!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
२५ जुलैच्या सकाळी साधारणतः साडे अकराच्या सुमारास शुभांगी ताई भडभडेंचा फोन आला. त्यांना माझ्याकडून काही माहिती हवी होती. ती माहिती शेअर केल्यावर मग इतर गप्पा सुरू झाल्या. (शुभांगीताईंचा फोन म्हणजे पंधरा मिनिटाची तर निश्चिंती असायचीच) या गप्पांमध्येच सध्या समाज माध्यमांवर मी चालू केलेल्या "आयुष्यातले सांगाती" या लेखमालिकेचा विषय निघाला." तुम्ही खरंच खूप छान आठवणी लिहीत आहात. तुमच्या पन्नास वर्षाच्या पत्रकारितेत अनेक मोठ्या व्यक्तींची तुमचा संबंध आला. त्या आठवणी तुम्ही सामान्यांपर्यंत पोहोचवता. ही खरंच चांगली बाब आहे. असेच नियमित लिहा आणि मग त्याचे आपण पुस्तक करूया. बाकी तुमच्या आठवणीला मला दाद द्यावीशी वाटते. अगदी पन्नास वर्षांपूर्वीचे संदर्भ सुद्धा तुम्ही काल घडले अशा थाटात लिहिता" असे सगळे सांगून शुभांगी ताईंनी माझे कौतुक केले. फोनवरचे बोलणे थांबवता थांबवता त्या एक वाक्य बोलल्या. "तुमच्या या लेखमालिकेत कधीतरी माझ्यावर सुद्धा लिहा, आणि हो, ते जिवंतपणेच लिहा. नाहीतर मी गेल्यावर लिहिले तर त्याचा काही उपयोग नाही. शुभांगी ताई असे म्हणताच मी त्यांना लगेच उत्तरलो, शुभांगीताई तुम्हाला इतक्यात काही होत नाही. तुम्हाला शंभर वर्ष जगायचं आहे,
खूप खूप लिहायचं आहे, आणि तुमची शताब्दी आम्ही सर्व मिळून साजरी करू" माझ्या या उत्तरावर शुभांगी ताई म्हणाल्या "नाही हो , कुठे १०० वर्ष जगवता? आजकाल कोणाच्या आयुष्याचा काही भरोसा नसतो. माझेही काय सांगता येते?" त्यावर मी म्हणालो," तस नाही ताई तुमची तब्येत चांगली आहे आणि विशेष म्हणजे अजूनही तुम्ही तुमच्या आवडीचे लेखनाचे काम करता, त्यामुळे तुमची तब्येत बिघडायला काही कारणच नाही. तुम्ही शंभर वर्ष जगणारच" असे म्हणत मी फोन बंद केला.
अवघ्या तीनच दिवसांनी म्हणजे काल सकाळी ११ च्या सुमारास व्हाट्सअप बघत होतो. अचानक एक दोघांनी शुभांगी ताईंना श्रद्धांजली अर्पण केल्याचे दिसले. मी एकदम दचकलोच. लगेच तरुण भारतची वेबसाईट उघडून पाहिले. त्यावर शुभांगी ताई पहाटेच गेल्याची बातमी होती. तरीही माझा विश्वास बसला नाही. मी शुभांगीताईंच्याच मोबाईल नंबरवर फोन लावला. फोन त्यांचा नातू अभिषेक ने उचलला. त्यानेही बातमी कन्फर्म केली. काल संध्याकाळी आजी एका कार्यक्रमाला गेली होती. रात्री घरी आली, जेवली आणि सगळ्यांशी बोलून झोपली. सकाळी तिला उठवायला गेलो तर ती उठलीच नव्हती. मग डॉक्टरांना बोलावले तेव्हा ती झोपेतच गेल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती मला अभिषेकने दिली. वैदर्भीय वाङ्मय विश्वातील एक प्रदीर्घ पर्वाचा अखेर अंत झाला होता.
