प्रतिनिधी – :एरंडोल येथील एका इंग्लिश मिडीयम शाळेविरुद्ध गंभीर तक्रार पुढे आली आहे. या शाळेला राज्य शासनाच्या अभ्यासक्रमाची परवानगी असतानाही प्रत्यक्षात सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम शिकवला जात असल्याचा आरोप पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केला आहे.
तक्रार करणाऱ्या पालक ज्योती सिद्धेश महाजन यांनी सांगितले की, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची ही इंग्लिश मिडीयम शाळा आहे. या शाळेला राज्यशासनाकडून १ली ते १०वी वर्गासाठी राज्य पाठ्यक्रम शिकवण्याची अधिकृत परवानगी मिळालेली आहे. मात्र प्रत्यक्षात शाळेत १ली ते ८वी वर्गासाठी CBSE अभ्यासक्रम राबवण्यात येत असून त्यासाठी विद्यार्थ्यांना सीबीएसईचे महागडी पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे पालकांवर आर्थिक बोजा वाढला असून विद्यार्थ्यांवर देखील अभ्यासाचा ताण येत आहे.
महाजन यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या मुलीवर अभ्यासाचा मोठा ताण असल्यामुळे ती शाळेत जाण्यास उत्सुक नाही. यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा अधिकार (Right to Education) अधिनियमाच्या विरोधात हे प्रकरण जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ९वी ते १०वी या वर्गांसाठी शाळा राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकवते. मात्र १०वीसाठी शाळेला परीक्षा घेण्याची मंडळ मान्यता नसल्यामुळे त्या वर्गातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या दुसऱ्या शाळेत - रा.ती. काबरे विद्यालयात परीक्षा बसवले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या संपूर्ण प्रकाराची चौकशी तातडीने करून दोषींवर कारवाई न केल्यास आपण उपोषणास बसू, असा स्पष्ट इशारा ज्योती महाजन यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.