इंदापूर :रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलने २६ व्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून इंदापूर नगरपरिषद मैदानावर तालुक्यातील माजी सैनिक बांधवांचा सन्मान सोहळा अत्यंत गौरवपूर्वक पार पाडला. देशासाठी आपले जीवन समर्पित केलेल्या या शूरवीरांचा यथोचित सन्मान करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे आयोजन क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे आणि क्लब च्या सदस्यांनी केले होते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माजी सैनिकांना फेटा बांधून, पुष्पहार अर्पण करून आणि शुभेछा देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक माजी सैनिक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रो.ज्ञानदेव डोंबाळे म्हणाले की, "प्रत्येक सैनिक हा परमेश्वरा इतकाच पूजनीय आहे. देशासाठी सेवा करणाऱ्यांचा सन्मान करणे हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून राष्ट्रीय ऋण आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत, हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे."
या सन्मान सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे सक्रिय सदस्य रो.समीर सूर्यवंशी, रो.तात्यासाहेब वाघमारे, जय इंस्टीट्युट ऑफ नर्सिंग चे रो.श्री.जयवंत नायकुडे सर आणि नर्सिंग कॉलेज च्या मुली तसेच युवा क्रांती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रो.प्रशांत शिताप रो.धरमचंद लोढा अस्लम शेख सचिन चौगुले तसेच रोटरी क्लब चे विविध पदाधिकारी आणि शहरातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते आणि सर्वच माजी सैनिकांना उपस्थितांकडून उभे राहून टाळ्यांच्या गजरात सलाम करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिला आहे. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि राष्ट्रसेवा या क्षेत्रांमध्ये क्लबचे योगदान लक्षणीय आहे. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा सन्मान करून क्लबने देशभक्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे.