shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय गोलंदाजांच्या करामतीमुळे सामना समतोल



                भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. भारताने दुसऱ्या डावात दोन बाद ७५ धावा केल्या आहेत आणि इंग्लंडविरुद्ध ५२ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी, यजमान संघाचा पहिला डाव २४७ धावांवर संपला तर भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. या आधारावर इंग्लंडला २३ धावांची आघाडी मिळाली. शुक्रवारच्या खेळाच्या अखेरीस, यशस्वी जयस्वाल ४९ चेंडूत ५१ तर रात्रीचा रखवालदार आकाश दीप दोन चेंडूत चार धावांसह नाबाद होते. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने दुसऱ्या डावात भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी झाली, ती जोश टंगने राहुलला रूट करवी झेलबाद करून तोडली. त्याने २८ चेंडूत सात धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेला साई सुदर्शन ११ धावा काढून बाद झाला.  गस अ‍ॅटकिन्सनने त्याला पायचित केले. यादरम्यान दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वालने ४४ चेंडूत आपले १३ वे अर्धशतक पूर्ण केले. चालू मालिकेतील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. 

               केएल राहुल जरी दुसऱ्या डावात फक्त सात धावा काढून बाद झाला असला तरी, त्याने मोठी कामगिरी केली. तो सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. केएल राहुलने विद्यमान मालिकेत ५३२ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, सुनिल गावस्कर या बाबतीत अव्वल स्थानावर आहेत. या माजी फलंदाजाने सन १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत ५४२ धावा केल्या होत्या. मुरली विजय तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने सन २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ४८२ धावा केल्या होत्या. केएलने पहिल्या डावात १४ धावा केल्या, या मालिकेत जबाबदारीने खेळणाऱ्या राहुलला मात्र चालू कसोटी चांगली गेली नाही. दोन डावात मिळून त्याला केवळ २१ धावाच काढता आल्या.


               इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपला आणि यजमान संघाला भारतावर २३ धावांची आघाडी मिळाली. त्याआधी, भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार बळी घेतले, तर आकाश दीपला एक यश मिळाले. ख्रिस वोक्स खांद्याला झाल्यामुळे फलंदाजीला येऊ शकला नाही.

              सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी संघाला चांगली सुरुवात दिली, दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी झाली ती आकाश दीपने डकेटला आपला बळी बनवून तोडली.  ३८ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४३ धावा करणाऱ्या डकेटने क्रॉलीसह तडाखेबाज सुरुवात करून भारतीयांच्या तोंडचे पाणी पळविले होते. मात्र कृष्णा, सिराजने मॅजिक स्पेल टाकून भारताला सामन्यात परत आणले.  तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हंगामी कर्णधार ऑली पोपने काही चांगले फटके खेळले आणि ३७ धावा जोडल्या. क्रॉली ५७ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

               दुसऱ्या सत्रात, गोलंदाजांच्या बळावर भारताने उत्तम पुनरागमन केले. या सत्रात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. क्रॉलीनंतर, ऑली पोप (२२), जो रूट (२९), जेकब बेथेल (६), जेमी स्मिथ (८), जेमी ओव्हरटन (०) यांनी आपापले बळी गमावले. तिसऱ्या सत्रात इंग्लंडने भारतावर आघाडी मिळवली, पण विशेष काही करू शकले नाही. गस अ‍ॅटकिन्सन ११ आणि हॅरी ब्रूक ५३ धावांवर बाद झाले. त्याच वेळी, जोश टोंग खाते न उघडता नाबाद राहिला. ख्रिस वोक्स दुखापतीमुळे आधीच बाद झाला होता. यामुळेच इंग्लंड नऊ फलंदाजांसह मैदानात उतरले आहे.

               दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २२४ धावांवर घसरला. भारताने शुक्रवारी आपला डाव  सहा बाद २०४ वरून सुरू केला. त्यावेळी करुण नायर ९८ चेंडूत ५२ धावा आणि वॉशिंग्टन सुंदर ४५ चेंडूत १९ धावा घेऊन खेळत होते. जोश टँगने प्रथम करुण नायरला पायचित केले. नायर १०९ चेंडूत आठ चौकारांसह ५७ धावा काढून परतला.  यानंतर गस अ‍ॅटकिन्सनने वॉशिंग्टन सुंदरला आपला बळी बनविले. ५५ चेंडूत २६ धावा काढून तोही लवकर बाद झाला. सातव्या विकेटसाठी दोघांमध्ये ६५ धावांची भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा खाते न उघडताच बाद झाले. तर आकाश दीप शुन्यावर नाबाद राहिला. त्याआधी यशस्वी जयस्वालने दोन, केएल राहुलने १४, साई सुदर्शनने ३८, शुभमन गिलने २१, रवींद्र जडेजा नऊ आणि ध्रुव जुरेलने १९ धावा केल्या. इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सनने पाच तर जोश टँगने तीन विकेट घेतल्या. याशिवाय ख्रिस वोक्सने एक यश मिळवले.

               जो रूटने भारताविरुद्ध पहिल्या डावात मोठी कामगिरी केली. तो कोणत्याही देशात भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनला. रूट इंग्लंडमध्ये भारताबरोबर २००६ कसोटी धावा करणारा फलंदाज बनला. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियात १८९३ धावा करणाऱ्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकले. शिवनारायण चंद्रपॉल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने वेस्ट इंडिजमध्ये १५४७ धावा केल्या. झहीर अब्बास (१४२७-पाकिस्तान) आणि स्टीव्ह स्मिथ (१३९६-ऑस्ट्रेलिया) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

                 जो रूटने आता इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत. घरच्या मैदानावर कसोटीत एकाच विरोधी संघाविरुद्ध यापेक्षा जास्त धावा फक्त डॉन ब्रॅडमन यांनी केल्या आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडविरुद्ध २३५४ धावा केल्या आहेत. घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारा रूट दुसरा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. रूटच्या नावावर आता ७२२० धावा आहेत. या बाबतीत रिकी पॉन्टिंग अव्वल स्थानावर आहे ज्याने ऑस्ट्रेलियात ७५७८ कसोटी धावा केल्या आहेत. भारतात कसोटी क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे ज्याने ७२१६ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात २९ धावांवर रूट बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले.

               भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खांद्याच्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला होता, त्यामुळे अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सची दुखापत बरी दिसत नाही. गुरुवारी, सामन्याच्या पहिल्या दिवशी, करुण नायरच्या फटक्यावर चौकार वाचविण्याच्या प्रयत्नात वोक्स जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे की वोक्स या सामन्याचा भाग असणार नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने फलंदाजीही केली नाही. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडला आता गोलंदाजीत मोठी उणीव जाणवू शकते. त्याचा लाभ भारतीय फलंदाजांनी घेतला तर मोठी धावसंख्या उभी करून इंग्लंडला कोपऱ्यात खेचण्याची सोनरी संधी भारताला उपलब्ध होईल.

             यशस्वी, गिल, करुण, वॉशिंग्टन, जडेजा यांनी अजून किमान २५० धावा फलकावर चढविल्या तर गोलंदाजांचे नंदनवन असलेल्या ओव्हलवर भारताला बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत सामना खिशात घालून मालिका बरोबरीत सोडविण्याची सुवर्णसंधी असेल व ती साधण्यात संघ कोणतीही कुचराई करेल असे या क्षणाला तरी वाटत नाही.

@ डॉ.दत्ता विघावे                     
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close