जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत जागतिक योगदिन उत्साहात साजरा
इंदापूर : कौठळी, २१ जून – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे २१ जून रोजी जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, योगाचे महत्त्व त्यांच्या मनामनात रुजावे या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने व स्वागतगीताने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक अमित भोंग सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी योग म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचा समन्वय असल्याचे स्पष्ट केले. विविध आसनांच्या माध्यमातून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते, मानसिक संतुलन राखता येते आणि एकाग्रता वाढते, हे त्यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावले.
आरती गायकवाड मॅडम यांनी प्राणायामाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, प्राणायाम केल्याने श्वसनसंस्थेला बळकटी मिळते, मन शांत राहते, तणाव दूर होतो आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्षमतेत वाढ होते.
त्यानंतर शिक्षक भारत ननवरे सर यांनी विविध योगासने – ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, ध्यान – यांची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे योग शिकवला. मुलांनीही मोठ्या उत्साहाने त्यात भाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी योग हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून दररोजच्या दिनचर्येचा भाग व्हावा, अशी प्रेरणादायक भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना दिशा दिली.
हा योगदिन शिस्त, आनंद आणि आरोग्यविषयक जागृतीने भरलेला ठरला. योगामुळे शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहते, याचा अनुभव विद्यार्थ्यांना यानिमित्ताने मिळाला. यावेळी शिक्षक,विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.