अठरावी आयपीएल स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तस तसा आरसीबीचा खेळ सुधारत आहे तर मुंबईचा संघ खालच्या दिशेने घसरत आहे. सोमवारी विराट कोहली (६७) आणि कर्णधार रजत पाटीदार (६४) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दहा वर्षांनंतर घरच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा बारा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी बाद गमावून २२१ धावा केल्या. संपूर्ण षटके खेळल्यानंतर मुंबई संघाला नऊ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. योगायोगाची बाब म्हणजे मागच्या सामन्यातही लखनौ विरूध्द मुंबईचा बारा धावांनीच पराभव झाला होता.
आरसीबीचा हुकमी एक्का विराट कोहलीने टी२० मध्ये तेरा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. आपल्या खेळीत त्याने ४२ चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शानदार खेळी केली. पाटीदारने ३२ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने तुफानी खेळी केली. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी शेवटच्या क्षणी तुफानी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळू शकले नाही.
मुंबईला विजयासाठी २२२ धावांची गरज होती. हे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईला वेगवान सुरुवातीची गरज होती. रोहित शर्माने प्रयत्न केला, पण तो फार काळ टिकू शकला नाही. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यश दयालने त्याला त्रिफळाचित केले. त्याने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावा केल्या. दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टन तुफानी फलंदाजी करत होता. त्यानेही १० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. जोश हेझलवूडने त्याला आपला बळी बनवले. विल जॅकही जास्त काही करू शकला नाही. त्याला १८ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २२ धावा करता आल्या.
मुंबईला सर्वात जास्त अपेक्षा सूर्यकुमार यादवकडून होत्या, जो शानदार फलंदाजी करत होता. त्याला तिलक वर्मा चांगली साथ देत होता. यश दयालने येथे पुन्हा एकदा मुंबईसाठी धोकादायक ठरत सूर्यकुमारला बाद केले. सूर्याने २८ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने २८ धावांची खेळी केली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने जे केले, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने येताच वादळ निर्माण केले आणि जोश हेझलवूडच्या षटकात २२ धावा ठोकल्या. यानंतर त्याने त्याचा भाऊ कृणालच्या षटकातही धावा केल्या. इथून सामना मुंबईच्या दिशेने वळणार असे वाटत होते. नेमकं त्याच वेळी अठराव्या षटकात भुवनेश्वर कुमारने तिलक वर्माला बाद करून आरसीबीला सामन्यात परत आणले. चौथ्या चेंडूवर सॉल्टने त्याचा झेल घेतला. तिलकने २९ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेझलवूडने पांड्याला लिव्हिंगस्टनकरवी झेलबाद केल्याने मुंबईच्या आशा पल्लवित झाल्या.
हार्दिकच्या आधी ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, मोहम्मद नबी, समित पटेल, किरॉन पोलार्ड, रवी बोपारा, डॅनियल ख्रिश्चन, मोईन अली, शेन वॉटसन आणि मोहम्मद हाफीज यांनी टी-२० मध्ये ५ हजार धावा आणि २०० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. हार्दिकने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात चार षटकांत ४५ धावा देत दोन बळी घेतले.
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सामना खेळून मोठी कामगिरी नोंदवली आहे. मुंबई संघ टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा संघ बनला आहे. हा मुंबईचा २८८ वा टी-२० सामना आहे आणि या बाबतीत मुंबईने टी २० क्रिकेटच्या इतिहासात २८७ सामने खेळलेल्या सॉमरसेटला मागे टाकले आहे.
या सामन्यातून जसप्रीत बुमराह मैदानात परतत असल्याचे कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले. अश्विनी कुमारच्या जागी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तर आरसीबीने मागच्या सामन्यात खेळलेल्या संघात कुठलाही बदल केला नाही.
मुंबईचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याने पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकविले आहे. रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली मुंबईने पाचही जेतेपदे जिंकली आहेत. मात्र, आता संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. आयपीएल २०२५ मध्ये हार्दिककडे मुंबईचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची गेल्या मोसमात कामगिरी चांगली नव्हती आणि ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होते. यंदाच्या मोसमातही मुंबईची कामगिरी आतापर्यंत तरी काही विशेष झाली नाही आणि संघाने चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे आणि तळालाच लोंबकळत आहेत.
मुंबईचे सततचे पराभव त्यांना गुणतालिकेत निव्वळ तळाला ढकलत नाही. तर प्ले ऑफच्या शर्यतीतून दूर ढकलत आहेत. त्यांचे अजून ९ सामने बाकी असून सर्व जिंकले तर ते आरामात अंतिम चार संघात दिसतील. मात्र हे तोंडाने बोलतो तेवढे सोपे नाही. सर्वप्रथम त्यासाठी त्यांना आलेली मरगळ झटकावी लागेल, तरच त्यांच्या पाठी लागलेले पराभाचे शुक्लकाष्ट सहजगत्या हटेल.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२

