शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा विरोधकांच्या तीव्र आक्षेप, आरोप-प्रत्यारोप व गोंधळामुळे वादळी ठरणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सत्ताधारी संचालक मंडळावर गंभीर आरोपांचे मेसेज व्हायरल होत होते. विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील आणि जेरीस आणतील, असे भाकीत केले जात होते. मात्र प्रत्यक्षात चेअरमन विठ्ठल पवार यांच्या अभ्यासू व आक्रमक नेतृत्वापुढे विरोधकांची रणनीती निष्फळ ठरली.
साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी, शिर्डीच्या इतिहासात प्रथमच तब्बल पाच तास चाललेल्या सभेत सभासद, सत्ताधारी मंडळ आणि विरोधकांमध्ये गरमागरमी, 'तू तू-मै मै' याचा अनुभव सर्वांना आला. मात्र अखेरीस सत्ताधारी मंडळाने मुद्देसूद उत्तरे देत सभेला यशस्वी व सुरळीत वळण लावले. सभेच्या सुरुवातीला काही संचालक वेळेवर अनुपस्थित राहिल्याबद्दल एका सभासदाने तीव्र आक्षेप घेत निषेध नोंदवला. मात्र काही वेळातच बहुतेक संचालक सभेला उपस्थित झाले आणि सत्ताधारी नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले. विषयांचे वाचन सुरू होताच विरोधकांनी आक्षेप घेऊन अनेकदा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. काही सभासद तर आक्रमक झाले होते; परंतु चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या नेहमीच्या कधी सौम्य तर कधी आक्रमक अशा दुहेरी शैलीत परिस्थिती हाताळत विरोधकांचे मनसुबे परतवून लावले. सभासदांच्या हितासाठी संस्थेबाबत आपली भूमिका पारदर्शक असल्याचे ठामपणे सांगून त्यांनी सभागृहातील तणाव निवळला.
या चर्चेच्या लाटेत सचिव विलास वाणी, व्हा. चेअरमन पोपटराव कोते यांच्यासह संचालक मंडळाने एकमुखी साथ देत विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले. सभेचा शेवट खेळीमेळीत झाला असला तरी विरोधाची धार कमी होत असल्याचे लक्षात येताच अखेरच्या टप्प्यात काही विरोधकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या संपूर्ण घडामोडींमध्ये एकच ठळक निष्कर्ष पुढे आला. चेअरमन विठ्ठल पवारांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी मंडळावरील सभासदांचा विश्वास अजूनही ठाम असून विरोधकांची शक्कल निष्फळ ठरली असल्याची चर्चा सभेत रंगली होती.