shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मित्र आणि मित्रत्व

जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो सोबत येताना नाती सोबत घेवून येतो. प्रत्येक माणसाला नातलगाचं एक वलय निर्माण झालेलं असतं अन् तो त्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्म हाच आपल्या जन्मभराची नाती देतो. आता कुणाच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही. काहींना नाती खूप काही भरून देतात. तर काहींच्या पदरात काहीच पडतं नाही. प्रत्येकाचं हे वलय वेगळं वेगळं असतं. सगळी नाती आपल्याला जन्मासोबत मिळतात पण एक नातं असं आहे जे आपण नातलग, परिवार इत्यादींना सोडून एकट्याच्या स्वभावाच्या, वागण्या, बोलण्याच्या जोरावर निर्माण केलेलं असतं ते म्हणजे मित्र परिवार अन् मित्रत्व. 
मित्र हा आपल्या आयुष्यातला असा धागा आहे जो आपण स्वतः एकट्याने जोडलेला असतो. कारण मित्र हा आपण सर्वस्वी आपल्या एकट्याच्या मेहनतीनं कमवला असतो. एक नातं असं असतं जे आपण घर, दार, नातलग, जात, धर्म, या सगळ्यांच्या पलिकडे जावून  जोडलेलं असतं. कोण आपला मित्र असावा किंवा आपण कुणाचा मित्र असावं या दोन्हीं गोष्टी पूर्णपणे आपल्या स्वतःवर अवलंबून असतात. त्याचं कारण असं आहे की मित्र आणि मित्रत्व निर्माण होण्यासाठी काय आयाम ठरलेले आहेत अन् तिथं ते नातं निर्माण होतं अन्यथा ते नातं कधीच तयार होवू शकत नाही. 

मित्र आणि मित्रत्व निर्माण ज्या गोष्टीमुळे होतं त्या गोष्टी म्हणजे आपला स्वभाव, वागणं, बोलणं या गोष्टी ठरवता की तुम्ही कुणाचे मित्र आहात आणि तुमचे कोण मित्र आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप माणसं येतं अन् जातात पण मित्र मात्र थोडेच असतात याचं हे कारण आहे की व्यक्तीचा स्वभाव, वागणं, बोलणं हे जर आवडलं तरच मित्रत्वाची भावना निर्माण होते. अन्यथा नुसतं सोबत राहिलं म्हणजे झालं याचा अर्थ मित्र असा होतं नाही. जेव्हा आपल्याला कुणाचा सहवास लाभला अन् त्या व्यक्तीची वागणूक, स्वभाव, बोलणं, विचार या गोष्टी जर आपल्याला आवडल्या तर आपल्यात आपोआप मित्रत्वाची भावना वाढीस लागते अन् त्याचं रुपांतर मैत्रीत होतं मग ती व्यक्ती आपला मित्र बनते. हळु हळु जसा जसा सहवास वाढला की मग मैत्री बहरुन येते. एकदा मित्रत्व निर्माण झालं की मग मित्रासोबत विचारांची देवाण-घेवाण, चर्चा, सल्ला देणं, सल्ला घेणं, काही निर्णय घेतांना विचारविमर्श, या गोष्टी ओघात त्यात येत असतात. अन् यातून दिवसागणिक हे नातं अधिक समृध्द होतं जातं. आज जगाच्या पाठीवर एकही असा माणूस असा नाही की ज्याला मित्र नाही. 

अनेक माणसं आयुष्याच्या वाटेवर जोडली जातात पण जी माणसं विचारधारा व मनाने जोडलेली असतात तीच कायमस्वरूपी मित्र म्हणून सोबत असतात. त्याला ना संपर्काची मर्यादा असते ना रोजच्या भेटीगाठीची ते सदैव सोबत असल्याची भावना मात्र कायम मनात घर करू न राहते. मित्र हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा धागा असतो. हीच एकमेव अशी जागा असते जिथं स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त होण्याला कधीच मर्यादा पडत नाही. जेव्हा सगळी नाती वेळेनुसार बदलतील पण मित्र अन् मित्रत्व हे एक असं नातं आहे की जे आपल्याला पडत्या काळात सुध्दा आपल्या पाठीशी घट्ट उभं राहतं. ज्याला आयुष्यात निःस्वार्थ मनाचे प्रामाणिक मित्र मिळाले आहे त्या माणसानं समजावं की त्याने आयुष्यात खूप काही कमावलं आहे. 

