शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे आयोजन.
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील शल्यचिकित्सा विभाग आणि जळगाव सर्जिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रियाविषयक थेट प्रात्यक्षिक कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचा आरंभ महाविद्यालयाच्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये झाला. प्रगत लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक नाशिकचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. संदीप सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे, सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील यांचे सहकार्य लाभले. जळगाव सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील आणि सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांचे विशेष योगदान लाभले. ही कार्यशाळा जीएमसीच्या वैद्यकीय शिक्षण व शस्त्रक्रिया क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. कार्यशाळेचा १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.