शुभांगीताईंचा माझा परिचय झाला तो १९८० मध्ये. त्यावेळी धरमपेठेत माझा फोटो स्टुडिओ होता. तसेच मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणूनही कार्यरत होतो. माझा एक मित्र नंदू मुजुमदारने लक्षवेधी नावाचे एक मासिक सुरू केले होते. मला देखील लेखनाची आवड असल्यामुळे मी काही विषयांवरील मुलाखती घेऊन त्या नंदूला प्रकाशित करण्यासाठी देत होतो. शुभांगीताईंच्या एक शेजारी मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याची पत्नी होत्या. जहाजावरील आयुष्य त्यांनी अनुभवले होते.त्यामुळे त्यांची मुलाखत मी घेऊन नंदूला दिली होती. त्यांच्याकडून शुभांगी ताईंना माझ्याबद्दल कळले. एक दिवस शुभांगी ताईंचे माझ्या स्टुडिओच्या पत्त्यावर पत्र आले. त्यात लक्षवेधीमध्ये मला देखील लेखनाची संधी मिळेल काय अशी त्यांनी विचारणा केली होती. नंदूला सुद्धा काही नवीन लेखक हवेच होते. त्यामुळे एक दिवस सकाळी मी शुभांगी ताईंच्या अजनी चौकातील रामकृष्ण नगरच्या पत्त्यावर त्यांचा शोध घेत पोहोचलो. त्यावेळी त्या नव्यानेच लेखिका म्हणून समोर आल्या होत्या.तरुण भारतच्या बालविभाग पुरवणीत त्या लेखिका म्हणून समोर येत होत्या. त्यांच्याकडे मी गेल्यावर माझा परिचय दिला आणि त्यांच्याशी मी चर्चाही केली. मग अधून मधून आमच्या भेटी सुरू झाल्या. कधीमधी धरमपेठला आल्या की त्या आवर्जून मला भेटायच्या.
१९८५-८६ नंतर मी दूरदर्शन साठी वृत्तचित्रणे, तसेच वृत्तपट आणि दूरदर्शन मालिका तयार करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी मी विदर्भातील नवे नवे लेखक शोधत होतो. स्टेट बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी देखील माझी धडपड सुरू होती. त्या दरम्यान शुभांगी ताई एकदा माझ्याकडे आल्या. तोपर्यंत त्या लेखिका म्हणून चांगल्याच प्रतिष्ठित झाल्या होत्या. त्यांची एव्हाना काही पुस्तके देखील प्रकाशित झाली होती.
१९९०-९१ मध्ये दूरदर्शनने देशभरातून नव्या मालिकांसाठी प्रस्ताव मागत होते मागवले होते. त्यावेळी मला शुभांगीताईंचे आठवण झाली. तोपर्यंत त्यांनी अजनी चौक सोडला होता, आणि हिंगणा रोडवर लोकमान्य नगर मध्ये त्यांनी स्वतःचे घर बांधले होते. एका रविवारी दुपारी मी त्यांचा पत्ता शोधत त्यांच्या घरी धडकलो. त्यांनी माझे अगत्याने स्वागत केले होते. त्या दिवशी त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर काम करायचे देखील ठरले. त्यादरम्यान त्यांच्या माझ्या बऱ्याच भेटी झाल्या.
दुर्दैवाने मी दूरदर्शनला दिलेले प्रस्ताव काही मान्य झालेले नाहीत. त्याच दरम्यान सरकारच्या धोरणांमध्ये झालेला बदल तसेच राज्य सरकारने केंद्र सरकार यांच्या परस्परांमध्ये नसलेला समन्वय यामुळे माझा तो प्रकल्प बारगळाला.
याच दरम्यान शुभांगी ताईंनी आपल्यासारख्याच नवोदय लेखक लेखिकांना एकत्र आणून त्यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून पद्मगंधा प्रतिष्ठानची स्थापना केली. पद्मगंधा प्रतिष्ठानला हळूहळू आकार येऊ लागला होता
माझा दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीचा प्रकल्प बारगळल्यामुळे काही काळ मी अज्ञातवासातच होतो. नंतर मी पूर्ण वेळ मुत्रीत मुद्रीत माध्यमांच्या पत्रकारितेत सक्रिय झालो. कोल्हापूरचे दैनिक पुढारी, नाशिकचे दैनिक गावकरी, मुंबईचे दैनिक नवशक्ती अशा विविध वृत्तपत्रांचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून मी कार्यरत झालो. मग पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटू लागलो.
