shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रबोधन...!


इतिहासाचा अखेरचा टप्पा हा प्रबोधन काळ म्हणून ओळखला जातो. या काळात भौगोलिक शोध, चळवळ अशा अनेक घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून त्या युगाला प्रबोधन युग म्हणलं जातं.


प्रबोधन म्हणजे काय?  असा प्रश्न आपणा सर्वांना पडला असेल?  प्रबोधन म्हणजे जागृकता, सजग करणं होय. कारण, कोणतीही घटना घडल्यानंतर त्या घटनेनंतर बदलणारा दृष्टीकोन योग्य की अयोग्य? योग्य असेल तर का? याचा वैचारिक पुरावा आपल्याकडे असायला हवा. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकारण, विज्ञान,‌ साहित्य, इतिहास या सर्व क्षेत्रात प्रबोधन झाल्यानंतर मानव जातीचा दृष्टिकोन बदलला हे प्रामुख्याने दिसले आहे.
 अनेक क्षेत्रात वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. परंतु त्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीपर्यंत केलेल्या कामाची माहिती असते.फार तर फार इतरांना पुरस्कार मूर्ती आणि पुरस्काराचं नाव माहीत होतं. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाची दखल सर्वान पर्यंत पोहोचायला हवी. कारण त्यात त्यांचे विचार, गुण,  कल्पना, आणि संघर्ष दडलेला असतो. यामुळे आपल्याला मार्ग गवसण्याची शक्यता असते. आपली देखील कल्पनाशक्ती जागृत होते. मर्यादित विचार आणि त्यापलीकडे जाऊन विचारांची परिसीमा बदलत जाते आणि जीवन जगण्याचा हेतू देखील लक्षात येतो.
थोडक्यात प्रबोधन म्हणजे दोन ओळी आणि दोन शब्दां मधील अंतरात लपलेला अर्थ माहीत करून घेणं.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस पुरस्कार भेटल्यानंतर भाषणामध्ये अनेकदा परिस्थितीचा उल्लेख केला जातो. त्यावेळी जेमतेम परिस्थितीत खूप काही संघर्ष केला आणि आज हा सन्मान मिळाला. हे दोन वाक्य दोन सेकंदात बोलून झाले परंतु, तो काळ सरताना त्याची तगमग, प्रयत्न आणि वाट काढत पुढे चालण्याची दृष्टी त्यांच्यावरील आरोप, प्रत्यारोप हे सर्व, त्या दोन ओळींच्या अंतरात दडलेलं असतं.अर्थ शोधून समजून घेणं, आणि इतरांना समजावणं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रबोधन आहे.
हे प्रबोधन इतिहासातील, स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्त, साहित्यिक, एखादा सामान्य माणूस ज्याच्या कामाची दखल घेण्यासारखी असेल अशा सर्वांबद्दल प्रबोधन करता येऊ शकतं.
ब्रिटीश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढत होते, इंग्रज भारतीय क्रांतिकारकांना एकत्रित येऊ देत नव्हते, तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग शोधून काढला. गणेश उत्सव सुरू केला. या माध्यमातून, टिळकांनी लोकांना एकत्र आणले, ज्यामुळे सामाजिक बांधिलकी वाढली आणि लोकांना एकत्रित करून लोकप्रबोधन करण्यात आलं. लोकांना कशा प्रकारे जागृत करता येऊ शकतं, त्याचा विचार करणं यालाच तर प्रबोधन म्हणतात.
एखादा ज्येष्ठ साहित्यिक असेल त्यांच्या अनुभवांची शिदोरी, विचार  पुस्तक रूपी आरशात दिसून येतात, आणि कालांतराने रसिकांना त्याचा गंधही लागतो. त्यावेळी आवडलेल्या शब्दांमागची भूमिका, अर्थ लक्षात येतात
एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वैचारिक दृष्टीकोण हा गुण जन्मतः येत असतो. काहींचा स्वभाव निराळा असला तरीही, या  वैचारिक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी निर्माण व्हायला हवी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. तेच प्रयत्न प्रबोधना मार्फत करता येतात.
कोणतेही विचार प्रयोग म्हणून करताना, त्याचे उद्दिष्ट सरळ स्पष्ट असायला हवेत, हे पूर्व काळापासून प्रामुख्याने दिसून येत आहे. परंतु आजच्या दिवसात चर्चा खूप होत आहे पण चर्चा कशावर करायला हवी याचा विचार करताना कोणीही दिसत नाही. प्रबोधन लांबची गोष्ट आहे.
आरोग्य, जीवन, कला, आर्थिक गुंतवणूक, समाज,अंधश्रद्धा, यासारख्या विषयांवर चर्चा व्हायला हवी.  विचारांची देवाण घेवाण झाली तर विचारांची परिसीमा वाढेल.   शेवटी एकच
सामर्थ्याने जोडणाऱ्यास महत्त्व आहे, प्रसिद्धी नाही
नाश नाही, विनाश नाही, हे सांगती दिशा दाही
सृजनशीलतेचा प्रतिनिधी तू, स्मरण ठेव सर्वकाळी
नैराश्य वृत्ती संपवणारी, अंगणी तुझ्याच सदाफुली
या माणुसकीचा दिवा पेटुनी, होईल अमर ज्वाला
जोड तू बंध मानवा, होईल एक नवी शृंखला
आपणच पुढे येऊन वैचारिक बीज पेरायला हवं.भल ही  त्या कामाची दखल कोणी घेईल अथवा घेणार ही नाही, पण वैचारिक प्रगतीच्या दिशेकडे डोळसपणे टाकलेले पाऊल असेल, आणि त्या बीजाला अंकुर फुटेल हे नक्की.. 

 *शुभम जगन वाघ. अहिल्यानगर.*
close