शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
मुंबई :-
महाराष्ट्र सरकारने मृद व जलसंधारण विभागातील पदभरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला असून, या विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री संजय राठोड यांनी विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले.
मंत्री राठोड यांनी नमूद केले की, विभागाचा जुना आकृतीबंध बदलण्यात आलेला नाही. सुरुवातीच्या टप्प्यात विभागासाठी एकूण १६,४७९ पदांना मान्यता देण्यात आली होती. मात्र कालांतराने या पदांच्या स्वरूपात आणि संख्येत बदल होत गेले. मे २०२५ मध्ये वित्त विभागाने ८,७६७ पदांच्या नव्या आकृतीबंधास मान्यता दिली असून, त्यानुसार विभागाच्या क्षेत्रीय पातळीवर अधिक अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
या नव्या बदलांमुळे ० ते ६०० हेक्टर क्षेत्रातील जलसंधारण कामे अधिक प्रभावीपणे पार पडतील, असे राठोड यांनी सांगितले. तसेच जिल्हास्तरीय व उपविभागीय कार्यालयांची संख्या २९२ वरून ३५१ पर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामध्ये १७५ कार्यालये जिल्हा परिषद पातळीवर आणि १७६ कार्यालये राज्यस्तरावर स्थापन केली जाणार आहेत.
मंत्री राठोड यांनी असेही स्पष्ट केले की, विद्यमान पदांचे अपग्रेडेशन किंवा रूपांतरण करणे आणि काही नव्या पदांची निर्मिती करणे ही अधिक व्यवहार्य वाटणारी उपाययोजना ठरेल. विभागाच्या सचिवांनी या प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयानुसार, लवकरच पदभरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध होणार असून, भरती प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, जलसंधारणाच्या कामातही गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
००००