२००२-०३ या कालखंडात विदर्भ साहित्य संघात बऱ्याच उलथापालती झाल्या. त्यात साहित्य संघातील कथित गैरप्रकारांबाबत आवाज उठवल्याप्रकरणी मी डॉ. वि.स. जोग, कुमार शास्त्री, अनिल शेंडे दिनकरराव देशपांडे, आणि योगेश बऱ्हाणपुरे अशा सहा आजीवन सदस्यांना निष्कासित केले होते. तर इतर बऱ्याच सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यात शुभांगीताई देखील होत्या. त्यानिमित्ताने कधी जोग सरांकडे तर कधी कुमार शास्त्रींकडे आमच्या भेटी सुरू झाल्या. साहित्य संघाच्या या गोंधळावर मी दैनिक तरुण भारतात "गेले ते दिन गेले" या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो वाचून शुभांगी ताईंचा लगेच मला फोन आला. "तुम्ही जुन्या धनवटे रंग मंदिराचा अगदी संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा केला आहे" असे म्हणत त्यांनी माझे कौतुकही केले.
२००२ मध्येच मी रामटेक च्या गडावरून या नावाने एक साप्ताहिक सुरू केले होते. त्याचा दिवाळी अंक पहिल्याच वर्षी पुरस्कार विजेता ठरला होता. तो अंक बघून शुभांगी ताईंचे मला पत्र आले आणि त्यांच्या घरी सपत्नीक चहाला बोलावले होते. त्यांच्या निमंत्रणाला मान देत आम्ही जाऊनही आलो. त्यावेळी अजून दर्जेदार दिवाळी अंक कसा करता येईल याबाबत त्यांनी मला अनेक सूचना केल्या, आणि पुढचा अंक अजून पुरस्कार मिळवेल असा आशीर्वादही दिला होता.
त्या काळात दरवर्षी माझ्यावर आरोप व्हायचा की मी माझ्या दिवाळी अंकात वैदर्भीय लेखकांना स्थान देत नाही. अर्थात हा आरोप करणारे हौसे गवसे नवसे लेखकच होते. त्याच दरम्यान एकदा शुभांगीताई मला भेटल्या. तेव्हा हा विषय निघाला. त्यांनी मला सुचवले की तू एक अंक फक्त दर्जेदार वैदर्भीय साहित्यिक सोबत घेऊनच काढ. त्यानुसार मी प्रयोग केला. सर्व वैदर्भीय साहित्यिकच मी निवडले. मात्र ते सर्व दर्जेदार होते. त्या अंकात मुलाखत घ्यायची ती देखील वैदर्भियांचीच,म्हणून राजदत्तांची आम्ही मुलाखत घेतली होती. त्या दिवाळी अंकाला पाच पुरस्कार मिळाले. इतका तो अंक गाजला होता. मात्र त्यामुळे माझ्यावर वैदर्भियांना स्थान देत नाही अशी टीका करणाऱ्यांना आपसूकच उत्तर मिळाले होते.
काही काळानंतर साप्ताहिक बंद पडले. मात्र बरीच वर्ष दिवाळी अंक मी काढत होतो. दरवर्षीच्या दिवाळी अंकाला शुभांगी ताईंच्या सूचना असायच्याच.
२००८ साली माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. त्यात दाहक वास्तव हा वैचारिक लेखांचा संग्रह, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी आणि मराठी वांङमय व्यवहार चिंतन आणि चिंता हा संपादित ग्रंथ यांचा समावेश होता. पुस्तक प्रकाशित झाल्यावर सुमारे दोन ते तीन महिन्यांनी एक दिवस शुभांगी ताईंचा फोन आला आणि तुझ्या तीनही पुस्तकांच्या दोन दोन प्रती मला पाठव असे त्यांनी कळवले. मी लगेचच पोहोचवण्याची व्यवस्था केली. साधारणपणे वर्षभराने त्यांचा मला अभिनंदनाचा फोन आला. मी कारण विचारले असता पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील उत्कृष्ट वांङमयाला विविध पुरस्कार दिले जात असतात. त्यातील २००९ चा सुद्धा कुसुम स्मृती उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार माझ्या पूर्णांक सुखाचा या कादंबरीला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकरता ही बातमी आनंददायीच होती. त्या पुरस्कार समारोहात शुभांगी ताईंनी माझे बरेच कौतुक केले होते.
