shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
इंदापूर : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण देशभरात दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून योग संगम या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

विशेष म्हणजे या राष्ट्रीय स्तरीय उपक्रमासाठी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर  या संस्थेने अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान महोदयांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली, ज्यात त्यांनी योगाचे शरीर-मन-आत्मा यामधील समन्वय आणि तणावमुक्त जीवनासाठीचे महत्त्व अधोरेखित केले. ज्याचे ऑनलाइन प्रक्षेपण संस्थेने केले. त्यानंतर ७.०० ते ७.४५ वाजेपर्यंत, संस्थेच्या प्रांगणात, (आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार खुल्या मैदानात) योगासने व प्रात्यक्षिक सत्र पार पडले.

या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश चौधरी यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे महत्त्व व आधुनिक जीवनशैलीत त्याची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे गणेश चौधरी हे स्वतः एक माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्य करणारे अभियंता आहेत ज्यामुळे त्यांना आजच्या धकाधकीच्या जीवना ताणतणावाचे व्यवस्थापन करणे व त्याचे महत्त्व काय आहे याची पुरेशी जाण आहे. त्यांनी आपल्या सुलभ शैलीत योगाचे विविध प्रकार सादर करून १०० पेक्षा अधिक उपस्थितांना प्रत्यक्ष योगाभ्यास शिकवला. तसेच त्यांनी आपल्या मनोगता मध्ये योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य कसे राखले जाऊ शकते याविषयी विस्तृतपणे माहिती सांगितली.
कार्यक्रमात इंदापूर पोलिस निरीक्षक श्री. सूर्यकांत कोकणे तसेच प्रसिद्ध व्यापारी श्री. नीलेश चव्हाण आणि श्री. पंकज चव्हाण यांनी देखील सहभाग घेत योगप्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला. 
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप व कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्रा. डॉ. संधीकर यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी सांगितले की, योग ही भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे आज जगभरातील अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये योगाचा अभ्यास, संशोधन आणि आचरण मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. विशेषतः आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग अत्यंत प्रभावी मानला जात असून, आता अरब देशांमध्येही योग प्रशिक्षकांना मोठी मागणी आहे. तिथे वैयक्तिक योग शिक्षक व ट्रेनर्स यांना करिअरसाठी उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे योगाभ्यास ही केवळ साधना न राहता जागतिक स्तरावर आरोग्यविषयक व्यवसायाचे सामर्थ्य बनले आहे.
त्यानंतर डॉ देशपांडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आणि यानंतर कार्यक्रमाची सांगता अल्पोपहराने झाली.

या योग दिनानिमित्त उपस्थित सर्वांनी "नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि समाधानी जीवन जगण्याचा" निर्धार व्यक्त केला. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या उपक्रमाचा उद्देश केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक व अध्यात्मिक आरोग्य वृद्धिंगत करून तणावमुक्त व सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे हा होता.
close