shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेन्नईच्या गुहेत घुसून आरसीबीचा हल्लाबोल !



                 कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतका नंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सीएसकेचा ५० धावांनी पराभव केला. सन २००८ नंतर चेपॉक स्टेडियमवर आरसीबीचा हा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावा केल्या होत्या, परंतु चेन्नईचा संघ निर्धारित षटकात आठ विकेट गमावत १४६ धावाच करू शकला. सीएसकेसाठी सर्वाधिक धावा रचिन रवींद्रने केल्या, त्याने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी १६ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा करून नाबाद  परतला. 

                   सन २००८ मधील आयपीएलच्या पहिल्या सत्रात आरसीबीने सीएसकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते,  तेव्हापासून या मैदानावर त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत होता. आरसीबीने शुक्रवारी चेपॉकवरचे आपले वाईट दिवस संपवले, आणि ६१५५ दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर येथे विजय मिळवला. कर्णधार पाटीदारनंतर, आरसीबीच्या विजयात गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे होते, ज्यांनी सीएसकेच्या फलंदाजांना कधीही आरामदायी स्थितीत येऊ दिले नाही. 

                    विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि जोश हेझलवूडने त्यांना दोन धक्के दिले. यानंतर दीपक हुडाच्या रूपाने त्यांना तिसरा धक्का बसला. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या शिवम दुबेने रचिनसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश दयालने या दोन्ही फलंदाजांना आपले बळी बनवले. शिवम १९ धावा करून परतला. शेवटच्या षटकात धोनीने क्रुणाल पांड्यावर सलग दोन षटकार आणि एक चौकार लगावला, पण चेपॉकवरचा पराभवाचा तिढा सोडविण्यात आरसीबीला यश आले.      

                   धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण आपली छाप सोडण्यात तो यशस्वी ठरला. रविचंद्रन अश्विनला बाद करून लियाम लिव्हिंगस्टोनने सीएसकेला सातवा धक्का दिला. धोनी फलंदाजीला आला तेव्हा सीएसकेने ९९ धावांत सात गडी गमावले होते. धोनी मैदानात उतरताच चेपॉकमधील चेन्नईच्या चाहत्यांनी उत्साहात उड्या मारल्या आणि धोनी-धोनीच्या घोषणाबाजीला सुरुवात केली. माहीनेही चाहत्यांना निराश केले नाही आणि स्फोटक फलंदाजी केली. धोनीने या सामन्यात १८७.५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली ज्यात त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. यासह धोनी आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. धोनीने या प्रकरणात माजी अष्टपैलू सुरेश रैनाला मागे टाकले. रैनाने याच फ्रँचायझीसाठी ४६८७ धावा केल्या आहेत. धोनीने आतापर्यंत ४६९३ धावा केल्या असून तो संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला आहे. मात्र, तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. 

                 अष्टपैलू रविंद्र जडेजाने चांगली फलंदाजी केली आणि आयपीएलमध्ये तिन हजार धावा आणि शंभर बळी पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला. या सामन्यात जडेजाने २५ धावा केल्या, तर अश्विन ११ धावा करून बाद झाला. आरसीबीकडून हेझलवूडने तीन बळी घेतले, तर यश आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी दोन आणि भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली. आरसीबीने सन २०२५ च्या मोसमाची चांगली सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी गतविजेत्या केकेआरचा पराभव केला आणि आता सीएसकेला पराभूत करून त्याने सलग दुसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही विजय प्रतिपक्षाच्या बालेकिल्ल्यात घुसून मिळविले आहेत.

                 तत्पूर्वी, सीएसकेने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार रजत पाटीदारचे अर्धशतक आणि शेवटच्या षटकात टीम डेव्हिडच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सीएसकेसमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. १९० धावांचा टप्पा पार करण्यात आरसीबीला यश आले तर त्याचे श्रेय पाटीदार तसेच टीम डेव्हिडला जाते. शेवटचे षटक टाकायला आलेल्या सॅम कुरनला डेव्हिडने सलग तीन षटकार खेचले आणि या षटकात एकूण १९ धावा केल्या. डेव्हिडने २२ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद २२ धावा केल्या.


                   आरसीबीचा नवा कर्णधार रजत पाटीदारने सीएसकेविरुद्ध अर्धशतक झळकविले. त्याने ३२ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. चेपॉक येथे आरसीबीच्या कर्णधाराची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. आरसीबीचा कर्णधार म्हणून कोहलीने चेपॉकमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने २०१३ मध्ये चेपॉक येथे चेन्नई विरुद्ध ४७ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या. 

                  आरसीबीला सॉल्ट आणि कोहलीकडून चांगली सुरुवात झाली, पण सीएसकेने पुनरागमन केले. आरसीबीकडून सॉल्ट ३२, कोहली ३१, देवदत्त पडिक्कल २७, जितेश शर्मा १२ धावा आणि लियाम लिव्हिंगस्टोन १० धावा केल्या. सीएसकेकडून फिरकीपटू नूर अहमदने तीन, तर मथिशा पाथिरानाने दोन, खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

                 मागील सतरा वर्ष हुलकावणी देणारे आयपीएलचे अजिंक्यपद यंदा रजत पाटीदारच्या नेतृत्वात मिळविण्यासाठी संपूर्ण आरसीबी चमू प्रयत्नांची पराकष्टा करत आहे. त्याचे फळ त्यांना विजेतेपदाच्या रुपात मिळते का ? हे बघणं औत्सुक्याचे बनले आहे.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close