दुसऱ्याच दिवशी पद्मगंधा प्रतिष्ठान तर्फे "इंटरनेटच्या युगात मराठी साहित्याचे स्थान" या विषयावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंमादात मला एक वक्ता म्हणून शुभांगी ताईंनी बोलावले होते त्यावेळी मी डॉ. भालचंद्र फडनाईक, शुभांगी रतकंठीवार, स्मृती देशपांडे, रेखा वडीखाये असे मान्यवर वक्ते होते. त्यावेळी शुभांगी ताई भविष्यात तुमच्या कादंबऱ्या देखील इंटरनेटवर जातील आणि तुमचे साहित्य लोक आवडीने वाचतील असा आशावाद मी व्यक्त केला होता. योगायोग असा की २०२१ मध्ये मी पंचनामा या नावाने एक पोर्टल सुरू केले. होते त्यावर शुभांगी ताईंची बकुळीची फुले ही आत्मचरित्रात्मक लेखमालिका मी प्रकाशित करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्या लेखमालिकेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. लोक आवडीने वाचायचे आणि त्या लेखमालिकेला खूप हिट्स मिळाले होते. शुभांगीताईंना हे सांगून मी त्यांना २०१० मध्ये मी भाषणात व्यक्त केलेल्या आशावादाची आठवणही करून दिली होती.
नंतरच्या काळात अधून मधून कार्यक्रमांमध्ये आमच्या भेटी होत होत्या. पद्मगंधाचा प्रवास धडाकून सुरू होता. दरवर्षी त्या वैदर्भीय नाट्यलेखिकांच्या एकेकांची एकांकिकांची स्पर्धा सायंटिफिक सभागृहात घ्यायच्या. त्याला मला त्या आवर्जून निमंत्रण पाठवायच्या, आणि मी देखील जात असे. माझ्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्या काळात एक प्रतिष्ठान स्थापन करून मी दरवर्षी एक किंवा दोन वाङमयीन दिगज्यांची व्याख्याने आयोजित करीत असे. त्यात डॉ. यशवंत पाठक, डॉ. विश्वास मेहंदळे, हे.मो. मराठे, मा.गो. वैद्य अशा दिग्गजांचा समावेश होता. त्या व्याख्यानांना शुभांगीताई आवर्जून यायच्या आणि दरवेळी त्या आयोजनाबद्दल माझे कौतुक देखील करायच्या. माझ्या संदर्भात वर्तमानपत्रांमध्ये काही बातमी छापून आली, की त्यांचा आवर्जून फोन येत असे. मी एका रोटरी क्लबचा अध्यक्ष झालो हे कळल्यावर त्यांनी आत्यानंदाने मला फोन केला होता. रोटरीच्या दोन कार्यक्रमांना त्या आल्या देखील होत्या.
याच काळात शुभांगी ताई चरित्र कादंबरीकार म्हणून गाजत होत्या. साधारणपणे कोणत्याही महापुरुषाचा अभ्यास करून त्याचे चरित्र लिहिणे सोपे असते. मात्र चरित्रात्मक कादंबरी लिहिणे हे कठीणच काम असते. ते शिवधनुष्य शुभांगी ताईंनी केलेले आद्य शंकराचार्य, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, स्वामी विवेकानंद अशा २८ व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर शुभांगीताईंनी कादंबऱ्या लिहिल्या. गोळवलकर गुरुजींच्या जीवनावरील कादंबरी इदम् न नमः हिचे प्रकाशन लाल कृष्णाची गाणी अडवाणी यांचे हस्ते झाले होते. त्यावेळी अडवाणींनी शुभांगी ताईंना राष्ट्रीय चरित्र उपन्यासकार म्हणून गौरवले होते. माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांकरिता हा आनंदाचा क्षण होता. एकूण त्यांनी ८२ पुस्तके लिहिली त्यात २८ चरित्र कादंबऱ्याच होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे हिंदी इंग्रजी तेलगू बंगाली कन्नड अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले होते.
