shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएलमधील सर्वाधिक बळी, धावा, चौकार, षटकारांचे मानकरी



                    इंडियन प्रिमियर लिग अर्थात आयपीएलचा अठरावा हंगाम सुरू होण्यास थोडाच अवधी बाकी आहे.  बावीस मार्चपासून या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या स्पर्धेला सुरुवात होणार असून, पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.  या सत्रात दहा संघांमध्ये तेरा वेगवेगळया स्टेडियम्समध्ये ६५  दिवसांत एकूण ७४ सामने खेळविले जातील, ज्यामध्ये लीग फेरीतील सत्तर आणि प्लेऑफ मधील चार सामने असतील.  फायनलसह सर्व प्लेऑफ सामने २० ते २५ मे दरम्यान हैदराबाद आणि कोलकाता येथे खेळविले जाणार आहेत.          

               हैदराबाद येथे २० मे २०२५ आणि २१ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना आणि एलिमिनेटर सामन्याचे आयोजन होणार आहे.  यानंतर कोलकाता २३ मे २०२५ रोजी दुसरा क्वालिफायर सामना आणि २५ मे रोजी अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने होणार आहेत.  दुहेरी सामन्याच्या दिवशी पहिला सामना दुपारी साडेतीन वाजल्या पासून तर दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. 

                   आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली भलेही आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून देऊ शकला नसेल पण त्याची वैयक्तिक कामगिरी कधीच कमी झालेली नाही. आकडेवारी याची साक्ष देत आहेत.  उजव्या हाताचा हा फलंदाज आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.  त्याने सन २००८ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली.  विद्यमान स्पर्धेत तो आरसीबीचा फक्त एक घटक असणार आहे. 

                आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनने गेल्या वर्षी निवृत्ती जाहीर केली होती.  तो सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू आहे.  त्याने २२२ सामन्यात ७६४ चौकार मारले.  या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.  त्याने आतापर्यंत खेळलेल्या २५२ सामन्यांमध्ये ७०५ चौकार मारले आहेत.  आगामी मोसमात तो धवनला मागे सोडू शकतो.  किंग कोहलीने २५२ सामन्यांमध्ये १३१.९७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.  सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे.  त्याच्या नावावर २२१ सामन्यात ६७६९ धावा आहेत.  रोहित शर्मा ६६२८ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

                  सध्या भारतीय संघातून डावलला जात असलेला स्टार फिरकीपटू यजुवेंद्र चहल भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी भले धडपडत असेल पण तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चमकण्यासाठी सज्ज झाला आहे.  यावेळी तो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.  याआधी तो मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.  या उजव्या हाताच्या लेगस्पीन गोलंदाजाच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे.  त्याने १६० सामन्यात ७.८४ च्या इकॉनॉमी रेटने २०५ गडी बाद केले आहेत.

                 वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे.  त्याने १४२ सामन्यात ३५७ षटकार ठोकले आहेत.  'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल या लीगमधील चार संघांकडून खेळला आहे.  यामध्ये केकेआर, किंग्ज इलेव्हन पंजाब, पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांचा समावेश आहे.  सर्वाधिक षटकार मारण्यात रोहित शर्मा (२८०) आणि विराट कोहली (२७२) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  आगामी स्पर्धेत हिटमॅनला मागे टाकण्याची सुवर्णसंधी किंग कोहलीला आहे. पण रोहितही या सत्रात खेळत असल्याने त्यालाही तीनशेचा जादूई आकडा गाठण्याची संधी आहे.

                 आयपीएल अनेक विक्रमांसाठी सुप्रसिद्ध असून यंदाही धावांच्या उंच उंच इमारती बघायला मिळतील चौकार षटकारांचा वर्षाव होईल. काही सामन्यात बळींचीही कोंडी फुटेल. प्रेक्षकांना पुढचे दोन महिने भर उन्हाळ्यात क्रिकेटच्या आनंदात चिंब होण्याचा आनंद मिळेल. या सारखी मनोहर घटना क्रिकेट जगतात दुसरी काय असू शकते.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close