🔹 एरंडोलसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची अधिकृत मंजुरी
🔹 आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
🔹 शेतकरी वर्गात आणि स्थानिक प्रशासनात समाधान.
🔹 सहायक निबंधक ठाकूर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती.
🔹 रोजगार संधींना चालना, तालुक्याच्या विकासाला गती.
एरंडोल (ता. ३) :
एरंडोल तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी – अखेर एरंडोलसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. ही माहिती आमदार अमोल पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गौतम बलसाणे यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
धरणगाव बाजार समितीपासून विभाजन करत एरंडोलसाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात आली आहे. सहायक निबंधक विशाल ठाकूर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार अमोल पाटील यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांना पत्राद्वारे ही मागणी केली होती. २०२४च्या निवडणुकीत त्यांनी ही बाब प्राधान्याने मांडली होती. यानंतर सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर मंजुरी मिळाली.
धरणगावच्या कार्यक्षेत्रात समावेश असलेला एरंडोल तालुका स्वतंत्र बाजार समितीअभावी अनेक अडचणींना सामोरा जात होता. अनेक वर्षांपासून शेतकरी वर्ग ही मागणी करत होता. आता ही मागणी पूर्ण झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री बाजार समिती योजना' अंतर्गत राज्यातील ६५ तालुक्यांना स्वतंत्र बाजार समित्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अंतर्गत एरंडोललाही ही मान्यता देण्यात आली आहे.
स्वतंत्र बाजार समितीमुळे शेतकऱ्यांना आता थेट सुविधा मिळणार असून, तालुक्यात रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. या निर्णयामुळे एरंडोलच्या कृषी, अर्थव्यवस्था व विकास प्रक्रियेला बळकटी मिळणार आहे.