२०१९ च्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायणजी भाला एक दिवस माझ्याकडे आले आणि मला शुभांगी भडभडे यांचा पत्ता विचारू लागले. मी त्यांना सरळ कारमध्ये बसवून शुभांगीताईंच्या घरी घेऊन गेलो. त्यावेळी संघ परिवारातर्फे दिला जाणारा डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कारासाठी शुभांगीताईंची निवड करण्यात आली होती आणि तेच कळवण्यासाठी भालाजी मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते. ती बातमी त्यांच्या इतकीच आम्हाला सुद्धा आनंद देणारीच ठरली होती.
२०२० मध्ये माझा हितगुज हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित झाला. त्या पुस्तकासाठी मी शुभांगीताईंना प्रस्तावना मागितली होती. त्यांनी ताबडतोब "माझ्याकडे स्क्रिप्ट आणून दे, मी प्रस्तावना देते" असे कबूल केले आणि आठवडाभरातच पूर्ण स्क्रिप्ट वाचून त्यांनी प्रस्तावना दिली होती. पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रसेविका समितीच्या शांताक्का यांचे हस्ते झाले. त्यावेळी शुभांगी ताईंना देखील बोलावले होते. मात्र काही अडचणींमुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. तरी त्यांनी पुस्तक मागवून घेतले आणि २०२२ चा पद्मागंधाचा उत्कृष्ट ललित वांङमय पुरस्कार देखील त्या पुस्तकाला दिला होता.
याच दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी नागपुरात मुक्कामी होते. त्या दरम्यान शुभांगी ताईंचा मला फोन आला आणि राज्यपालांना मला भेटायचे आहे तर तुम्हाला काही जमवता येईल का अशी विचारणा केली. योगायोगाने दोन महिने आधीच राज्यपालांनी माझ्या दोन पुस्तकांचे ऑनलाईन प्रकाशन केले होते. त्यामुळे ती पुस्तके त्यांना देण्यासाठी मला त्यांना भेटायचे होतेच. मग मी राज्यपालांच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची वेळ घेतली. मी, माझी पत्नी अनुरूपा, शुभांगीताई डॉ. तनुजा नाफडे आणि अभिनंदन पळसापुरे असे पाच जण आम्ही राज्यपालांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी राज्यपालांनी देखील शुभांगीताईंच्या साहित्य सेवेबद्दल विशेषतः हेडगेवार यांच्या चरित्र कादंबरी बद्दल आवर्जून उल्लेख केला होता. या कादंबरीची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.
२०२२ च्या ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीसाठी संघाचे पश्चिम क्षेत्रीय प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट आले होते. त्यांची माझी भेट झाल्यावर त्यांनी मला शुभांगीताई भडभडे यांची भेट मिळू शकेल का अशी विचारणा केली. लगेचच मी शुभांगी ताईंना फोन लावला तर दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता त्यांच्या घरी जायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे मी आणि प्रमोदजी शुभांगी ताईकडे गेलो होतो. तिथे दोन तास आमच्या गप्पा झाल्या. प्रमोदजी देखील चांगलेच सुखावले होते.
२५ मार्च २०२५ रोजी शुभांगी ताईंची नरेंद्र मोदींच्या जीवनावरील चरित्र कादंबरी प्रकाशित झाली. लगेचच ३० मार्चला मोदीजी नागपुरात येणार होते. त्यावेळी शुभांगी ताईंनी त्यांना भेट मागितली आणि त्या मोदीजींना जाऊन भेटून त्यांना तो चरित्रग्रंथ भेट दिला होता.
शुभांगी ताईंच्या डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील कादंबऱ्यांचे नाट्यरूपांतर देखील त्यांनी केले होते. या तिन्ही नाटकांचे प्रयोग फक्त भारतातच नव्हे तर परदेशात देखील झाले होते.
शुभांगीताईंच्या या साहित्य साधनेचा गौरव त्यांना केंद्र शासनाचा पद्म पुरस्कार देऊन केला जावा अशी लक्ष्मीनारायण भाला यांच्यासह त्यांच्या अनेक चाहत्यांची इच्छा होती. भालाजींच्याच सूचनेवरून मी शुभांगी ताईंना सांगून त्या दृष्टीने प्रस्ताव देखील पाठवले होते. मात्र त्यांना तो पुरस्कार मिळवू शकला नाही.
