कोरडगाव | प्रतिनिधी
कोरडगाव ग्रामपंचायत हे एक मोठं व विस्तारलेलं गाव असून येथील ग्रामविकासाची कामे, नागरी समस्या, सेवा सुविधा आणि ग्रामपंचायतीची व्यवस्थापन जबाबदारी मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक अनुभवी, सहकार्यशील आणि ग्रामस्थांशी संवाद ठेवणारा अधिकारी नेमणूक होणे आवश्यक आहे.
सध्या कोरडगाव ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामसेवक दातीर भाऊसाहेब यांच्यामुळे काही प्रशासकीय अडचणी निर्माण होत असून ग्रामपंचायत कामकाज सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. गावातील सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी मॅडम यांच्याकडे लेखी अर्ज करून दातीर भाऊसाहेब यांची इतरत्र बदली करून त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक दातीर भाऊसाहेब यांना वैयक्तिक अडचणी असून त्यामुळे ते गावाच्या गरजेनुसार काम करू शकत नाहीत. त्यामुळे कोरडगावच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसत आहे. गावाचे भवितव्य, नागरिकांची सेवा व शासनाच्या योजनांची अंमलबजावणी या सर्व गोष्टी लक्षात घेता, लवकरात लवकर नवीन अधिकारी देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावाच्या हितासाठी प्रशासनाने त्वरीत निर्णय घेऊन कोरडगाव ग्रामपंचायतीला सक्षम अधिकारी द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.