शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
साईबाबा संस्थानचे कर्मचारी चालवत
असलेली साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी राज्यात आपले वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरली आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी साई संस्थान सोसायटीच्या गणेश आरतीला उपस्थित राहून सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांची 'बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी' म्हणून पहिली निवड असल्याचे जाहीर केले.
साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्यावतीने आयोजित गणेशाच्या आरतीसाठी काका कोयटे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, शिर्डी वाहतूक शाखेचे निरीक्षक महेश येसेकर, साईबाबा संस्थान सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आदींनी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी काका कोयटे यांनी जवळपास तासभर थांबून चेअरमन विठ्ठल पवार, व्हा. चेअरमन पोपटराव कोते, सचिव विलास वाणी व संचालक मंडळाशी संवाद साधला. सोसायटीच्या चालू वर्षातील नफा, सभासदांसाठी सुरू असलेले विविध उपक्रम, बचत व कर्ज योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. चेअरमन पवार व त्यांच्या टीमचे कौतुक करताना कोयटे म्हणाले, या सोसायटीचे सभासद हे भाग्यवान आहेत. अशा कार्यक्षम नेतृत्वामुळे संस्थेचा लौकिक वाढतो. सप्टेंबर महिन्यात लातूर येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत राज्यातील एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांचे अधिवेशन होणार असून याचवेळी साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीला दीपस्तंभपुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. इतकेच नव्हे तर राज्यातील पाच कर्तृत्ववान चेअरमनची निवड करताना पहिला क्रमांक विठ्ठल पवार यांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा बहुमान मिळणे म्हणजे केवळ पवार यांचा नव्हे, तर संपूर्ण साई संस्थान कर्मचारी वर्गाचा सन्मान आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. शेवटी कोयटे यांनी परंपरेप्रमाणे संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेली उच्च प्रतीची पाण्याची बाटली, पिशवी व पेढ्यांचा बॉक्स स्वतः सोबत घेऊन, सहकार क्षेत्रातील ही संस्था दीपस्तंभाप्रमाणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार काढले.