गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई; चार महिन्यांपासून होता फरार...
जळगाव | 28 जुलै 2025 –
शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह (वय 24, रा. मशीदजवळ, शिरसोली प्र.न. जळगाव) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
चार महिन्यांपासून फरार असलेला मुस्तकीम याच्या हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. रविवारी, 27 जुलै रोजी तो सिंधी कॉलनी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार अकरम शेख व शिपाई रवींद्र कापडणे यांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
या गुन्ह्याप्रकरणी यापूर्वी सागर शिवराम डोईफोडे (वय 28, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला 14 फेब्रुवारी 2025 रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. अटकेदरम्यान सागरने, मुस्तकीम शाह, रवी चव्हाण व नितीन चव्हाण (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांच्यासोबत मिळून घरफोड्यांचे गुन्हे केल्याची कबुली दिली होती.
पोलिसांना खबर मिळताच मुस्तकीमने सुरत येथे पलायन केले होते. मात्र सततच्या शोधमोहीमीनंतर तो जळगावमध्ये दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कारवाईत हे अधिकारी होते सक्रिय...
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रवींद्र कापडणे व चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली