वावडी, पतंग आणि हरवलेले बालपण
नागपंचमीचा सण आला की, मन पुन्हा त्या दिवसात हरवतं…
ज्या काळात ‘सण’ म्हणजे बाजारातून आणलेली सजावट नव्हती,
तर तो असायचा मनातून साजरा होणारा एक उत्सव,
ज्याच्या तयारीत प्रेम, कष्ट आणि कल्पकता मिसळलेली असायची.
बालपणी नागपंचमी काही दिवसांपासूनच सुरू व्हायची.
घरातले लहानथोर एकत्र बसून वावडी बनवत असायचे.
आज जसा रेडिमेड खेळण्यांचा सुळसुळाट आहे, तसा काहीच नव्हता.
वावडी म्हणजे स्वतः तयार केलेलं स्वप्न होतं.
वावडीसाठी आधी वेळूच्या झाडावर चढून बारीक कांब्या तोडायच्या.
त्या लवचिक, पण मजबूत असायच्या.
त्या दोन कांब्यांचा चौकट सांगाडा तयार करायचा.
हातात गाठी असलेल्या दोऱ्यांनी जोडायचा.
सांगाडा पूर्ण झाला की, त्याला शेवटी लागायची एक खास “शेपटी” –
कोणतीही झगमगती रिबीन नव्हे,
तर आईच्या जुना झालेल्या साडीचा एखादा रंगीत काठ.
कधी वावडी नीट फिरत नसेल, गोते खात असेल तर त्याच्या शेपटीला आम्ही एक ‘काँग्रेस’ लावायचो —
कापडाचा किंवा कागदाचा छोटा फडका, जो वावडीला बॅलन्स द्यायचा.
ते झालं की वावडी हवेत फिरायला लागायची...
आणि तिच्या फिरण्याचा आवाज –
“भूं… भूं… भूं…”
घरभर, गल्लीभर आणि अंत:करणात घुमायला लागायचा.
तो आवाज फक्त कर्णसुख नव्हता, तो आठवणींचा संगीत होता.
ते दिवस असे होते की, आम्हाला आकाशाला गवसणी घालायचं वेड होतं – पतंग उडवून!
पतंग कुठून आणायची नाही, तीही स्वतः बनवायची.
वहीच्या जुना कागद, कधी एखादा रंगीत कागद मिळाला तर तो,
काटा, गोंद, चंग... सगळं काही हळुवार प्रेमानं जोडलेलं.
आणि जेव्हा ती पतंग हवेत उडायला लागायची,
तेव्हा वाटायचं की आपलं स्वप्न आभाळात झुलतंय.
डेरा धरल्यावर आम्ही एका लहानशा कागदाला चिर करून
तो दोऱ्यावरून सरकवत पतंगाकडे पाठवायचो –
तो होता आमचा “कागद पत्र”.
पतंगपर्यंत पोहोचताना वाटायचं –
आपला संदेश खरोखर तिच्यापर्यंत पोहोचतोय.
कधी कधी वारा जोरात सुटायचा, किंवा कोणीतरी आपली पतंग कापायचा –
तेव्हा ती आभाळातून तुटून खाली यायची...
पण पतंग तुटली की खेळ संपायचा नाही –
तेव्हा खरी शर्यत सुरू व्हायची!
कोणत्या अंगणात पडली, झाडावर अडकली की नाही, छपरावर तर नाही ना —
हे शोधण्यासाठी सगळी पोरं धावायची.
एकाने सांगायचं, दुसऱ्याने झेप घ्यायची, तिसऱ्याने धरायचं.
ती पतंग परत मिळवणं म्हणजे विजय होता, आनंद होता, आणि आठवणीत कायमचं कोरलं जाणारं क्षण होतं.
मुली झाडाच्या आडव्या फांदीला दोऱ्या बांधून त्या झोका खेळायच्या
ओव्या म्हणत म्हणत, गाणी गात गात…
“झुला रे झुला, झुलव रे नारायण…”
त्या सूरांमध्ये श्रद्धा होती, लाजरी गोडी होती, आणि संस्कारांचे बंध होते.
आई, मावश्या, आजी अंगणात रांगोळ्या काढायच्या,
नागाचं चित्र घालायचं, त्याला लाह्या, दूध अर्पण करायचं.
त्या दिवशी सण म्हणजे बाजारातली गोष्ट नव्हती –
ती होती – आपुलकी, एकत्र येणं, आणि निसर्गाशी, देवाशी संवाद साधणं.
आजचं चित्र वेगळं आहे.
आज वावडी कुठे असते? कोण विचारतो वेळूला?
साडीचा काठ फाडणं म्हणजेच घरात वाद.
मोबाईलमध्ये रेडीमेड गेम्स, ऑनलाईन पतंग, आणि वर्चुअल झोके.
पतंग उडताना नाही, तर फोटो काढताना ‘कॅप्शन’ उडतं.
‘कागद पत्र’ कुणाला माहीतच नाही –
आज मेसेज एका क्लिकवर जातो, पण भावनेचा स्पर्श कुठेच नाही…
आज नागपंचमी आली की आठवतं…
कळकाच्या झाडाखालचं ते दुपारचं उन,हातात वावडी घेऊन फिरणाऱ्या माझ्या बोटांची घामट झालेली ओल,
आणि तुटलेल्या पतंगामागे धावताना धपापणाऱ्या पावलांचा आवाज…
हे सगळं हरवतंय... आणि म्हणूनच पुन्हा आठवतोय.
या नागपंचमीला एकदा तरी...
मुलांना घेऊन वेळूच्या झाडाजवळ जाऊया,
एक सांगाडा करूया,
साडीचा जुना काठ शोधूया,
आणि एक वावडी फिरवूया –
बालपणाच्या, आठवणींच्या, आणि सणाच्या खऱ्या अर्थाने.
कारण जे विसरतो, ते काल झालं;
जे जपतो, तेच आपलं खऱ्या अर्थाने सण होऊन उरतं…
भारत ननवरे सर शेळगाव,ता.इंदापूर, जि.पुणे