सातारा / प्रतिनिधी:
भारतीय समाजव्यवस्थेत भटका विमुक्त समाज वंचित व उपेक्षित जीवन जगत आलेला आहे.अज्ञान, दारिद्र्य,अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व गुन्हेगारीचा शिक्का सामाजिक व्यवस्थेने कपाळी मारल्यामुळे भटक्या विमुक्त समाजाची प्रगती खुंटली होती. अशा उपेक्षित समाजाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. आबासाहेब उमाप यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी साहित्यिक डॉ.आबासाहेब उमाप मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष इंजि. रमेश इंजे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ.आबासाहेब उमाप पुढे म्हणाले की, "आजही भटका विमुक्त समाज हा उपेक्षेचे संघर्षशील जीवन जगत आहे. फाटक्या पालात राहणाऱ्या रानोमाळ दऱ्या - खोऱ्यात भटकणाऱ्या व झोपडपट्ट्यांच्या दलदलीत फसलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस असे कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्येही भटका विमुक्त समाज हा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व प्रकारच्या भौतिक प्रगतीपासून वंचित आहे. मूलभूत मानवी अधिकार व मूलभूत मानवी गरजा या समाजाला प्राप्त करून देण्यासाठी ज्यांना स्वातंत्र्याची फळे मिळाली आहेत. अशा सक्षम समाज घटकांनी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढे आले पाहिजे." असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
" महामानवांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार प्रत्येक व्यक्तीने प्रत्यक्ष कृतीमध्ये आणल्याशिवाय सामाजिक परिवर्तन गतिमान होणार नाही." अशी माहिती रमेश इंजे यांनी दिली.
शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी वास्तव परिस्थितीवर पहाडी आवाजात पोवाडा सादर करून वातावरण निर्मिती केली.
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.
सदरच्या कार्यक्रमास थेरो दिंपकर,धम्मबांधव उत्सव समितीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर व परिवार, साहित्यिक सुदर्शन इंगळे, काष्ट्राईबचे अध्यक्ष मारुती भोसले,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामन मस्के, मुरलीधर खरात, नवनाथ लोंढे, अंकुश धाइंजे, विलास कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे मंगेश डावरे, माजी प्राचार्य रमेश जाधव, पतसंस्थेचे चेअरमन अशोक भोसले,अमर गायकवाड, मधुकर आठवले, जिवने संपूर्ण परिवार, दयानंद बनसोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111