संगमनेर प्रतिनिधी :-
संगमनेर तालुक्यातील एका गावात वैद्यकीय सेवेसारख्या पवित्र व्यवसायाला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. फॅमिली डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने ३४ वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दारूच्या नशेत गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🔥 टॉन्सिल तपासण्याच्या नावाखाली अश्लील चाळे!
पीडित महिला टॉन्सिलच्या त्रासामुळे तपासणीसाठी डॉक्टरकडे गेली होती. तिच्यासोबत मुलगाही होता, मात्र तो क्लिनिकच्या बाहेर थांबला. तपासणीदरम्यान डॉक्टरच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत असल्याचे महिलेला जाणवले. काही वेळातच डॉक्टरने टॉन्सिल तपासण्याच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू केले.
महिलेने त्वरित संशय घेत स्वतःला सावरले व धावत बाहेर आली. बाहेर उभ्या असलेल्या मुलाने डॉक्टरला प्रश्न विचारले, मात्र तो अनुत्तरित राहिला व परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला.
💥 संतप्त कुटुंबियांचा क्लिनिकवर हल्ला!
घरी परतल्यानंतर महिलेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. तत्काळ कुटुंबिय व नातेवाईकांनी डॉक्टरच्या क्लिनिकवर धाव घेत तीव्र निषेध नोंदवला व क्लिनिकमधील साहित्यांची नासधूस केली. परिसरात एकच खळबळ उडाली.
🚔 गुन्हा नोंदवला; पुढील चौकशी सुरू
घटनेनंतर पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.