सहलीचे आयोजन-झोके, फुगड्या, खो-खो पारंपारिक खेळाचा महिलांनी घेतला आनंद.
एरंडोल - येथील सर्वधर्म महिला मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त श्रावण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महिला मंडळ अध्यक्षा मीना मानुधने यांच्या संकल्पनेतून सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पारोळा तालूक्यातील मुकटी येथील श्री केदारेश्वर महादेव मंदिर आणि झपट भवानी मंदिर तसेच अमळनेर तालूक्यातील कपीलेश्वर महादेव मंदिर याठिकाणी सहल नेण्यात आली होती. सहलीदरम्यान उपस्थित सर्व महिलांनी वनभोजनाचा आनंद घेवून निसर्गरम्य वातावरणात बालकवींच्या श्रावणमासी हर्ष उल्हासी, हिरवळ दाटे चोहिकडे या ओळींची अनुभूती आली. यावेळी महिलांनी झोके, फुगड्या, बोटींग, खो-खो सारख्या पारंपारिक खेळाचा आनंद घेतला. सर्वांच्या चेहर्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
केदारेश्वर महादेव मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ 6 महिन्यात सदर मंदिर उभारण्यात आले आहे. तर कपीलेश्वर येथील महादेव मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या संकल्पेतून साकारण्यात आले असून हे हेमाडपंथी मंदिर तापी, गिरणा आणि बोरी नदीच्या त्रिवेणी संगमावर उभारण्यात आले आहे. सदर मंदिरास ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असून श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी नागरीक दर्शनासाठी येत असल्याने येथे यात्रेचे स्वरूप दिसून येते.
यावेळी सर्वधर्म समभाव महिला मंडळ अध्यक्षा मीना मानुधने, उपाध्यक्षा आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, वंदना पाटील, मनिषा पाटील, लता चौधरी, निलिमा मानुधने, वैशाली पाटील, दिपाली काबरा, सुरेखा पाटील, शकुंतला पाटील, जयश्री पाटील, लता पाटील, हिराताई पाटील सहलीत सहभागी झाल्या होत्या.