करणे ,उधळ्या स्वभावाचे असणे हे चांगले नाही. सुख दुःखात साथ देणारी माणसे हवीत. स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी.महा मंगल सुत्त मध्ये उत्तम मंगल काय आहे हे सांगितले आहे ‘ मूर्खाची संगती न करणे सज्जनाची संगती करणे ,आदरणीय असलेल्या व्यक्तींचा योग्य सन्मान करणे ,योग्य ठिकाणी वास्तव्य करणे,पदरी पुण्याचा साठा वाढविणे,मन सन्मार्गावर दृढ करणे, सतत विद्या संपादन करणे ,अनेक कला शिकणे,सदवर्तन करणे ,समयोजित भाषण करणे,आई वडिलांची सेवा करणे ,बायकोमुलाचे योग्य रीतीने पालन करणे ,काम व्यवस्थित करणे ,धार्मिक आचरण करणे,नातलगांना मदत करणे,सत्पुरुषांचा गौरव करणे ,नम्रता बाळगणे,संतुष्ट असणे, कृतज्ञता बाळगणे, शांती बाळगणे,मधुर भाषण करणे ,श्रमणानची भेट घेणे ,पवित्र जीवन जगणे ,चार आर्यसत्ये जाणून घेणे ,सुख दुःख जीवनात आलेले असले तरी चित्त विचलित न करता शोकरहित ,निर्मल व सुखरूप राहणे हे उत्तम मंगल आहे. आळस न करता व्यवसाय केला पाहिजे. कोणत्याही कामात उत्साही राहून अधिक हितकारी काम केले पाहिजे. मिळालेल्या धनाचा दुरुपयोग न करता ती धनसंपत्ती योग्य मार्गाने खर्च करावी. कल्याणकारी कार्यातच मनुष्याने सहभागी असले पाहिजे. अति उंच व अति खालचे जीवन न जगता एक प्रकारचे समतोल जीवन माणसाने जगायला पाहिजे. मिळकतीपेक्षा जास्त करणे हे हिताचे नाही.खर्चापेक्षा आवक जास्त असेल तर योग्य चांगले जीवन जगता येईल .श्रद्धावान ,सदाचारी प्रज्ञावान व त्यागी माणूस होणे आवश्यक आहे. केवळ कीर्ती मिळावी म्हणून शील पालन करत असेल तर ते कनिष्ठ शील आहे. पुण्यकाल येण्याच्या आशेने पालन केलेले शील हे मध्यम मानलेले आहे. पण हे माझे कर्तव्यच आहे या भावनेने विचारपूर्वक पालन केलेले शील हे उत्तम समजले जावे. शील पालन केले तर मन एकाग्र करता येते. मनाची स्थिती जागरूक होते. यथार्थ ज्ञान आकलन करण्याची एक पायरी आपल्याला समजत जाते. म्हणूनच शीलवान होणे ही गोष्ट ज्ञान प्राप्तीची सुरुवात आहे.
आज समाजात बलात्कार,हिंसा,चोरी,अतिक्रमण,इतरांची धनसंपत्ती बळकावणे,व्याभिचार,खोटे बोलणे ,दांभिक वर्तन ,बुवाबाजी ,मुर्खांची वाकयुद्धे, विश्वासघात, प्रेम भंग, ऐतखाऊची पैदास ,बोलघेवडेपणा, काम चुकारपणा ,मिळकतीपेक्षा जास्त खर्च करण्याची वृत्ती, चंगळवादी वृत्ती,मानसिक अस्वस्थता,मीपणा,इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती यामध्ये वाढ झाली आहे. आर्थिक आणि सामजिक विषमतेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अशावेळी स्वावलंबी होणे,शिक्षण घेणे,सदाचारी होणे, कुशल कर्में करणे,पंचशील पालन करणे या प्रकारच्या नैतिक जगण्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे. म्हणूनच बुद्धांचे विचार दर काळात माणसाला जीवनात मंगल कसे आणावे हा सांगणारा विचार आहे. म्हणून जनहो ,खूप विचारपूर्वक शीलपालन करणे का महत्वाचे आहे ते समजून घेऊया.
*लेखन
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा - ९८९०७२६४४०
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११

