विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग; हिरवाईने बहरणार महाविद्यालयाचा परिसर... शिर्डी एक्सप्रेस न्यूज नेटवर्क एरंडोल.
“एक वृक्ष – दहा पुत्र समान” या संदेशाला उजाळा देत एरंडोल येथील डि.डी.एस.पी. महाविद्यालय पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात अग्रेसर ठरले आहे. महाविद्यालय परिसर हिरवाईने बहरावा, निसर्गरम्य वातावरणात शिक्षण व अध्ययन व्हावे, यासाठी शनिवारी परिसरात तब्बल २५० रोपांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमाचा शुभारंभ संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राध्यापक, अधिकारी, मान्यवर, एन.एस.एस. स्वयंसेवक व एन.सी.सी. कॅडेट्स यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
रोपांच्या संगोपनाची जबाबदारी एन.एस.एस. व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी स्विकारली असून ठिबक सिंचन पद्धतीने त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभागा तर्फे उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. सचिन नांद्रे, रोपवन अधिकारी मानसिंग राजपूत आदी मान्यवरांसह प्राध्यापक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.