जशी पैसा माणसाची श्रीमंती दर्शवतो तसचं माणसाची माणुसकी त्याचा मित्र परिवार दर्शवतो. आपला कुणीतरी चांगला मित्र असावा हा विचार करण्यापेक्षा आपण कुणाचा तरी चांगला मित्र असलो पाहिजे हा विचार केला तर नक्कीचं तुम्हाला चांगला मित्र मिळेल. मित्र आणि मित्रत्व याची मदार ही विश्वास आणि प्रामाणिकपणा यावर आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणा याशिवाय मित्रत्वाला पूर्णत्व प्राप्त होतं नाही. मित्र आणि त्यांचे आचार, विचार, वागणं, बोलणं हे सगळं काळाच्या ओघात आपल्यात उतरत असतं. त्याचे प्रतिबिंब न कळत आयुष्यावर उमटत असतं. शरीराला ज्याप्रमाणे श्वासांची गरज असते त्याचप्रमाणे आयुष्य जगतांना मित्र जवळ असावे लागतात. दगडांच्या गर्दीत आपल्यासाठी हे परीस असतात.

या जगात चांगले मित्र मिळणं म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील शिंपल्यात मोती सापडल्या सारखं आहे. त्यामुळे त्यांना जपणं हे अतिशय महत्त्वाच असतं. त्यामुळं आपण स्वतः कुणाचा तरी चांगला मित्र बनलं पाहिजे या विचाराने आपण आपली वाटचाल ठेवली पाहिजे. मित्रविना आयुष्य म्हणजे ओसाड वाळवंटासारखं आहे. जो मित्रासाठी झीजला आहे, झळ सोसली आहे, वेळप्रसंगी धावून गेला आहे त्यांना मित्र नक्कीचं वेळप्रसंगी उपलब्ध होतील. ज्यानी मित्रासाठी काहीच केलं नाही त्यान मित्राने त्याच्यासाठी काही करावं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. ज्या मैत्रीत आदर, मान-सन्मान, विश्वास, जिव्हाळा, प्रामाणिकपणा या गोष्टी आहेत ते खरं मित्रत्व.

माणसाच्या आयुष्यात आनंद, सुख, दुःख, प्रेम, विरह, बरं, वाईट, यश, अपयश, संघर्ष या सगळ्या प्रसंगात मित्र जवळ असावे लागतात. मित्र एक व्यक्ती आहे  जो तुमचं यश स्वतःचं मानून आनंद साजरा करतो अन् तुमचं अपयश स्वतःचं समजून स्वीकारतो जेव्हा माणसावर बाका प्रसंग ओढावला जातो तेव्हा मित्र आपल्याला आलेल्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी बळ देतात. जेव्हा माणसावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा मित्र आपल्याला धीर देत असतात.

आपण जे आपल्या मित्रासोबत वागू आज ना उद्या ते परतून आपल्याकडे येणारच आहे त्यामुळं ज्याचं त्यानं ठरवावं की आपण कसं वागायचं. "गहू पेरला की ज्वारी उगवतं नाही" हे लक्षात ठेवूनच नेहमी वागले पाहिजे. यदाकदाचित एखाद दुसरा मित्र वाईट वा चुकीचं वागला तर तुला तिथल्या तिथं सोडून द्या पण मात्र जो अनुभव त्याच्यापासून मिळाला आहे तो मात्र कायम पाठीशी ठेवावा. या जगात ज्याला चांगले मित्र आहेत ते खरचं खूप नशीबवान माणसं आहेत. 

आयुष्याचा आनंद हा मित्रामध्ये एकवलेला असतो. दोष देण्यापेक्षा सोडून द्यायला शिकलं की सगळं काही ठीक होतं. अन् वेळप्रसंगी काही गोष्टी सोडून देण्यातच आपलं भलं असतं. मग ती वस्तू असो, व्यक्ती असो वा नातं असो. जे आपण वागू ते आपल्याकडे एक ना एक दिवस येणारच आहे हे आज पर्यंत जगाच्या पाठीवर कुणालाच टाळता आलं नाही अन् कधी टाळता येणार पण नाही. त्यामुळं जी मोजकी दोन चार माणसं आपण कमावली आहे त्यांना आपण जपलं पाहिजे.
शेवटी इतकचं म्हणेल
"आयुष्याची वाट चालताना आपला वाटाड्या आपण जपला पाहिजे. 

वाटेत पेटला जरी वणवा तरी त्याच्यासोबत असण्याने गारवा वाटला पाहिजे".

संकलन 
महादेव कुसळकर
close