राज्य आणि केंद्र शासनात काही वैधानिक पदे साहित्यिक आणि पत्रकारांसाठी राखीव असतात. मात्र त्या पदावर अनेकदा राजकीय व्यक्तीच नेमल्या जातात. मी त्याविरुद्ध आवाज उठवून बरेच लेखन केले होते. त्यासाठी उच्च न्यायालयात एक याचीकाही दाखल केली होती. माझे लेख वाचून शुभांगी ताईंचा एक दिवस मला फोन आला. तुम्ही यासाठी प्रयत्न का करत नाही असा प्रश्न करत तुम्ही प्रयत्न करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मला अर्ज करायला लावून त्यांनी पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे शिफारस पत्र देखील मला दिले होते. इतरही संघटनांना सांगून त्यांनी शिफारस पत्रे द्यायला लावली होती. अर्थात अद्याप तरी त्या पदांवरील नियुकत्या झालेल्या नाहीत.
२०२२ ते २०२५ मी अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेचा विदर्भाचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. एप्रिल २०२५ मध्ये साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री मनोज कुमार हे नागपुरात आले होते. त्यांच्या मुक्कामात काही प्रमुख साहित्यिकांकडे त्यांना भेटीला घेऊन जायचे असे नियोजन आम्ही केले होते. त्यानुसार मनोजकुमारजी, मी, नितीन केळकर असे तिघेही शुभांगीताईकडे गेलो होतो. त्यांच्याकडे जवळजवळ दीड तास आमची चर्चा झाली. त्यावेळी मनोजजींनी सहज विचारले "तुमची आतापर्यंत पुस्तके किती प्रकाशित झाली" तेव्हा त्यांनी ८२ पुस्तके प्रकाशित झाली असे उत्तर दिले. त्याचवेळी बोलण्या बोलण्यात त्यांचे नेमके वय विचारले. तेव्हा तेही ८२ वर्षे असेच उत्तर मिळाले. त्यावेळी अजून खूप लिहायचं असा संकल्प त्यांनी सांगितला होता. माझ्याकडे पंचनामांमध्ये प्रकाशित झालेल्या बकुळीची फुले या लेखांचा संग्रह देखील प्रकाशित झाला होता. तो त्यांनी मला दिला आणि यावर तुम्ही कुठेतरी लिहा असे सुचवले देखील होते. मी होकार तर दिला मात्र अजूनही ते झाले नाही. ती शुभांगीताईंची आणि माझी शेवटचीच भेट ठरली. त्यानंतर आमच्या भेटीचा योग काही आला नाही. मात्र फोनवर अधून मधून आमचा संवाद नियमित होत असे. शेवटले बोलणे २५ जुलै रोजी झाले होते.
आणि काल शुभांगीताई गेल्याची बातमी कळली. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी मला 'तुम्ही आता माझ्यावर लिहा आणि मी जिवंत असेपर्यंतच लिहा" असा आग्रह धरला होता मी ते मान्यही केले होते. मात्र त्या इतक्या तडकाफडकी आपली जीवनयात्रा संपवतील असे वाटले नव्हते. त्यांना भविष्य कळत होते किंवा नाही याची कल्पना नाही. मात्र कुठेतरी आता आपले इथले कार्य आवरते घ्यायचे आहे असे संकेत त्यांना मिळाले असावे की काय, असे मनात येते. त्यामुळेच तर त्या मला तसे म्हणाल्या नव्हत्या. मात्र त्यांची ती इच्छा मी त्यांच्या जिवंतपणे पूर्ण करू शकलो नाही याचे मला दुःख आहे. तसेच त्यांना पद्म पुरस्कार मिळवू शकला नाही हे देखील दुःखच आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करावे असे सुचवावेसे वाटते.
शुभांगी ताई समाधान संबंध जवळ जवळ ४५ वर्षांचा, तेव्हापासून आमचे स्नेहबंध जुळले. त्या सर्वार्थाने माझ्यापेक्षा मोठ्या साहित्यिक होत्या. मात्र त्यांच्या साध्या सरळ स्वभावामुळे त्या कायम आपल्यातल्याच एक वाटत आल्या. हेच त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळेच त्यांनी माझ्यासारखे असंख्य स्नेही जोडले होते.
आयुष्यातले सांगाती १८*,
*शुभांगीताई भडभडे*,
*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !