एरंडोल शहरवासीयांचा महावितरणकडे लेखी अर्ज.
एरंडोल (ता.एरंडोल) – एरंडोल शहरातील नागरिकांनी वाढीव वीज बिलांविषयी महावितरण विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत लेखी तक्रार सादर केली आहे. दिनांक 21 जुलै 2025 रोजी कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, एरंडोल यांच्याकडे दिलेल्या अर्जामध्ये, मागील काही महिन्यांपासून वीज बिलामध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे.
हे ही वाचा...
नागरिकांनी म्हटले आहे की, वीज वापरात कोणतीही लक्षणीय वाढ नसताना बिलांमध्ये होणारी वाढ अन्यायकारक आहे. अनेक स्थानिकांनी यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले असून, महिन्याच्या शेवटी अचानक आलेल्या जास्तीच्या बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या निवेदनामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
1. वाढीव आलेल्या वीज बिलांची तपासणी करून ती रक्कम वाजवी दराने कमी करावी.
2. संबंधित मीटरची फेरतपासणी करावी.
3. ग्राहकांसाठी सुलभ बिल दुरुस्ती प्रक्रिया सुरू करावी.
4. लेखी निवेदनाचा तात्काळ निर्णय घेऊन उत्तर द्यावे.
या निवेदनावर अनेक नागरिकांनी सह्या करून एकत्रितपणे आवाज उठवला असून, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
वरील दिलेली माहिती नियोदनात म्हटल्याप्रमाणे.