केज येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व अमृत महोत्सव संपन्न
==============
प्रकाश मुंडे/ बीड जिल्हाप्रतिनिधी:- समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा इंजिनिअरिंग , डॉक्टर , व सी ए याकडे आहे हि चांगली बाब आहे पण आता यापलीकडे जाऊन आता स्पर्धा परिक्षेंच्या माध्यमातून मोठ्या पदांवर कार्य करण्याची महत्वाकांक्षा देखील बाळगावी लागेल ती काळाची गरज आहे असे स्पष्ट मत महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी व्यक्त केले .
ते बीड जिल्हा महासभेच्या वतीने केज येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या अमृत महोत्सव सोहळ्या प्रसंगी बोलत होते .
केज येथील श्रीराम मंगल कार्यालयात रविवार दि 27 रोजी आयोजित या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून नंदकुमार गादेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद बिडवई , प्रदीप मनाठकर , सदानंद मेडेवार हे होते , तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सतिष साळुंके व अमृत चे मराठवाडा व्यवस्थापक सुशांत देशपांडे , यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गादेवार म्हणाले कि ; पारंपरिक उद्योगांना थोडेसे बाजूला करत मागील काही वर्षात आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर , सी. ए , इंजिनिअर , आय टी क्षेत्रात आपले करिअर निवडले आता यासोबतच आणखीन नवीन दिशांची निवड देखील करावी लागणार आहे यात आता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष केंद्रित करत शासनाच्या मोठ्या पदांवर देखील विराजमान होणे गरज असल्याचे सांगितले तसेच समाजातील पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या व्यक्तींचा अमृत महोत्सव सार्वजनिक मंचावर साजरा होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून त्यांचा सत्कार करता येण्याचे भाग्य आपणास मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले आपल्या आई वडिलांचा उतारवयात सांभाळ करणे हि आपली सनातन संस्कृती आहे त्यामुळे त्यांना कोणीही एकटे अथवा वृद्धाश्रमात सोडू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली समस्थ समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र तिरुपती येथे पंचेवीस कोटी रुपये खर्च किमतीच्या होऊ घातलेल्या निवासी संकुलाची ईमारत देखील दीड वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही देत यासाठी समाजबांधवांनी योगदान द्यावे असे आवाहनही याप्रसंगी केले
समाजात सहिष्णुतेची , ममतेची व माणुसकीची पेरणी आपल्या प्रत्येकाच्या घरात असलेली जेष्ठ मंडळी करत असतात भावी पिढीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असतो ते चालते बोलते संस्कार पीठ असतात त्यामुळे जेष्ठांना जपा कारण आता पूर्वीप्रमाणे शाळांमधून संस्कार हा विषय ईतिहासजमा झाला आहे असे डॉ सतिष साळुंके यांनी सांगत सार्वजनिक मंचावरून जेष्ठांचा अमृत महोत्सव घेण्याच्या संकल्पनेचे तोंडभरून कौतुकही केले
शासनाच्या वतीने वर्षभरापूर्वी चालु करण्यात आलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून उद्योगापासून ते विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती अमृतचे मराठवाडा व्यवस्थापक सागर देशपांडे यांनी यावेळी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सूर्यकांत महाजन यांनी करत जिल्हा महासभेच्या एकूणच कार्याचा व या कार्यक्रम घेण्यामागची भूमिका यावेळी विषद केली
===============
दिव्यांग वैभवचा केला विशेष सत्कार
अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार या धारूर येथील युवकाने आपल्या अपंगत्वावर मात करत एमपीएससी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्याचा विशेष असा सत्कार यावेळी करण्यात आला
===============
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला . कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून तीनशे ते चारशे समाजबांधवांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद बिडवई यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हासचिव अजय रुद्रवार यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्त चेअरमन सुहास चिद्रवार , वैभव झरकर , बालाजी बासटवार , गणेश डुबे , प्रकाश कामाजी , अमित कामाजी यांच्यासह केज येथील समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.