परभणी प्रतिनिधी:
भीमसैनिक वडार युवक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलीस मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यूला उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले असून न्यायालयाच्या आदेशानुसार दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. अशोक घोरबांडसह सर्व आरोपी पोलिसांना अटक केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असा इशारा वडार समाज संघाचे मुख्य संघटक डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी दिला आहे.
डॉ. रॅपनवाड यांच्या नेतृत्वाखालील वडार समाज संघाच्या शिष्टमंडळाने परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. निवेदन देताना पोलिसांच्या गुंडशाहीला आळा घालण्याची आणि न्यायालयीन आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात प्रदेश सचिव डॉ. लक्ष्मणराव बामणे (परभणी), प्रा. ॲड. साहेबराव बेळे (नांदेड), महादेव देवकर (परभणी), लक्ष्मणराव शेळके (लोहा), बालाजी जाधव, मारुती नारायण धोंडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. रॅपनवाड यांनी संतप्त शब्दांत म्हटले की,
“सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस अत्याचाराचा बळी आहे. निर्दोष युवकाचा जीव घेणाऱ्या पोलिसांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही दोषींवर गुन्हा नोंदवला गेला नाही, हे कायद्याचा खुलेआम अवमान आहे. अशोक घोरबांडसह सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
वडार समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की हा फक्त एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. पोलिसांची गुंडशाही सहन केली जाणार नाही. दोषींना तात्काळ अटक न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन पेटवले जाईल, असा इशारा देण्यात आला.
स्थानिक जनतेत प्रचंड रोष असून, “पोलिसांच्या वर्दीत लपलेले गुन्हेगार” असे संतप्त उद्गार नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत. वडार समाज संघाने आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
➡️ महत्त्वाची मागणी:
✅ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोषींवर गुन्हा दाखल करा
✅ आरोपी पोलिसांना तात्काळ अटक करा
✅ पीडित कुटुंबाला न्याय व भरपाई द्या
✅ पोलिस अत्याचारांवर स्वायत्त चौकशी समिती नेमावी
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशा निर्धाराने वडार समाज संघ मैदानात उतरला आहे.
००००